Thursday, December 31, 2009

उलटा प्रवास

काल मुग्धाचं पोस्ट वाचलं आणि क्षणभर मुग्धा आणि तिची आई, ज्यांना मी आयुष्यात कधीच पाहिलं नाही त्यांचं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. माझा आत्मा हा थोड्यावेळ माझा राहीलाच नव्हता. तो कधीच उडुन गेला होता. कुणाच्या तरी शरीरात जाऊन तो विराजमान झाला होता. इथे राहिलं होतं ते फक्त माझं शरीर, एक निर्जीव शरीर. त्या निर्जीव शरीरालासुद्धा मुग्धाची तगमग समजत होती. आत्म्याविन पोरकं झालेलं माझं शरीर त्या पोरक्या झालेल्या मनाची स्पंदन झेलत होतं. ती स्पंदन झेलता झेलता त्याचे निर्जीव डोळे कधी भरुन आले समजलंच नाही. तिने लिहिलेल सारे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. ते सारं मीच काही त्यांच्या घरातलाच एखाद्या असल्याप्रमाणे पहात होतो, अनुभवत होतो. माझ्या डोळ्यांपुढे हे सारं घडत आहे असाच भास होत होता. समवेदना म्हणजे काय याचा अनुभव मी घेत होतो. कुणाचं तरी, थोड्यावेळासाठी का होईना मी आयुष्य जगत होतो. ही भावनाच मुळी खुप वेगळी होती. स्वताची दु: या शरीराने खुप झेलली पण दुसरयासाठी हे शरीर हळहळताना मी पुन्हा एकदा पहात होतो. "आत्म्याविन पोरकं झालेलं शरीर आणि आईविना पोरक झालेल मुलं यांच्यात फरक तो काय ? " आई म्हणजेच आपला आत्मा, तो नसेन तर हा देह कसा चालणार !

मुग्धाचं पोस्ट वाचुन झालं आणि थरथरत्या हाताने आईला फोन लावला...
"आई, अजय बोलतोय. बरी आहेस ना तू ? तुझं इन्सुलिनचं इंजेक्शन आज घेतलंस का ? "
"घेतलं मी, उद्या जाऊन पुन्हा एकदा शुगर टेस्ट करणार आहे. पण तू असा अचानक का फोन केलास?"
"काही नाही , सहजचं...." , मी,

पुढचं काहीच बोलवलं नाही कारण मी आता तो राहिलो नव्हतो. आईच्या लहानग्या बाळाकडे जाण्याचा उलटा प्रवास माझा केव्हाच सुरु झाला होता...

-अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
. यंदा कर्तव्य आहे ?
. फुंकर
३. मी आणि माझी फिल्लमबाजी
४. मी 'पुरुष' बोलतोय !

---------------------------------------------------------------------------------

Wednesday, December 30, 2009

च्या आयला

'च्या आयला' ही काही शिवी नाही; ते एक एक्सप्रेशन आहे. जसं तुम्ही आई गं, बापरे किंवा आईशप्पथ म्हणता तसंच 'च्या आयला' असं म्हणणं शिवी नसून ते एक एक्सप्रेशनच आहे. आणि समजा बोलता बोलता एखाद्यानेच दिलीच शिवी तर कुठं बिघडलं? मिळमिळीत जेवण असेन तर आपण ठेचा किंवा चटणी मागवतोच ना तसंच शिवीचंही आहे. माझ्या मते तर शिवी हा भाषेचा एक दागिना आहे. होय , 'शिवी भाषेचा एक दागिनाच आहे' हे विधान भल्याभल्यांना भाषातज्ञांना चकीत करु शकतं. भाषेला जर कशाने शोभा येत असेल तर त्यात शिवी सुद्धा येते. कुठलीही भाषा ही शिवीविना अपुरी आहे. जगाच्या पाठीवर अशी एकही भाषा तुम्हाला शोधून सापडणार नाही ज्यात शिवी नाही. शिवी कुठेही लिखीत स्वरुपात नसते म्हणजेच जसं पाककूतीच पुस्तक, योगासनांचं पुस्तक, रांगोळ्याचं पुस्तक असतं तस शिवीचं पुस्तक कुठे असतं का ? नाही, मग तरीही या शिव्या एका जनरेशनकडून दुसरया जनरेशन कडे जातातच ना, त्यापण अगदी जशाच्या तशा. कधीकधी तर त्या अधिकच अ‍ॅडव्हान्सही होतात. शिवी हा प्रकार कुठल्याही पुस्तकात लिखीत स्वरुपात नसतानासुद्धा अगदी प्रत्येकाच्या तोंडी रुळतो यातच शिवीचं साधेपण आहे. शिव्या कुणालाही शिकवाव्या लागत नाही एवढ्या त्या सोप्या असतात. लहान मुलाला जर थोडावेळ मुलांच्यात खेळायला सोडल तर तो बाहेर जाऊन एखादा श्लोक शिकण्याअगोदर एखाद्याने दिलेली शिवीच लवकर शिकतो. पाण्यात पडल्यावर जसं पोहायला येतं तसंच मूल बाहेर गेलं तर ते शिवी शिकूनच परत येतं. याचाच अर्थ शिवी शिकण अगदी सोपी गोष्ट आहे. जसंजसं वय वाढतं तसतसं ह्या शिवीमधले कर्ते, क्रियापदं आणि विशेषण बदलतात. वयाबरोबर शिवीमधली धार जर वाढली नाही तर आजुबाजुचे लोकांकडुन टिंगळटवाळी होऊ शकते.

आता तुम्ही म्हणाल मी शिवी शिकलो पण त्याचा उपयोग काय ? अहो शिवी ही मल्टीपरपज असते. कुठल्याही भांडणाची सुरुवात आणि शेवट शिवीशिवाय होऊच शकत नाही. भांडणात समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात जो राग असतो तो साध्या शब्दात व्यक्त करणं एवढं सोपं नसतं, त्यासाठी शिवीसारखंच हत्यारच हातात घ्यावं लागतं. अहो शिव्या जर दिल्या नाहीत तर भांडणं भांडण वाटणार नाहीत. १०० वाक्य सुद्धा भांडणात जो इफेक्ट साधु शकणार नाहीत तो इफेक्ट एका ओळीची शिवी साधते. शिवी जशी रागाने शत्रू ला देतात तसं मित्राला दिली तरी चालते. म्हणजे तुम्ही जर खुप लाडात आलात तर मित्राला प्रेमाने शिवी देऊन संवाद सुरु करु शकता. कोल्हापुर मध्ये हा प्रकार भारी लोकप्रिय आहे. भांडणाच्या आणि प्रेमाच्या शिव्या कधीकधी सारख्या सुद्धा असु शकतात फक्त त्यावेळचं आवाजातलं टोनींग आणि एक्सप्रेशन वेगळे असतात. शिवी देऊन तुम्ही दु:ख, आश्चर्य, प्रेम अशा सारया भावना व्यक्त करु शकता. फक्त समोरच्या व्यक्तीला सुद्धा शिवीमागचा 'तो' अर्थ ज्ञात असावा. शिवीचा अर्थ समजुन घेण्यापेक्षा त्याच्यामागच्या भावना ओळखण अधीक महत्त्वाचं. शिव्या या सर्व वर्गातील आणि वयोगटातील लोक देतात. शिव्या या गावच्या चावडीपासुन ते अगदी विधानभवन, संसदभवन ते फुटबॉल आणि क्रिकेट्च्या मैदानावरही दिल्या जातात. आजकाल शिव्यांचा उपयोग सिनेमामध्येही होऊ लागलेला आहे. आजकाल कुठलाही सिनेमा घ्या त्यात सीन प्रभावी वाटावा म्हणून मुद्दाम शिव्या पेरल्या जातात. गदर मधला सनी देओलचा पाकिस्तानातला सीन असुद्यात किंवा नाना पाटेकराचा अब तक छप्पन असुद्यात, शिवीचा वापर सिनेमामध्ये सर्रासपणे केला जात आहे. एवढंच काय मध्यंतरी मराठीमध्ये मध्ये शिवीवरुन सुरुवात होणारं गाणं सुद्धा मी ए॑कलं होतं. इथुन पुढे जाऊन एखादी शिवी हेच टायटल असलेला सिनेमा आला तर त्यात आश्चर्य वाटु नये. माननीय ठाकरेंसारखे नेतेसुद्धा आपल्या भाषणामध्ये शिव्यांचा वापर करुन लोकांच्या टाळ्या मिळवतात. याच्यामुळेच शिवीकडे सध्या एक प्रभावी माध्यम म्हणून लोक बघायला लागलेत की काय अशी मला शंका येऊ लागली आहे.

शिवीचे तसे अनेक प्रकार आहेत. काही शिव्या ह्या सौम्य प्रकारात मोडल्या जातात तर काही उग्र तर काही अति उग्र. जेव्हा जशी गरज तेव्हा तसा उपयोग. शिव्या मध्ये नेहमी बापाला मध्ये न आणता आईलाच का आणलं जात हे मला माहित नाही. शिव्या देण्याचा सेन्स हा प्रत्येकामध्येच असतो. कोणी मनातल्या मनात शिव्या देतो तर कोणी खुलेआम. कोणी रागात असताना दात ओठ खाऊन शिवी देतो तर कुणी एखाद्याच्या अंगावर धाऊन जात शिवी देतो. शिव्या देणे ही सुद्धा एक कला आहे. उगाचच संदर्भहीन शिव्या देऊन जमत नाही. शिवी दिल्यावर जर अपेक्षित अर्थ साधला गेला नाही तर शिवी देण्याचा काय फायदा ? शिवी देणे ह्या प्रकारामध्ये मुलींपेक्षा मुलेच जास्त वरचढ असतात असं आतापर्यंतच्या अभ्यासावरुन लक्षात येत आहे. मुलीं सुद्धा शिव्या देतात पण त्या मुलांएवढ्या तिखट नसतात. मुलींच्या शिव्या ह्या चिंचा, बोर आणि आवळ्याप्रमाणे आंबट, तुरट आणि काहीवेळेस बेचव असतात. ग्रामिण भागातल्या स्त्रिया मात्र याला अपवाद असतात असं म्हणता येईन. त्यांची शिव्यांमधली जाण भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारी असते. दारु पिल्यावर माणसाच्या जिभेवर शिवी अवतरते किंवा त्याला शिवी प्रसन्न होते असंही दिसुन आलेलं आहे. बहुतेक दारुचा अन शिवीचा कुठेतरी, काहीतरी संबंध असावा. काही लोक ही शिवीअ‍ॅडीक्ट असतात म्हणजे त्यांचं कुठल्याही वाक्य शिवीविना पुर्ण होत नाही. आजकाल शिवीमध्ये पुढच्याला कामही सांगण्याची प्रथा पडलेली आहे. ही शिवी देण्याची नवीन प्रथा सामान्यता शेतकरी आणि कोळी लोकांकडुन लोकांच्यामध्ये पसरली असावी असा माझा तरी कयास आहे.

इतिहासात डोकावला असता, चाकाचा, विमानाचा किंवा फोन चा शोध कधी लागला हे जसं निश्चीतपणे सांगता येतं तसं शिवीचा शोध नक्की कधी लागला हे सांगता येणं अवघड आहे. पण जेव्हा कुठलीही भाषा विकसीत होत असते तेव्हा त्याच्या अगदी सुरुवातीच्याच टप्याला शिवीचा शोध लागली असण्याची शक्यता आहे. पहिली शिवी कोणी कोणास दिली असावी याच्यावर आपल्या इतिहाससंशोधकांनी संशोधन करणे गरजेचं आहे. शिवीचा विकास कसा झाला, या विकासाला कोणी कसा हातभार लावला, शिव्या कशा पद्धतीने लोकांच्या मध्ये रुळल्या गेल्या आणि त्या तितक्याच लवकर प्रसिद्ध कशा झाल्या ही माहिती लोकांसमोर येणं गरजेची आहे. जसे साहित्यसंमेलन वा कवितांचे संमेलन होतात तसेच शिव्यांचे संमेलन होणं गरजेचे आहे. याच्याहीपुढे जाऊन शिव्यांसाठी खास स्पर्धा भरवल्या जाव्यात. शासन दरबारी शिव्यांची नेहमीच उपेक्षा झाली आहे. त्यामुळे शासनाने शिव्यांच्या आणि पर्यायाने भाषेच्याच विकासासाठी खास लक्ष देणं गरजेचं आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, अशीच विविधता शिव्यांच्या बाबतीतही आपल्याला इथे पहायला मिळते. कोल्हापुरी शिव्या आणि विदर्भातल्या शिव्या यामधला भाव जरी सारखा असला तरी त्यात वापरलेले शब्द, टोनींग किंवा शोधलेले वीक पॉईंट यात भिन्नता आढळते. सरकारने यासाठी लोकांना एक व्यासपीठ देणं गरजेचं आहे जिथे येऊन लोक आपल्या शिव्या एकमेकांशी शेअर करतील आणि आपल्या ज्ञानात भर टाकतील. महाराष्ट्राच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाने किमान हे एक तरी लोकोपयोगी काम करुन स्वताला लोकांच्या शिव्यांपासुन वाचवावं एवढीच एक छोटी अपेक्षा.

-अजय

(या वेळेस शिव्यांवर लिहीण्याचं धाडस मी केलेलं आहे. शिवीवर निबंध लिहीतानासुद्धा कुठेही शिवीचा वापर न करण्याची काळजी मी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वाक्यामध्ये शिवी वा शिव्या हा शब्द आणुन एक वेगळाच परिणाम साधण्याचा प्रयत्नही मी इथे केला आहे.)


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.चार गोष्टी.
२.उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.
३.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Monday, December 28, 2009

चार गोष्टी

१. लग्नाला उभे राहिलेले लोक हे लवकरच एक थट्टेचा विषय बनतात. शेंबुड न पुसता येणारया पोरासोरापासुन ते नव्वद वर्षाच्या आजोबापर्यंत सारयांचा एकच प्रश्न असतो..."काय मग कुठंपर्यंत आलंय लग्नाचं ? यंदा उरकरणार की नाही ? अहो बघुन बघुन असं कसलं स्थळ पाहताय ते तरी सांगा." किंवा "उरकुन टाक आता लवकर, बस्स झालं". लग्नाला उभे राहिलेयापेक्षा जास्त घाई यांनाच असते. अशा लोकांची जमात ही प्रत्येक समाजात आणि सर्व वयोगटात पहायला मिळते.

२. नवरा-बायकोमध्ये संवाद असणं फार गरजेचं असतं. आपला जोडीदार हा आपला सर्वात जवळचा मित्र असावा. त्याच्याशी गप्पा मारणं हे अगदी सहजतेनचं घडलं पाहिजे. त्यासाठी विषय किंवा वेळ शोधावी लागत असेन तर समजावं की कोणीतरी कमी पडतंय. बरेच वेळा नवरा बायको बाहेर जेवायला जातात आणि सुतक पाळल्यासारखं दोघंही शांत बसुन, एकमेकांकडे न पाहता जेवण करत असतात. ज्या टेबलावर चमचेच आवाज करतात अशा टेबल्यावरच्या लोकांची लग्न टिकतील ही पण त्याला यशस्वी झाली असं म्हणायचं का?

३. काही लोकांच्या मते मुल झाल्यावर बायको मधला 'चार्म' संपतो. मला अशा लोकांची खरंच किव येते. मुल झाल्यावर स्त्री कुणाची बायको, मुलगी किंवा बहीण रहात नाही. ती तेव्हा फक्त एका बाळाची 'आई' असते. तिच्या मनात त्यावेळेस फक्त ममत्वाचीच भावना असते. देवानेच स्त्री ला तसं बनवलंय त्याला आपण कोण होतो नावं ठेवणारे ?

४. एकसारखं एखाद्या मुलीकडे पाहण्याने ती मुलगी तुम्हाला पटेन ही खुळी समजूत आहे. खरं तर तिच्याकडे एकदाच पहा, नजरानजर होऊद्यात आणि नजरानजर झाली की तिला एक छोटीशी स्माईल द्या. पुन्हा त्या मुलीकडे बराच वेळ पाहूच नका पण थोडासा अंदाज घ्या की तिचं तुमच्याकडे लक्ष आहे का. आणि मग जाता जाता बराच वेळाने पुन्हा एकदा तिच्याकडे स्माईल देऊन जा. काही काही जण उगाचच लाळ गाळत एकसारखं मुलीकडे पहात असतात. मुलीसुद्धा अशा लोकांना किती भाव देतात त्याच जाणे.

५. ब्लॉग वर एक लेख लिहिण्यापाठीमागे ब्लॉगरची किती मेहनत असते हे एकदा स्वता एखादा लेख मराठीत लिहून पहा. एखादं पुस्तक वाचायचं म्ह्टलं तरी तुम्हाला पैसे देऊन ते पुस्तक विकत घ्यावं लागत. मग एखाद्याच्या ब्लॉगवर जाऊन जेव्हा तुम्ही त्याचे लिखाण फुकट वाचता तेव्हा फक्त 'छान लिहीलयंस' अशी एक प्रतिक्रिया द्यायला काय हरकत आहे ? मराठीचा कैवार घेणारे किंवा स्वताला 'तारणहार' म्हणविणारयांची भाषणं जर तुम्ही तासनतास ए॑कत असाल तर हीच मराठी जगण्यासाठी उत्तमोत्तम लिखाण करुन प्रयत्न करणारयांसाठी तुम्ही साधा एक मिनीट देऊ शकत नाही. एखादा लेख चांगला वाटला तर त्याला प्रोत्साहित करा, फायदा तुमचाच आहे कारण ब्लॉगर अजुन मेहनत घेऊन याहीपेक्षा चांगलं काही देण्याचा प्रयत्न करेन.

६. लोक देवाकडे हवं नको ते सारं मागायला जातात अगदी परीक्षेत चांगले गुण मिळुदेत पासुन मुलगा होऊदेत यापर्यंत सारंच. मी सुद्धा कित्येक वेळा मंदीरात गेलो आहे, दरवेळेस काही मागण्यासाठीच. देव सुद्धा प्रत्येकाच्याच अडचणी ए॑कत असतो. या जगातील प्रत्येक गोष्ट ही त्याच्या मर्जीप्रमाणेच चालली आहे याच्यावर­ माझा ठाम विश्वास. पण एखादी गोष्ट जशी आपण मागायला मंदीरात जातो त्याप्रमाणे ती गोष्ट मिळाल्यावरसुद्धा मंदीरात जावं आणि त्या विश्वविनायकाचे आभार मानावे. प्रयत्न आपले जरी असले तरी त्याला कुणाच्यातरी आशिर्वादाची गरज असतेच ना ! उगाचच का आपण आई-वडीलांच्या नतमस्तक होतो?

७. मागच्या आठवड्यात मी बिग बझार मध्ये गेलो होतो. तेथे घडलेला खराखुरा प्रसंग. मी तिथे खाण्यापिण्याच्या वस्तु घेत असताना एक मुलगा आला आणि म्हणाला की तुम्ही बेधुंद ब्लॉगवाले ना ? मला थोडंस आश्चर्य वाटलं पण थोड्याफार गप्पा मारुन मी तिथुन निघालो. देसाई आंबवाले किंवा चितळे बंधू मिठाईवालेसारखं 'अजय सोनवणे ब्लॉगवाले' असं आता नाव लावावं लागेन बहुतेक मला. ब्लॉगवालेच्या ए॑वजी ब्लॉगवाला असं मुस्लीम नावही आवडेन.:-)

-अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.
२.मी आणि माझी फिल्लमबाजी
३. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Thursday, December 24, 2009

'शिवाजी' म्हणजे काय ?

'शिवाजी' म्हणजे काय हे समजावून घ्यायच असेन तर ही ५ मिनिटांची क्लिप जरुर ए॑का. ( शिवाजी महाराज न म्हणता शिवाजी म्हटल्याबद्दल क्षमस्व. पण तिथे शिवाजी असंच म्हणायच आहे. )

बोला शिवाजी महाराज की जय !

Get this widget | Track details | eSnips Social DNAवि.सु : इथुन पुढे मी माझ्या ब्लॉगवरुन कुठल्याही प्रकारच्या ऑडीओ फाईल्स शेअर करणार नाही. या ब्लॉग वरुन मी फक्त माझे अनुभव, विचार, भावना आणि लेखच प्रसिद्ध करेन असं ठरवलं आहे.

-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.मी आणि माझी फिल्लमबाजी
२.फुंकर
३.मी 'पुरुष' बोलतोय !
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.

उद्धवजी,

माझं नाव अजय सोनवणे, वय २७, मुळचा पुण्याचा. पुण्यातच एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. काही दिवसांपुर्वी माझी कार मी एका शोरुम मध्ये सर्व्हींसींग साठी दिली असताना त्यांच्या हातुन ती ठोकली गेली व त्याची भरपाई न मिळता त्यांच्याकडुन उलट मला बरेच दिवस मनस्तापच भोगावा लागला. बरेच प्रयत्न करुनही त्या शोरुमचा मालक, जो एक उत्तर भारतीय आहे त्याच्याकडुन काहीच भरपाई न मिळाल्याने शेवटचा पर्याय म्हणुन मी शिवसेनेची मदत घेण्याचं ठरवलं. शिवसेनेच्या कॉल सेंटर ला फोन लावला आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीचं काय होईल अशी मनात शंका होतीच. आतापर्यंत राजकिय पक्षांचा अनुभव तसा फारसा काही चांगला नव्हताच आणि राजकीय पक्ष एका सामान्य व्यक्तीची तक्रार किती गांभीर्याने घेतील असा सवाल होता. पण शिवसेनेच्या कॉल सेंटर ने मला तातडीने नगरसेवक सागर माळकरांचा फोन नंबर दिला आणि तिथुनच सगळी चक्र पटापटा फिरू लागली. एक नगरसेवक, ज्यांचा नी माझा कधीही काही संबंध आला नव्हता, ना मी त्यांच्या मतदारसंघातला मतदारही नव्हतो, तरीही त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि कुशलतेने हे प्रकरण हाताळलं आणि मला योग्य तो न्याय मिळवुन दिला. भरपाई आणि त्याचबरोबर माझी गाडी ही मला मिळवुन दिली. एका सामान्य व्यक्तीसाठी एक नगरसेवक स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करुन एवढं काही करतो याच्यावर खरंच विश्वास बसत नव्हता. लोकशाहीमध्ये लोकांसाठी लोकप्रतिनिधीं असतो हे मला आज पहायला मिळालं.

ज्या पद्धतीने शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी आणि नगरसेवक सागर माळकरांनी हे प्रकरण शेवटपर्यंत लावुन धरत मार्गी लावलं त्याला तोड नाही. शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी दररोज मला स्वताहुन फोन करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी मोठी भूमिका बजावली. असा अनुभव मला कदाचित पहिल्यांदाच येत होता. सत्तेत नसताना एखादा पक्ष सामान्य लोकांची एवढी कामे करत असेन तर सत्तेत आल्यावर काय करु शकेन याचा आता लोकांनाही विचार करावा. माझ्या ब्लॉगच्या माध्यमातुन मी लोकांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवेन.
या कॉल सेंटरमागच्या कल्पनेला, सगळ्या अ‍ॅडमीनीस्ट्रेशनला, लो़कांची कामं करण्याच्या तुमच्या भावनेला आणि सागर माळकरांसारकख्या लोकप्रतिनिधींना माझा सलाम.

उद्धवजी, शिवसेनेचा भगवा तुमच्या हातुन असाच फडकत राहो. या कामी आमची तुम्हाला सदैव साथ राहीनच. आता तरी माझ्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा !
आपण या इ-मेल ला रिप्लाय देऊन मला याची पोचपावती द्यावी ही विनंती.

जय महाराष्ट्र !

-अजय सोनवणे
+९१-९८९०३०००४७

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.मी आणि माझी फिल्लमबाजी
२.फुंकर
३.मी 'पुरुष' बोलतोय !
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Wednesday, December 23, 2009

टॅग...

अपर्णा ने टॅग केलं म्हणुन हा सारा खटाटोप ...

1.Where is your cell phone?
कालपासुन बंद पडलाय. या सेल फोनने माझे आतापर्यंत ७ चार्जर बंद पाडलेत. आजचा ८ वा ही चार्जर बंद पाडलाय पा पठ्याने. पण मी ही काही कमी नाही. आज जाउन मी नववा चार्जर जाऊन आणणार पण फोन नाही बदलणार.

2.Your hair?
एकदम मोकळे मोकळे वाटतायत आज, आज जेलफिल नाही लावणार.

3.Your mother?
खुप प्रेमळ

4.Your father?

संत एकनाथासारखे शांत

5.Your favorite food?
वरण भात वरुन तुप, फीश, प्रांझ, महाराष्टीयन काहीही द्या !

6.Your dream last night?
मी माझ्या ड्रीम गर्ल बरोबर एखाद्या जंगल सफारीवर

7.Your favorite drink?
कॉफी

8.Your dream/goal?
एकदा तरी आयुष्यात केनियाची सफारी आणि इटलीला भेट

9.What room are you in?
बेड रुम

10.Your hobby?
चित्रपट पाहणे

11.Your fear?
मला एक भयानक स्वप्न नेहमी पडतं त्याचीच भीती वाटते.

12.Where do you want to be in 6 years?
जमिनीवरच...

13.Where were you last night?
घरीच

14.Something that you aren’t diplomatic?
जवळचे लोक

15.Muffins?
खुप

16.Wish list item?
कॅटरीना कैफ, आयेशा टाकीया ( दोघी भारी आहेत राव :-) )

17.Where did you grow up?
मुंबई (दादर) , भोर

18.Last thing you did?
आंघोळ

19.What are you wearing?
फॉर्मल ड्रेस

20.Your TV?
बातम्या शिवाय नाही पहात मी

21.Your pets?
काहीच नाही.

22.Friends
खुप, एकदम जवळचे मोजकेच


23.Your life?
इनज्याईंग

24.Your mood?
आज थोडा उदास आहे, मीटींग आहे ऑफीसात ना

25.Missing someone?
हो ( विचारलं नाही म्हणुन नाव सांगत नाही :-) )

26.Vehicle?
टू व्हिलर

27.Something you’re not wearing?
शुज

28.Your favorite store?
फिश करी जो चांगला देईन ते

Your favorite color?
जांभळा

29.When was the last time you laughed?
आज सकाळीच, एक सिनेमा पहात होतो

30.Last time you cried?
५ महिन्यापुर्वी, खुप कठीण काळ होता माझ्यासाठी तो. अंगावर पांघरून घेऊन खुप खुप रडलो, आयुष्यात पहिल्यांदाच एवढा रडलो असेन.

31.Your best friend?
लॅपटॉप

32.One place that you go to over and over?
टॉयलेट :-)

33.One person who emails me regularly?
कूणीच नाही तसं, मला फॉरवर्ड ईमेल आणि ब्लोग प्रतिक्रिया सोडुन काहीच ईमेल येत नाहीत :-(

34.Favorite place to eat?
पूण्यातल एक महाराष्टीयन थाळी देणारं


अगदी विक्रमी वेळात आजची ही पोस्ट लिहली. मजा आली पण.

मी मिनल, रोहीणी , भाग्यश्री ताईंना टॅग करतोय.

-अजय

Monday, December 21, 2009

मी आणि माझी फिल्लमबाजी

फार पाठीमागे नाही अगदी २० वर्षापुर्वी गोष्ट. तेव्हा आमच्या घरी एक क्राऊन चा जुना ब्लॅक अ‍ॅड व्हाईट टी व्ही होता. त्या काळी ब्लॅक अ‍ॅड व्हाईट टी व्ही ला थोडाफार कलर चा फिल यावा म्हणुन निळी काच लावलेली असे. आमच्यासाठी फिल्मी जग त्यावेळी फक्त त्या काळया, पांढरया आणि निळया या तीन रंगातच सामावलेलं होतं. रंगीत टी व्ही तेव्हा ­प्रत्येकाच्या घरी नसायचे. आमच्या घरी रविवारी भल्या पहाटेपासुन लवकर उरकण्याची घाई सुरु असायची. माझ्या आईला रविवारची 'रंगोली' फार आवडायची आणि तिच्यामुळेच मला सुद्धा. मग सकाळी सातच्या आत आमची आंघोळ वगैरे उरकुन आम्ही चारजण टी व्ही समोर अगदी अगदी ठाण मांडुन बसे. देवाच्या पुजेसाठी आम्ही एवढे भक्तिभावाने कधी बसलो नाही पण रंगोली साठी मात्र एक मिनीटभर सुद्धा जागचे हलत नव्हतो. त्या वेळी आठवड्यात एक दिवसच गाणी पहायला मिळत असे. त्यामुळे रंगोलीचं महत्त्व काही औरच होतं. मला त्यावेळेस राज कपुर आणि देवानंद फार आवडायचे. देवआनंदचं एका बाजुला तिरका तिरका होत पळणं पाहुन मला एकदा वाटलं होतं की आता हा नक्कीच खाली पडणार. तेव्हा मला आईने समजावलेलं की ही तर त्याची स्टाईल आहे. राज, रणधीर आणि राजीव, राज कपुर च्या एका गाण्यात लहान मुलं म्हणुन होती, रेखाला अमिताभशी लग्न करायच होतं, मीना कुमारी कॅन्सर मुळे मरण पावली आणि अशा बरयाच गोष्टी मला लहानपणीच समजल्या होत्या. मला त्यावेळी 'एक दोन तीन .." हे तेजाब मधलं गाणं पाठ होतं. मग कुणी नविन माणूस घरी आलं की आमचा न चुकता गाण्याचा कार्यक्रम होत असे. त्यासाठी कुणालाही मला 'अजय ते गाणं गाऊन दाखव बरं' असं म्हणण्याची मी वेळ येऊ दिली नाही. माझा आवाज चांगला नसतानाही फक्त या आवडीपोटीच मी शाळेच्या स्नेहसंमेलनात सुद्धा गायलो होतो. एवढंच काय आयुष्यात मी पहिलं कुठलं पुस्तक हातात घेतलं असं जर मला कुणी विचारलंच तर मी 'चांदोबा' सोडुन एखाद्या फिल्मी मासिकाचच नाव घेईन, याच्यावरुन तुम्हाला अंदाज आलाच असेन की मी किती फिल्मी आहे ते :-)

त्या वेळी टी व्ही म्हणजे म्हणजे डी डी नॅशनल वा ते एकच असं चॅनेल आम्हाला माहित होतं. शुक्रवार व शनिवारी हिंदी आणि रविवारी मराठी सिनेमा टी व्ही वर लागत असे. आठवड्यातुन इन मिन तीन सिनेमे म्हणजे आमच्यासाठी मोठा अर्पुप प्रकार होता. शुक्रवारच्या सिनेमाची तयारी सकाळपासुनच सुरु होई. आमच्या शेजारी राहणारा निलेश सिनेमा पाहण्यासाठी माझ्या सोबतीला असे. शुक्रवारचा सिनेमा कुठला या पासुन त्यात कोण कोण आहेत याची चर्चा आम्ही शाळेच्या कट्यापासुन ते मुतारी पर्यंत, सर्व जागी करत असे.
"आजच्या पिक्चर मध्ये कोण कोण आहेत ? हिरो किती आहेत त्यात ?"..मी, जेवढे जास्त हिरो तेवढी जास्त मजा असं साधं समीकरण असे आमचं.
"धर्मेद,जितेंद्र आणि बरीच गॅग आहे त्यात. आयच्या ...भारी पिक्चर दिसतोय".. निलेश. 'आयच्या' हा त्याचा भारी आवडता शब्द. हा शब्द तो प्रत्येक भाव व्यकत करणासाठी वापरी. म्हणजे आनंद झाला तरी आयच्या, दु:ख झालं तरी आयच्या, विस्मयचकीत झाला तरी आयच्या आणि राग आला तरी आयच्याच.
"फा़ईटींग आहे का राव...", मी, फाईटींग हा आमच्यासाठी सिनेमाचा आत्मा असे. पिक्चर मधील फाइटींग बघुन आम्ही खरया खुरया मारामारीत सुद्धा ढिशुम ढिशुम असा तोंडानेच आवाज करत असे. :-)
"हो मस्त फाईटींग दिसतेय, तुला माहितेय का त्यात हेलीकॉप्टर मध्ये सुद्धा फाईटींग आहे. त्यात हिरो कडे कुत्रा आणि माकड सुद्धा आहे...", निलेश. कुत्रा आणि माकड सिनेमात असणं म्हणजे जास्तच एंटरटेनमेंट.
"सॉलीड सिनेमा असणार राव मग...तु लवकर उरकुन घरी ये. आज मी शेवटपर्यंत सिनेमा पाहणार.", मी. निलेशला माझ्यासारखीच सिनेमाची आवड होती फरक एवढाच की मी सिनेमा पाहताना मध्येच झोपत असे आणि तो मला
सारखा हलवुन जागा करी. मी कधीच कुठलाही सिनेमा शेवटपर्यंत पाहिला नाही आणि टी व्ही सुद्धा कधी बंद केला नाही. पण सकाळी उठल्यावर टी व्ही कुणी बंद केला यापे़क्षा मी कुठल्या सीन नंतर झोपलो याचीच जास्त उत्कंठा असायची. निलेशला बिचार्‍याला दरवेळेस मला राहीलेल्या सिनेमाची स्टोरी सांगावी लागत असे.

एकदा मी नाना पाटेकरचा सिनेमा पाहुन शनिवारी सकाळी शाळेत गेलो. त्या दिवशी नाना पाटेकर माझ्या अगदी अंगात भिनलेला होता. त्यात इतिहासाच्या तासाला आमचे पाटील सर हे क्रांतीवीर नाना पाटीलांचा धडा शिकवत होते. शिकवता शिकवता त्यांनी अचानक माझ्या शेजारी बसलेल्याला उभं करुन नाना पाटीलांविषयी एक प्रश्न विचारला. त्याला उत्तर येत नव्हतं म्हणुन त्याने मला खुण केली. मी ही दिलं फेकुन ...नाना पाटीलांच्या ए॑वजी नाना पाटेकर. त्याने ही दिलं तेच उत्तर नाना पाटेकर म्हणुन. सगळ्या वर्गात हशा. मग काय पाटील सरांच्या अंगात माझा नाना पाटेकर घुसला आणि त्यांनी बिचारयाला चांगलचं झोडपलं. त्या मित्राचा अगदी कालपर्यंत असा गैरसमज होता की मी त्याला नाना पाटील म्हणालो पण त्यानेच नाना पाटेकर ए॑कलं. नुकताच त्याचा हा गैरसमज जेव्हा मी दुर केला तेव्हा त्याला माझ्या इनोसंन्ट चेहर्‍यामागचा खरा शैतानी चेहरा दिसला.

आमच्या घराच्या बाजुला त्यावेळी व्हिडीओ वर सिनेमा दाखविण्याचा उद्योग एकाने सुरु केला होता, तो माझा मित्रच होता. मग काय सिनेमा कुठलाही असो माझी उपस्थिती तिथे सन्मानणीय असायची. एकदा त्याने 'शोले' सिनेमा दाखविला. शाळेतली झाडुन सारी मुलं सिनेमा बघायला आली यात माझा थोडाफार हात होता. शाळेत जेव्हा याचा शोध लागला तेव्हा मग काय आम्हा सर्वांना समोर घेऊन चांगल्या छड्या मारण्यात आल्या. त्यानंतर माझे मित्र कित्येक दिवस मला सारखे 'कितने आदमी थे रे शोले देखेने...?" असं विचारायचे. :-)

रविवारच्या संध्याकाळच्या सिनेमासाठी मी आणि आमच्या घरचे सारेच, अगदी चारच्या आत सगळ काही आवरुन तयार होत असे. मग चार वाजता चहा घेता घेता आम्ही सारे अशोक सराफ, लक्ष्मीकांतचे सिनेमे पाहत असु. पण आमचे एक सर मात्र मुलांनी सिनेमा पाहण्याच्या अगदी विरुद्ध होते आणि त्यासाठीच ते सगळ्यांच्या घरी या वेळेत जायचे आणि जो सिनेमा पाहताना दिसेन त्याला झोडपायचे. मला याची कुणकुण अगोदरच लागली होती. म्हणुन मी घरी बाहेर जातो म्हणुन सांगितलं आणि स्वत: दरवाजावरुन पोटमाळ्यावर चढुन कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी सिनेमा पाहत बसलो. सर खाली चहा पित आहेत आणि मी पठ्या त्यांच्या वर बसुन सिनेमा पाहतोय असं त्यावेळी चित्र होतं. सिनेमा पाहण्यासाठी मी असे बरेच प्रकार केले आहेत.

सिनेमाच्या वेडापायी बराच वेळा मी सिनेमात जे दिसेन ते करायचा प्रयत्न करायचो. शाहरुख सारखे केस पुढे आणणं, गोविंदा सारखी शिटी वाजविणे, ते सिनेमातले डायलॉग्ज म्हणणं वगैरे. माझा भाऊ सुद्धा माझ्या एवढा नाही पण बरयापैकी फिल्मी होताच. इंजीनिअरींगला असताना तो उगाचच मायनस नंबरचा चष्मा घालायचा आणि आपण खुप अभ्यास करण्यातल्या कॅटॅगरीतले आहोत अस दाखवायचा. नंतर नंतर त्याने त्याच्या पॅन्ट सुद्धा बेल बॉटम घालणं सुरु केलं होतं पण तो पर्यंत ती स्टाईल गेली होती. माझी बहिण सुद्धा फिल्मी प्रकाराला अपवाद नव्हती. तिला करीश्मा न जाणो का पण आवडायची. मग तिच्यासारखे केशरचना करणे सारखे प्रकार आलेच. थोडे पुढचे केस मुलांसारख्रे उजव्या हाताला वळविणे व ते मधुन अधुन मानेला झटका मारुन मागे सारणे असा प्रकार तिने एकदा केला होता. पण नंतर मातोश्रींनी त्याला भलतीच उपमा दिल्याने तो लगेचच बंद झाला. माझ्या स्वभावगुणानुसार मला एकच हिरो वा हिरोइन जास्त दिवस आवडले नाही. सूरुवात राज कपुर पासुन करुन मी अगदी शाहरुख पर्यंत सगळ्यांना फॉलो केलं. कोणी एके काळी मला मिथुनदा ही आवडायचा हे मी आज सर्वांसमोर मान्यही करतो. शाळेत असताना मी भलताच फिल्मी प्रेमी होतो, पण कॉलेज मध्ये माझं हे वेड बरंच कमी झालं. नोकरीला लागलो आणि या वेडाला पुन्हा पालवी फुटली. एकदा असाच एका मैत्रीणीबरोबर सिनेमा पहायला थिएटरला गेलो आणि मध्यांतराला कळलं की माझ्या पुढे दोन तीन सीटवर माझेच एक मित्र आणि वहिनी बसलेल्या आहेत. मग काय, सिनेमा संपायच्या आतच मी मैत्रीणीला घेऊन थिएटरच्या बाहेर. तसं माझं आणि तिचं काही नव्हत पण दोघेच सिनेमाला आलोय असं जर त्याला दिसलं असतं तर त्याने मला आयुष्यभर त्याच विषयावर चिडवलं असतं.

असं हे माझ चित्रपटांचं वेड, हवंहवंस पण नामानिराळं !

मी
वीस वर्षे
अंदाजे १५ भाषा
१० वा अधीक देशांचे
४००० पे़क्षा जास्त सिनेमे
ज्यात १०००० हुनी अधिक कलाकार
प्रत्येक सिनेमात हाताळलेला नविन विषय
दररोज एक तरी सिनेमा पहायचा असं समीकरण
आणि हे वेड आयुष्याच्या शेवटपर्यंत जोपासण्याचा ध्यास...

- अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. फुंकर
२. मी 'पुरुष' बोलतोय !
३. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Monday, December 14, 2009

फुंकर

"जीवन म्हणजे ऊन पावसाचा खे़ळ आहे. जसं उन्हामागुन पावसाळा येतो तसंच दु:खामागुन सुख येतं,,," हे वाक्य मी शाळेत असताना नेहमी ए॑कायचो. कधी हे वाक्य सुविचाराच्या फळयावर लिहिलं असायचं तर कधी ते कुठल्यातरी निबंधाच्या पुस्तकात असायचं. त्या काळी मला या जीवनाबद्दलच्या वाक्यांमधले शब्द भारी भारदस्त वाटायचे पण कधी अर्थ समजला नाही. अर्थ समजावुन घ्यावं असही कधी त्या कोवळ्या वयात वाटलं नाही. आयुष्यातली एकेक वर्ष जसजशी कमी होत गेली तसतसं या शब्दांचा अर्थ मला गवसत गेला पण जीवनाबद्दलच गुढ मात्र वाढतच गेलं. आज ही जेव्हा मी मागे वळुन फळ्यावरचं ते वाक्य डोळ्यासमोर आणतो तेव्हा मला काहीतरी नवाच अर्थ गवसलेला असतो. हे जीवन अजुनही मला दररोज काहीतरी नवीन शिकवायचा प्रयत्न करतं.

जीवन हेच मुळी खुप संमीश्र असतं. कधी ते तुम्हाला खुप हसवेन तर कधी अचानक डोळ्यातुन पाणीही काढेन. 'जगी सर्वसुखी असा कोण आहे..?", सर्वसुखी असा कुणीच नाही, भोग हे प्रत्येकाच्याच वाटयाला असतात. फरक एवढाच की त्यांचा काळ वेगळा असतो. कुणाला मुल होत नाही याचं दु:ख तर कुणाला मुलगा होत नाही याच दु:ख तर कुणाला मुलगा सांभाळत नाही म्हणुन काळजी. कुणी प्रियकर किंवा प्रेयसी शी भेट होत नाही म्हणुन दु:खी तर कुणी लग्न होत नाही म्हणुन चिंतातुर तर कुणी लग्न झाल्यावर नवरा/बायको पहिल्यासारखं प्रेम करत नाही म्हणुन खट्टु. कुणी संसारात नवरयामुळे सुखी नाही तर कुणी सासुमुळे. कुणाला एकट जगण नकोसं झालय तर कुणाला एकत्र कुटुंबात राहण मान्य नाही. कुणी नोकरी नाही म्हणुन वणवण भटकतोय तर कुणी खुप काम आहे म्हणुन अस्वस्थ तर कुणी नोकरी करुन कंटाळलेला. प्रत्येकजण कशात ना कशात तरी अडकलेला. विवंचना पत्येकालाच आहेत कारण वेगवेगळी फक्त.

लहान असतानाची लवकर मोठं होण्याची इच्छा जेव्हा पुर्ण झाली तेव्हा त्या आनंदाला एक दु:खाचीही किनार होती. जसजस वय वाढत गेलं तसतसा मी मोठा झालो पण या मोठ्या लोकांचे प्रश्न ही मोठेच ना. बरयाच वेळेला माझ्याही आजुबाजुला वादळं घोंघावली. कधी कधी मी त्यात सापडलो, धडपडलो तर कधी सहीसलामत बाहेर ही पडलो. जेव्हा खाली पडलो त्यानंतर एका नवीन उमेदीने उभाही राहीलो. अशाच वादळांनी मला शिकवलं पाय रोवुन उभं रहायला. आजुबाजुला सगळ्या गोष्टी जेव्हा जमीनदोस्त होत असतात तेव्हा डोकं शांत ठेवुन पुढची वाटचाल करायला आणि पुन्हा आपल्या जहाजाचं शीड उभारुन नवीन किनारा शोधायला. नवनवीन आव्हान असली तर मजा येते जगण्याला नाहीतर मिळमिळीत आयुष्य काय कामाचं ? परीक्षा नसेन तर आपण कधी पायरी चढुच शकणार नाही. आव्हान येतात ते आपल्या बाहुतलं बळ पहायला. त्या आव्हानाला परतुन लावण्यासाठी तुमचे बाहु तेव्हा फुगले पाहिजेत. त्यांना घाबरुन जो पळतो त्याच्याचमागे ते हात धुऊन लागतात.

तुम्ही कधी वर्तमानपत्रातली 'वाघाला बकरी जवळ घेउन जाणारा रस्ता शोधा" हे कोडं सोडवलंय का ? त्यात एका टोकाला वाघ, एका टोकाला बकरी आणि मध्ये रस्त्यांचं जंजाळ असतं. त्यात बरेच रस्ते हे फसवे असतात तर काही मध्येच संपणारे. काही रस्ते आपल्या जिथुन सुरुवात होते तिथेच पुन्हा घेऊन येतात. त्यातला एकच रस्ता असा असतो जो आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातो. तुम्हाला नेमका तोच रस्ता शोधायचा असतो. तुम्ही जर अशी कोडी उलटी सोडविलीत म्हणजे उत्तरापासुन सुरुवात करुन प्रश्नाकडे पोहोचायचं तर तुम्ही लवकर कोडं सोडविण्यात यशस्वी होता. आपल्या आयुष्यात अशीच कोडी आपल्याला सोडवायची असतात. एक कोड सुटलं की दुसरं मग तिसरं. उसंत मिळाली तर ठीक नाहीतर चालुच. देव आपल्याला असे प्रश्न सोडवायला देऊन आपली परीक्षाच घेत असतो. उत्तराकडुन जर प्रश्नांच्या दिशेने प्रवास केला तर असे आयुष्यातले मोठे प्रश्न ही सुटू शकतील.

जेव्हा जेव्हा असे कठीण पसंगातुन तुम्ही जात असता तेव्हा आपलीच माणसं कधीतरी खुप दुर गेल्यासारखी वाटतात तर कधी तो एकदम परकी आहेत अस भास होतो. माणुस म्हणजे तर्‍हेवाईकपणा आलाच. काहींचा तो स्वभावगुण असतो तर काहींचा तो कावा. जेव्हा तुमचं दु:ख कधी अनावर होईन, सगळे जवळचे परके वाटायला लागतील, जेव्हा देवाने टाकलेला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेनासं होईन, जेव्हा तुम्हाला असं वाटेन की आता मी अगदीच एकाकी पडलोय किंवा अगदीच अगतिक झालोय तेव्हा ... तेव्हा आपलं दु:ख कुणाजवळ तरी मो़कळ करावं, त्याला वाट करुन द्यावी. अशावेळेस बोलावं, भरपुर बोलाव अगदी मोठमोठ्याने ओरडावं आणि आतला ज्वाला बाहेर आणावा. काहीही झालं तरी बोला, सांगा, शेअर करा.

२-३ दिवसापुर्वी एका मैत्रीणीशी बोलत असताना तिने असंच तिचं मन मोकळं केलं आणि मग मला तिची होणारी फरफट, तिचा त्रागा समजला. एखादी व्यक्ती आयुष्यात एवढं कसं काय सगळ सहन करु शकते ? एखाद्याला इतकं सहनशील होता येतं ? कधी कधी वाटतं की मी माझ्या आयुष्यात अजुन काहीच वादळ झेलली नाहीत. लोकांची दु:ख पाहिली की माझी दु:ख मला खुप छोटी वाटु लागतात. लोकांची दु:ख समजुन घेण्याबरोबरच ती कमी कशी करता येतील याचा मी बराच वेळा विचार करतो पण उत्तर मात्र सापडत नाही.

"भाजलेल्या जागेवर फुंकर मारुन वेदना कमी करता येतात पण एखाद्याच्या पोळलेल्या मनावर कशी फुंकर मारायची, कुणी सांगेन का मला...?"

-अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. मी 'पुरुष' बोलतोय !
२. यंदा कर्तव्य आहे ?
३. ब्राईड-हंट
---------------------------------------------------------------------------------

Wednesday, November 25, 2009

मराठीतच बोला...

आजकाल जिकडे जाऊ तिकडे मराठी मराठी चा गजर ए॑कु येत आहे. अशीच एक ऑडीओ क्लिप इथे ए॑कायला देत आहे. विचार करायला लावणारी ही क्लिप आहे. जरुर ए॑का.
-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. ब्राईड-हंट
२. मी 'पुरुष' बोलतोय !
३. यंदा कर्तव्य आहे ?
४. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
---------------------------------------------------------------------------------

Thursday, November 19, 2009

मी 'पुरुष' बोलतोय !

दचकलात ना ? विचार करत असाल की आज अचानक पुरुष कसा काय बोलायला लागला आणि नेमकी त्याला अशी बोलायची का गरज पडली. सांगतो...आज १९ नोव्हेंबर, जागतिक पुरुष दिन. कित्येक जणांना तर आज पुरुष दिन आहे हेच मुळी माहित नसेन. पुरुषप्रधान असं म्हणवल्या गेलेल्या समाजात जेव्हा फक्त स्त्री दिनच साजरा व्हायला लागला तेव्हाच मला जाणवलं की मला आता बोललचं पाहिजे. मी इथे माझ्या न्याय, हक्क, अधिकार अशा कुठल्याही गोष्टी संबंधीच भाष्य करायला आलेलो नाही. फक्त पुरुषांच्या चार मनातल्या गोष्टी तुम्हा सर्वांना समजाव्यात म्हणुनच मला वाटलं की आज मला माझी कैफियत मांडलीच पाहिजे.

तुमच्या आजुबाजुला तुम्ही मला अनेक रुपात पहात असता. कधी बाप, कधी मुलगा, कधी नवरा तर कधी भाऊ. माझा जन्मच मुळी असतो ते जबाबदारी पार पाडण्यासाठी. प्रत्येक रुपामध्ये मला माझ्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडावी लागते. अगदी लहानपणापासुनच माझ्या मनावर बिंबवल गेलं की तुला भरपुर अभ्यास करायचाय, अभ्यास करुन मोठं व्हायचंय. मोठं होणं म्हणजे दाढी-मिश्या येणं हेच त्याला ज्या वयात समजत असतं त्यावेळेस त्याच्यावर करिअर चा ताण येतो. करिअर, पैसा हेच आपल उद्दिष्ट आहे आणि ते जर असेन तर बाकी काही ही मिळवता येत हे माझ्या मनावर बिंबवल जात आणि एवढ्या लहान वयापासुनच मग सुरु होतो संघर्ष.. जगण्यासाठी आणि आपल्या वर अवलंबुन असणारया लोकांना जगविण्यासाठी.

जसा जसा मी मोठा होतो तसा माझ्यावरच्या जबाबदारीची मला जाणीव करुन दिली जाते. करिअर, पैसा या गोष्टी सर्वस्व आहेत आणि ते कमावताना मी स्वत:चे छंद, आवडी निवडी हे सुद्धा विसरुन जातो. पुरूषाने बाहेरची कामे करावीत आणि घरी पैसा आणावा. त्यातुन मग त्याच्या बायकोने घर संसार चालवावा असा या समाजाचा नियम. बाहेरच्या जगात वावरताना मला हजार गोष्टींना तोंड द्यावं लागतं. कित्येक प्रकारचे टेन्शन असे असतात की मी ते मनमो़कळेपणाने कुणाला सांगु ही शकत नाही. अशी सर्व प्रकारची दु:ख मग मी स्वत:च गिळायला शिकतो. यातुनच मग माझा स्वभाव शांत शांत तर कधी तापट बनतो. कदाचित म्हणुनच प्रत्येकाचे वडील एकतर खुप शांत, समंजस वा एकदम तापट असतात. हा समाजच पुरुषाला असं बनवतो.

बरयाच वेळा मी सकाळी लवकर कामाला निघतो, दिवसभर काम-काम, रात्री लवकर जाऊन बायको-मुलांबरोबर थोडा वेळ घालविण्याची इच्छा असते पण बरयाच वेळा कामामुळे ती ही पुर्ण होत नाही. मुलांना मी फक्त रविवारीच दिसत असेन ते पण आठवड्यातील तुंबलेली काम करताना. वडील म्हणजे एक कामाला जुंपलेला बैलच जणु. आपल्या मुलांबाळांच्या प्रत्येक गरजा पुर्ण करण्यासाठी मी रात्रंदिवस झटत असतो. कधी बायकोच्या मागण्या, कधी मुलांचे हट्ट, कधी आई वडीलासाठीची कर्त्यव्य पुर्ण करता करता माझं तारुण्य माझ्या हातातुन कधी निसटुन जातं हे मला ही समजत नाही. टक्कल फक्त पुरुषालाच का पडतो वा पुरुषाचेच केस लवकर पांढरे का होतात असा जर तुम्हाला कधी प्रश्न पडलाच तर हे त्याच उत्तर. माझ्या आजुबाजुच्या, जिवलगांसाठी मी अगदी जेवढं काही शक्य आहे ते करतो. मी जर हे सगळ करता करता गचकलोच तर माझ्या मागच्यांचं काय हा प्रश्न मला नेहमीच सतावत असतो. त्यासाठीच मी स्वत:चं मरण सुद्धा 'इन्शुअरड' करुन ठेवतो.

बरयाच वेळा असा आरोप होतो की 'पुरुष हे कठोर असतात'. खरच सांगतो तुम्हाला, मी वरुन कितीही कठोर वाटलो तरी आतुन तसा बराच हळवा आणि संवेदनशील आहे. पण हा हळवेपणा मला कधीच समोर आणता येत नाही, अगदी मनात असुनसुद्धा. मी जेवढा कठोर तेवढाच वेळप्रसंगी एका स्त्री पेक्षा जास्त हळवा होतो. मुलगी सासरी जाते तेव्हा त्या बापाचं दु:ख त्यालाच माहित. सगळेजण जेव्हा तिला निरोप देत असतात तेव्हा आयुष्यात कधीही न रडलेल्या बापाच्या डो़ळ्यांत सुद्धा पाणी तरारतंच. तो बाप म्हणजे मी, एक पुरुषच. मला एका पुरुषापेक्षा एक स्त्रीच जास्त समजावुन घेऊ शकते. म्हणुनच मुलाचं आणि आईचं तर मुलीचं आणि वडीलांचं जास्त पटत असावं.

मला स्वत:चं दु:ख जाहिरपणे मांडण्याची मुभा नसते. माझं सर्वात मोठं दु:ख म्हणजे मी दु:खातही डोळ्यांत अश्रु आणु शकत नाही. पुरुषाचा पुरुषार्थ हा दुसरयांचा आसवं पुसण्यात आहे, स्वतःचं दु:ख दाखविणे हा माझा दुबळेपणा समजला जातो. एखादी स्त्री जशी मनमो़कळेपणे रडु शकते तसा मी नाही करु शकत. रडणं हा प्रांत आतापर्यंत स्त्रीचाच मानला गेलेला आहे. पुरुष जर कधी रडताना दिसलाच तर "काय बाई बायकांसारखा रडत होता तो.." अशी वाक्य ए॑कायला मिळतात. पुरुषाने दुसरा एखादा रडत असताना त्याला धीर द्यावा, स्वतःचा खांदा त्याला रडण्यासाठी द्यावा. पण स्वत: अतीव दु:खात असताना आतल्या आत आसव गिळावित असा आतापर्यंतचा अलिखीत नियम. मला नेहमीच दुहेरी कसरत करावी लागते. स्वतःला सावरण्याची आणि स्वत:चं दु:ख गिळण्याचीही. एकदा खुप रडु आलं असतानाही डोळ्यांत पाणी येऊ न देण्याचा प्रयत्न करुन पहां, तेव्हाच समजेन तुम्हाला माझं दु:ख.

अजुन बरंच काही आहे लिहिण्यासारखं. पण कधी वेळ मिळालाच तर याच पुरूषाच्या डोक्यावरुन एकदा हात फिरवा वा त्याचा हात हातात घ्या. त्याच्या हाताला पडलेले घट्टे तुम्हाला जाणवतील. हेच हात तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी रात्रंदिवस झटत असतात. तुम्ही जेव्हा तुमच्या घरी सुखाने चार घास खात असता तेव्हा हेच हात त्या चार घासाची सोय करण्यासाठी राबत असतात हे ध्यानात ठेवा. तुम्ही कुणीही असा,स्त्री किंवा पुरुष, आपल्या जवळच्या मग ते तुमचे बाबा, मुलगा, नवरा किंवा भाऊ कुणीही असो, यांचा चेहरा एकदा डोळ्यांसमोर आणा. त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं हे आठवा आणि फक्त एकदाच त्या 'पुरुषाला' सलाम करा, सलाम करा त्याने आतापर्यंत तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी. सलाम करा...औपचारिकता म्हणुन नव्हे तर तुमच्यावरचं एक ऋण म्हणुन !

- ( हळवा ) अजय

( हा लेख म्हणजे स्त्री आणि पुरुष यात पुरुषच श्रेष्ठ वगैरे गोष्टी सांगण्यासाठी किंवा पुरुष दिनानिमित्त पुरुषांना त्यांचे न्याय हक्क वा अधिकार समजुन देण्यासाठी लिहीलेला नसुन फक्त पुरुषांच्या मनातल्या चार गोष्टी तुम्हा लोकांना कळाव्यात म्हणुन लिहीलेला आहे. स्त्री आणि पुरुष हे समान आहेत या विचारांचा मी सुद्धा आहे. तरी कूपया कुठल्याही स्त्रीने या लेखाविरुद्ध आक्षेप घेऊ नये वा स्त्री मुक्ती केंद्राची द्वारे ठोठावु नयेत :-). पुरूष हा स्त्री विना अपुरा आहे आणि स्त्री पुरुषाविना हे सत्य आहे. )


--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. ब्राईड-हंट
३. ए॑का आणि पोट धरुन हसा
४. भाषणबाजी
--------------------------------------------------------------------------------

Friday, November 13, 2009

व्यावहारीक

कधीही ट्रॅफीक चे नियम न तोडणारा मी, एकदा माझ्या हातुन चक्क सिग्नल तोडला गेला. सिग्नल तोडल्या तोडल्या मला जाणवलं की लाल दिवा असुनही मी गाडी दामटतोय आणि पोटाची टाकी झेपत नसुनही मामा माझी गाडी थांबविण्यासाठी धापा टाकत माझ्या दिशेने पळत येतोय. सगळेच मामा हे टरटरुन फुगल्यासारखे असतात आणि त्यांच्या पोटाच्या आकारावरुन त्यांची पोलिस 'खात्यात' किती वर्ष सर्व्हिस झाली असावी याचा अंदाज बांधणं अवघड नाही. मामा धावत धावत आले आणि मोठं सावज सापडल्यासारखं त्यांनी माझी गाडी थांबवली. रस्त्याच्या मधोमध मी, माझी गाडी आणि मामा असे तिघेचजण. मी चांगलाच हडबडलो.

"ल्ये हुशार बनतोयस काय .." , मामा.

"चुक झाली साहेब.पुन्हा नाही करणार.".. मी,

मामाने माझ्याकडे अगदी तुच्छपणे पाहत गाडीची चावी काढली आणि मोठ्या तोरयात पुन्हा एका झाडाखाली जिकडे तो थांबला होता तिकडे निघुन गेला. गाडीची चावीच घेऊन गेला म्हणजे मला त्याच्यापाठोपाठ जाणं भागच होतं. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे गाडीची अजुन एक चावी आहे. मी चावीच्या बाबतीत थोड विसरभोळा असल्यामुळे नेहमीच एक चावी जवळ बाळगतो. मी लगेच ती चावी काढली, गाडीला लावली, किक मारली आणि छु मंतर. जाता जाता मामाकडे पहायला विसरलो नाही. तो बिचारा हातात पावती पुस्तक काढुन माझ्या येण्याची वाट पहात होता. डुप्लीकेट चावी बनवायला १५ रु खर्च येतो, मामाने मला कमीत कमी १०० रु ला तरी कापलं असतं.

बिचारा मामा ...!!!

त्या दिवशी मालकंस वर मामाची पोस्ट वाचुन मला हा किस्सा आठवला.

- (व्यावहारीक) अजय

--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. ब्राईड-हंट
३. ए॑का आणि पोट धरुन हसा
--------------------------------------------------------------------------------

Tuesday, November 10, 2009

शिवसैनिक खवळले आणि लगेच निवळले...

आज अबु आझमीने अजुन पुढे जात बाळासाहेबांवर सुद्दा टीका केली. त्याच्या टीकेने बाळासाहेब हे काही लहान बुद्धीचे होणार नाहीत किंवा त्यांच्या ऊंचीवरही काही फरक पडणार नाही. अबु आझमी हा एक साप आहे आणि त्याचं तोंड ठेचल्याशिवाय तो गप्प बसणार नाही. पण प्रश्न असा पडतो की एवढी टीका करुनही शिवसेनेसारखा एके काळी आक्रमक असलेला पक्ष गप्प कसा बसला ? त्यांच्या आमदारांनी अबुला घेराव घातला आणि त्याला समज दिली. अबु हा साबणासारखा आहे; त्याला जे काही करायच आहे ते करतो आणि निसटुन जातो. पण शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या एका दैवताविषयी अगदी घूणास्पद टीका करुन सुद्धा शिवसेनेसारखा पक्ष, त्यांचे नेते हे अबु आझमीला घेराव घालुन सोडुन देतात. शिवसैनिक खवळले आणि लगेच निवळलेही...

--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. ब्राईड-हंट
३. ए॑का आणि पोट धरुन हसा
--------------------------------------------------------------------------------

-अजय

Monday, November 9, 2009

आझमींचे थोबाड रंगवले!

काय चुक काय बरोबर मला त्याच्या खोलात जायचं नाही कारण मी पत्रकार नाही किंवा समीक्षक ही नाही. अबु आझमीच्या भर विधानसभेत कानाखाली मारुन मनसेच्या लोकांनी त्याची खाशी जिरवली आहे. मराठी असो किंवा हिंदी, ती देवनागरीच आहे. मराठीत शप्पथ घेतली असतं तर काही बिघडलं नसतं. प्रश्न मराठीत शपथ घेण्याचा जसा आहे त्यापेक्षा तो मराठी द्वेषाचा आहे. आझमीची गुर्मी पहिल्याच दिवशी उतरवली गेली याचा मला खुप आनंद आहे. भले तुम्ही याला चुक म्हणा किंवा बरोबर म्हणा.

याच्यावर एक मोठा लेख नक्कीच होऊ शकतो, नक्की लिहीन लवकरच.

-अजय

Wednesday, November 4, 2009

यंदा कर्तव्य आहे ?

लग्न हे तसं प्रत्येकाच्याच पाचवीला पुजलेलं असतं. लग्न हे अपघातानं कधी होत नाहीत, अपघातानं मुलं होतात. लग्न जर ठरवुन करत असाल तर चॉईस असते आणि जेव्हा चॉईस असते तेव्हा थोडासा संभ्रम निंर्माण होतो. त्यात ज्याला लग्न करायच असतं त्याच्या आजुबाजुचे लोक त्याला उपदेशाचे डोस पाजत असतात,ते पण अगदी फु़कट. आतापर्यंत मी कसा दिसतो/दिसते याचा कधीही विचार न केलेले लोकही मग आरशासमोर तास न तास उभे राहुन स्वत:ला न्याहाळु लागतात. त्यांची रंगाची आवड, चॉईस सुधारते. त्यांच्या आयुष्यात मग रंगीबेरंगी फुलपाखरं उडायला लागतात. 'आभास हा...छळतो तुला, छळतो मला..." सारखी गाणी ओठांवर रेंगाळु लागतात. आपला जोडीदार कसा असावा याचं एक हलकंस चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर असतं पण ते पुर्ण दिसत नसतं. आणि शेवटी मग तो दिवस उजाडतो, त्याला सारेजण 'पाहण्याचा दिवस' म्हणतात. मनात नाना शंका, नाना प्रश्न उभे असतात. अशाच काही प्रश्नांचा, शंकाच केलेला हा ऊहापोह, तो पण अगदी रोखठोकपणे.

या जगात परफेक्ट असं कुणीही नाही. प्रत्येकाच्यात काही ना काही उणीवा आहेत. लग्न म्हणजे थोडीफार तडजोड आलीच. आपल्याला हवा तसाच व्यक्ती कधीच कुणाला मिळत नाही. त्याला तसा बनवावा लागतो.

आपल्या मनासारखीच समोरची व्यक्ती हवी असा अट्टहास कशाला? थोडे इकडे थोडे तिकडे होतच असतं. त्यात विशेष काही नाही. आपल्याला समोरच्यात नेमकं काय हवंय हे नीट ठरविल्याशिवाय पुढे जाउ नये. आपल्याला झेपेल असाच आपला जोडीदार असावा ( वजनाने झेपेल असा अर्थ अपेक्षीत नाही :-)) नाकापेक्षा मोती जड असं काही करु नका.

लग्न म्हणजे खेळ नाही तो दोन जीवांचा मेळ आहे. लग्न म्हणजे एक नवीन नात्याची सुरुवात, आपल्या आयुष्यात एक नवीन माणसाची ती असते एंन्ट्री. अशी सुरुवात खोटं बोलुन कधीही करु नये असं मला वाटत. जे काही असेन ते अगदी खरंखरं. "खोटं बोलुन लग्न जमेन ही पण टिकणार नाही "

मुलाच्या डिग्रीपेक्षा त्याचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा, डिग्री आयुष्यात कमावता येईन हो पण प्रामाणिकपणा आडातच नसेन तर पोहरयात कुठुन आणणार. मुलगा प्रामाणिक, हुशार आणि प्रेमळ असेन तर तुम्ही लग्नाची अर्धी लढाई जिंकली म्हणूनच समजा. मुलीनी मुलाचं कर्तुत्व पहावं, प्रापर्टी गौण असते. कर्तुत्व असेन तर अशा कित्येक प्रापर्टीज कमावतात येतात. मुलाने मुलीच्या सौंदर्याबरोबरच ती तुम्हाला, तुमच्या घराला किती सुट होते ते पहाव. समंजसपणा हा दोघांनी एकमेकांत पहाणे गरजेचं. तो एक गुण असा आहे जो नेहमीच तुम्हाला एकत्र ठेवायला मदत करतो.

मुलाच्या किंवा मुलीच्या फोटोवरुन ती व्यक्ती दिसायला तशीच असेन असा ग्रह करुन घेऊ नये. आयुष्यभर पॅराशुटचं तेल लावणारी मुलगी सुद्धा लग्नासाठीच्या फोटोमध्ये केस मोकळे सोडतेच. त्यामुळे मोकळे केस दिसले की हुरळुन स्वप्नांचे मनोरे बांधू नये. फोटोवरुन अंदाज बांधावा किंवा कल ओळखावा. खरा चेहरा हा पहाण्याच्या कार्यक्रमातच दिसतो.

मुलींना नाहक अवघड प्रश्न विचारु नका. ती जर सॉफ्टवेअर इंजीनिअर असेन तर ती C++ की JAVA यापेक्षा ती तुम्हाला दोन वेळ जेवण करुन घालु शकेल काय हा प्रश्न जास्त समर्पक आणि महत्त्वाचा. स्त्री ही आतापर्यंत घरातच रहात असे त्यामुळे स्त्रीला बाहेरच्या जगातलं ज्ञान हे तसं पुरुषाच्या तुलनेत मर्यादित असतं. ( समस्त स्त्री वर्गाची माफी अगोदरच मागत आहे ) त्यामुळे तुम्हाला अगदी हवेत तशीच उत्तरांची अपेक्षा मुलींकडुन करु नका. मुलींनी मात्र ही अपेक्षा करावी. मुलगा हा बोलण्या चालण्यात स्मार्ट असलाच पाहिजे.

हिच्यापेक्षा ही जास्त चांगली वाटते किंवा ह्याच्यापेक्षा हा चांगला , असा प्रकार शक्यतो करु नये. एकदा का तुम्हाला वाटला की मला समोरची व्यक्ती जोडीदार म्हणुन पसंद आहे तेव्हा तिथेच थांबाव. एकदाच निर्णय घ्या पण विचार करु घ्या. आवडीनिवडी झाल्यानंतर ही तुम्ही तुलना करायला गेलात की हाती दु:ख आलंच म्हणुन समजा.

असं म्हणतात की मुलीच्या आई वरुन मुलगी कशी असेन हे ओळखावं. त्यामुळे आईच्या बोलण्याकडे लक्ष राहुद्यात. ( म्हणजे तिच्याकडेच पहातच रहा असं मी सांगत नाही ! )

पाहण्याच्या कार्यक्रमात आपल्या बरोबर जे लोक असतात त्यांची जबाबदारी असते ती वातावरणनिर्मिती करण्याची. एक हलकफुलक वातावरण करुन देणे आणि निर्णय घेण्यासाठी मदत करणे एवढंच. निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो. मित्राला उगाचच विचारु नका की मुलगी तुला कशी वाटली. लग्न तुला करायचं असतं. त्याच्याशी आवडलेले आणि खटकलेले मुद्द्यांबाबत जरुर चर्चा करा, निर्णय सर्वस्वी तुमचा असतो.

लग्नाला उभ्या राहिलेल्या सगळ्यांच्या मनातला एक खदखदता प्रश्न - मी १ तासाच्या भेटीत आयुष्यभराचा जोडीदार कसा निवडु ? तो त्या एका तासात चांगलाच वागणार ! प्रश्न बरोबर आहे. त्यामुळे लग्न ठरवायच्या अगोदर किमान एकदा तरी बाहेर भेटुन गप्पा माराव्यात. आपल्या अपेक्षा आणि समोरच्या व्यक्ती च्या अपेक्षा मॅच होणे महत्वाचं. याला मी स्वत: फ्रिक्वेन्सी मॅच होणं अस म्हणतो. माणुस स्वत:चा स्वभाव बदलु शकत नाही त्यामुळे अशा भेटीतुनच समोरच्याचा स्वभाव जाणुन घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्हीसुद्धा अशा भेटीत तुम्ही जसे आहात तसेच स्वत:ला प्रेझेंट करा, उगाचच ढोंगीपणा काय कामाचा ?

मुली पहायला जाताना अगदी आपल्याला सुट होईन असाच फॉर्मल ड्रेस घालावा. लेंस नसलेले शुज,पायाची तिरकी घडी जरी घातली तरी उघडे पाय दिसणार नाहीत एवढे मोजे, आपल्याला सुट होईन अशा रंगाचा शर्ट आणि परफेक्ट फिटींग ची पँन्ट घालावी. पाहण्याच्या अगदी थोडावेळ अगोदर शेव्हींग करु नये. मनावर दडपण असल्यामुळे कापण्याचा संभव जास्त.
मुलींनीसुद्धा आपल्याला चांगली दिसेन अशाच रंगाची साडी, शक्यतो त्या दिवशी दुसरया कुणातरी अनुभवी बाई कडुन नेसवुन घ्यावी. बा़की मुलींच्या बाबतीत मी जास्त खोलात जात नाही. त्या सुज्ञ आहेतच.

जोपर्यंत 'दिल की तार' वाजत नाही तोपर्यंत कुणालाही हो म्हणु नका. एकदा का तुमच्या मनाने तुम्हाला सांगितल की हीच माझी किंवा हाच माझा भावी जोडीदार तेव्हा मग पुढे जा. तार वाजणं महत्वाच, त्याचबरोबर तार तुटेपर्यंत ही नाही म्हणु नका. मला याच मुलाशी किंवा याच मुलीशी लग्न करायचं असं जेव्हा मनापासुन वाटतं तेव्हा समजावं की आपली तार वाजली म्हणुन.

स्वत: बॅचलर असतानाही लग्नासंबंधीचे उपदेश करणं मला जड जात होतं त्यामुळेच खुप दिवसांपुर्वी लिहिलेली पोस्ट मी नको नको म्हणत शेवटी आज पोस्ट केलीच. पण लग्न करण्यासाठी थोडंच लग्नाचा अनुभव असण गरजेच असतं, नाही का ?

-अजय

--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. ब्राईड-हंट
२. ए॑का आणि पोट धरुन हसा
3. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे

Sunday, November 1, 2009

एल्गार - सुरेश भट

सुरेश भटांची ही कविता जेव्हा जेव्हा मी वाचतो तेव्हा एका एका ओळीत मी हरवुन जातो. सुरेश भटांच्या शब्दात किती ता़कद असते ते ही कविता वाचल्यावरच उमगतं.

अद्यापही सुरयाला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही

येथे पिसुन माझे काळीज बैसलों मी
आत्ता भल्याभल्यांचा हातात डाव नाही

हे दुख राजवर्खी...हे दुख मोरपंखी...
जे जन्मजात दुखी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू - कोठे पहाट झाली?
त्यांच्यापल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तनाव नाही

झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही

गर्दित गारद्यान्च्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मडयाला आता उपाव नाही

जावे कुण्या ठिकाणी उद्वस्त पापियांनी?
संतांतही घराच्या राखेस भाव नाही

उचारणार नाही कोणीच शापवाणी...
तैसा रुशिमुनिंचा लेखी ठराव नाही

साद्याच माणसांचा एल्गार येत आहे...
हा थोर गान्डूळाचा भोंदू जमाव नाही !

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

एल्गार - सुरेश भट

Tuesday, October 20, 2009

ठोश्यास ठोसा

प्रसंग अगदी साधा, स्थळः पुणे सेंन्ट्रल, वेळ: शुक्रवार, संध्याकाळचे ४ वाजले असतील, मी जिन्स ट्रायल साठी ट्रायल रुमच्या बाहेर उभा. आत कुणीतरी होतं त्यामुळे तो बाहेर येण्याची वाट पहात मी उभा होतो. एक मुलगा हातात जीन्स आणि टी-शर्ट घेउन माझ्या समोर माझ्या पुढे येउन थांबला.
"दोस्त, प्लीज फॉलो द क्यू", मी त्याला अगदीत शिस्तीत म्हणालो."
"अरे यार एक ही जीन्स और एक शर्ट ट्राय करना हे, दो मिनीट लगेंगे सिर्फ", अगदी बेफिकीरपणे. कदाचीत कॉलेजकुमार असावा.
"मुझे भी दो ही मिनीट लगनेवाले है, और मै तेरे पहले से यहा खडा हूं.",माझा आवाज थोडा करडा झाला होता. तसा मी भांडणाच्या प्रवूत्तीचा नाही.माझ्या आजुबाजुच्या कुणालाही विचारा.
"खालीपिली तकतक क्यु कर रहा है".
"तकतक तु कर रहा है या मै"..मी एव्हाना पुरता गरम झालो होतो. कारण नसताना पुढचा मला डिवचत होता.
"जा नही हटुंगा इधरसे ,जो करना है वो कर"
आतापर्यंत बोलाचालीवर असलेली भांडण आता मारामारीवर येणार हे मी समजुन चूकलो होतो. समोरुन आव्हान मिळालं होतं. मी जर आता मागे हटलो तर मी पळपुटा ठरणार होतो.
"देख मै तुझे प्यार से बोल रहा हूं, लाइन मे मै तेरे से पहले आया हू", मी
"जा..नही पिछे हटता, जो करना है वो कर, तेरे बाप का मॉल है क्या"
त्याने माझा बाप काढला आणि क्षणार्धात माझा हाताची एक सणसणीत त्याच्या कानाखाली पडली. कानाखाली एवढ्या जोरात होती की तो दरवाजावर जाऊन आदळला आणि माझ्या हातालासुद्धा मुंग्या आल्या. त्याच्या डोक्याला दरवाजा लागला असावा. माझा हात लगेच बेल्टकडे गेला. बेल्ट काढणार तेवढ्यात आवाज ए॑कुन आजुबाजुचे चार लोक धावत आले. त्यात एक बाई सुद्धा होती. त्या मुलाला उठायचंसुद्धा समजत नव्हत. एकाने त्याला हात दिला. मला दोन लोकांनी धरलं.
तो मला वाटेल त्या शिव्या देत होता. मला ही जोर आला होता. मला धरलेल्या दोन लोकांना बाजुला सारुन मी त्याला लाथा मारायला सुरुवात केली. एखादी लाथ बसली असेन त्याला. त्याची ही एक लाथ मला बसली. आजुबाजुच्या लोकांमूळे
प्रकरण आवरलं गेलं. त्याने तुला दाखवतो अशी धमकी दिली. मी त्याला उभा कापेन असं प्रत्युत्तर दिलं. आजुबाजुचे लोक काय झालं म्हणुन विचारु लागले. एव्हाना मी थोडा शांत झालो होतो. सगळा रागरंग ओळखुन त्या मुलाने काढता पाय
घेतला. मी ही मग जास्त ताणुन न धरता माझ्या खाली पडलेल्या जीन्स उचलल्या. मुड पुरता खराब झाला होता. जीन्स ट्राय करुन मी ही तिथुन निघालो. आयुष्यात कदाचीत पहिल्यांदाच कुणावरतरी मी हात उचलला असेन.
लहानपणी एकदा माझ्या अंगावर एका पुढ्च्या वर्गातल्या मुलाने( सिनीअर ) शर्टवर शाई उडवली होती. त्याच्यावरुन माझी व त्याची भांडण झाली होती. त्यानंतर एवढ्या वर्षानंतर माझी कुणाशी मारामारी झाली असावी. मी जेव्हा होस्टेलला रहायला होतो तेव्हा माझा एक रुम पार्टनर मुस्लिम होता. एकदा आमची कशावरुन तरी भांडण झाली. त्याने माझं अवसान ओळखुन मला दम टाकला होता.
"साला मी मुसलमान आहे, हड्डी मांस खाउन बडा झालोय. कापाकापी मला नवीन नाही. बघायचय का तुला एकदा."
" तु मुसलमान असशील तर मी ९६ कुळी मराठा आहे. आणि मराठा एवढ्या दिवस काय करत होता हे तुला ही माहितेय. एकतर स्वत: तरी मरेन नाहीतर तुला तरी मारेन." हे उत्तर ए॑कुन नावाचा मुसलमान सुदधा नंतर माझ्याशी जपुनच
वागायला लागला होता.
मी आयुष्यात कधीही कुणाशी आपणहुन भांडण केलेली नाहीत, पण पुढुन जर आव्हान मिळालं तर मात्र माझं रक्त खवळल्याशिवाय रहात नाही हे ही तितकंच खरं.


--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
२. ब्राईड-हंट
३. यंदा कर्तव्य आहे ?
४. ए॑का आणि पोट धरुन हसा
--------------------------------------------------------------------------------

-अजय

Friday, October 16, 2009

पुन्हा एकदा, ए॓का आणि पोट धरुन हसा

मागच्या वेळेस मी ए॓का आणि पोट धरुन हसा मध्ये बाबुराव च्या काही MP3 फाईल्स इथे अपलोड केल्या होत्या. त्या ए॑कल्या नसतील तर येथे टिचकी मारा. ९४.३ टोमॅटो एफम कोल्हापुर वरुन हा बाबुराव लोकांना फोन करुन त्यांची खेचत असतो. पुन्हा काही नवीन MP3 फाईल्स इथे अपलोड करत आहे. मीनल ने या फाईल्स दिल्याबददल तिचे आभार.

१. baburao employment

Get this widget | Track details | eSnips Social DNA


२. baburao konda
Get this widget | Track details | eSnips Social DNA३. baburo zad
Get this widget | Track details | eSnips Social DNA


आपल्या प्रतिक्रियेचे स्वागत आहे.प्रतिक्रिया देतानातरी निदान कंजुषपणा करु नका!

-अजय

------------------------------------------------------------------------------------
१. ब्राईड-हंट
२. यंदा कर्तव्य आहे ?
३. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
------------------------------------------------------------------------------------

Saturday, October 10, 2009

'राज'कारण(२)

या ब्लॉग वरचे सर्वात जास्त वेळा पाहिले गेलेले पोस्ट वाचा.
१. ए॑का आणि पोट धरुन हसा
२. ब्राईड-हंट
3. हा एक खरा घडलेला प्रसंग आहेमी माझ्या 'राज'कारण(१) या भागात सांगितले होतं की यावेळेस महाराष्टाच्या लोकांच्या मनात प्रचंड राग, असंतोष असुनही पुन्हा सोनियांबाईंचं आणि शरदबाबुंच्या काँग्रेसचं सरकार येईन. शिवसेना आणि भाजपा मध्ये त्यानंतर फूट पडेन. मनसे ला ६-७ जागा मिळतील. यापेक्षा जर त्यांना जास्त जागा मिळाल्या तर तो त्यांच्यासाठी बोनस ठरेन असा मा़झा अंदाज आहे. मला स्वतःला शिवसेना-भाजपाचा सरकार आलं तर खुप आनंद होईन आणि तेच आतातरी महाराष्ट्राच्या हिताचं असेन. राजची भुमिका मोठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कदाचीत काँग्रेस आघाडीला जर सरकार बनविण्यासाठी काही आमदारींची गरज असेन तर तो ती पुरी करु शकतो. युती आणि आघाडी दोघांकडे समसमान आमदार असतील तर मात्र राजची थोडी गोची होण्याची शक्यता आहे. कारण मराठीचा मुद्दा जर त्याला पुढे हाकायचा असेन आणि स्वत:च्या पक्ष जर सर्वदुर पोहोचावयाचा असेन तर कॉंगेसचे सरकार त्यासाठी पोषक ठरेन. युतीच सरकार मात्र त्याचे लाड खपवुन घेणार नाही याची त्याला पुरेपुर कल्पना असावी.

आज जरी काँग्रेस मनसे चा पाठींबा घेत नसेन तरी त्यांना उद्या त्यांच्याच पाया पडावं लागेन. राज ठाकरे अगदी पहिल्या दिवसांपासुन विधान करत आहेत की महाराष्ट्रात माझ्याशिवाय कुणाचीही सत्ता येणार नाही. हा राज यांचा ओव्हरकॉन्फीडन्स आहे असं काही़जण म्हणतील पण मला मात्र तसं बिलकुल वाटत नाही. कदाचीत राज ने ही गणित किंवा याचे ठोकताळे अगोदरच मांडलेले असावेत. यात विनाकरण तोटा हा शिवसेना आणि भाजपा चा होणार आहे. गेली १० वर्षे ते सत्तेपासुन दुर असुनही त्यांच्यात मोठी फूट पडलेली नाही. राज ठाकरे आणि नारायण राणे सोडुन कुणीही मोठा नेता शिवसेना सोडुन गेलेला नाही. राज ठाकरेंची शिवसेना सोडण्याची कारणे वेगळी होती. नारायण राण्यांनी शिवसेना सोडल्यामुळे शिवसेनेचे बरेच नुकसान झालेले आहे. शिवसेनेचे लोक हे जरी उघडपणे मान्य करत नसतील तरी ती वस्तुस्थिती आहे. मला उद्धव ठाकरे हे खरंच खुप कष्ठाळु नेते वाटतात आणि ते तसेच आहेत. पण त्यांच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या मात्र येत्या निवडणुकीत उट्टे काढल्याशिवाय राहणार नाही. मराठी आणि अमराठी यांच्यामध्ये सगळ्यात मोठी जर कुणाची अडचण झाली असेन तर ती उद्धवचीच. भाजपाचं मात्र ना नुकसान ना फायदा अशी स्थिती असेन. या ठिकाणी जर मी नितीन गडकरींचा उल्लेख केला नाही तर लेख अपुर्ण राहीन. नितीन गडकरींसारखा एक कष्टाळु आणि हुशार नेत्याचा फायदा महाराष्टाला करुन घेता आला नाही याची खंत आहे.

आज महाराष्ट्रात एक ना अनेक समस्या आहेत. सर्वात मोठा म्हणजे वीज. गेली १० वर्षे महाराष्ट्रात १ मेगावॅट सुद्धा वीज निर्माण झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्या शेजारचा गुजरात हा त्याच १० वर्षात विजेबाबतीत जर स्वयंपुर्ण होत असेन तर महाराष्ट्रा का नाही? मी स्वत: माझ्या गावात १२-१४ तास लोडशेडींग अनुभवलेलं आहे. लाज वाटली पाहिजे या काँग्रेस आघाडीला. केंद आणि राज्य दोन्ही ठिकाणी यांच सरकार असुनही यांना काहीच करता आलं नाही. यांचा डोळा फक्त जमीनी, भुखंड हडप करणे आणि पैसे खाणे एवढाच आहे. स्वःताची तुंबडी भरण्याशिवाय यांनी काहीच केलेलं नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे. डाळी, साखर सर्व जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडलेले आहेत. कमी दरात रेशन देण्याचं आश्वासन पाळलं गेलेलं नाही. रेशनींग ला मिळणारी डाळ ८ शिट्या केल्याशिवाय कुकर मध्ये शिजत नाही ही महिलांची तक्रार खरी आहे. गाई-म्हशी सुद्धा खाणार नाहीत असा गहु रेशनींगमध्ये दिला जातो. हे मी टाईमपास म्हणुन लिहीत नाही. कालच आयबीएन लोकमत मध्ये हे मी पाहिलंय. एकही पाण्याचा प्रकल्प पुर्ण झाला नाही आणि पवारांच्या हातात जोपर्यंत हे सारं आहे तोपर्यंत तो होणार नाही. शेतकरी दररोज आत्महत्या करतच आहेत. पॅकेज वाटली गेली पण ती किती गरजु लोकांना मिळाली हा खरंच चर्चेचा विषय आहे. शेतकर्यांना २४ तास विज, भरपुर पाणी आणि योग्य मोबदला हवा आहे, पॅकेज कसले वाटताय तुम्ही. आमचे मुख्यमंत्री मात्र हे सगळे प्रश्न सोडवायचे सोडुन झोपा काढतात, जुहु चौपाटी वर छट्पुजा साजरी करायला जातात, ज्या हॉटेल ताज मध्य अतिरेक्यांनी लोकांना अर्धनग्न करुन मारल त्याच ताज मध्ये हे रामगोपाल अणि स्वतःच्या मुलाला घेऊन साईट व्हिजीट करतात, जाहीरनामा मध्ये प्रिंटींग मिस्टेक झाली असेन म्हणुन खे खे हसतात, हाच विलास देशमुख स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी जेवढ्या वेळी दिल्ली ला गेला असेन तेवढ्या वेळेस त्याने विदर्भ-मराठवाड्यात आत्महत्या करणारया शेतकरयाना भेटी दिल्यात का हो ? अजुन असे कितीतरी प्रश्न आहेत. हे प्रश्न मी तुम्हाला विचारत नाहीये, हे प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारा आणि तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायच ते. "कानात सांगुन जर कुणी ए॓कत नसेन तर त्याच्या कानफटातच मारावी लागते..." हीच वेळ आहे ­सरकारच्या कानाखाली मारण्याची. अजुन काय सांगु , बाकी तुम्ही सुज्ञ आहातच !

-अजय

Thursday, October 8, 2009

स्वप्न..एका घराचं !

"नमस्कार, *** बिल्डर्स का ?" , मी उगाचच पुणेरी स्टाईल मध्ये, पुणेरी स्टाइल मध्ये लोक भले मग ते जांभुळवाडी चे असोत वा उल्हासनगर चे, आव मात्र आणतात सदाशिव पेठेतला आपला जन्म असल्यासारखे. म्हणजे सुरुवातीला खुप गोड बोलणार अगदी चितळेंच्या मिठाईसारखं, शिवी जरी दिली तरी पुढच्याला ती शिवी लागली नाही पाहिजे याची दक्षता फक्त टिपीकल पुणेरी लोकच घेऊ शकतात यावर मा़झा ठाम विश्वास. माझ्या ओळखीतला एका टिपीकल पुणेरी मित्राला बावळट आणि मुर्ख याशिवाय दुसरया शिव्या येत नव्हत्या आणि त्या सुद्धा देताना तो खुप लाजत असे. "आळणी मटन, ना चव ना चोथा !"

"हां जीं, मैं *** बोल रहा हूं , *** बिल्डर्स , *** प्रोजेक्ट, आंबेगाव , मैं यहा के सेल्स पर्सन हू !"...पुढुन बिहारी टोन मध्ये कुणीतरी, हा आणि जी वर दाब टाकत आणि फोन वर बोलताना सुद्धा पाठीत ४० अंशाचा कोन करुन उभा राहिल्यासारखा.

"माझं नाव अजय आहे, मला तुमच्या आंबेगाव मधल्या प्रोजेक्ट विषयी चौकशी करायची होती. थोडी माहिती द्याल का ? "

" सर, ये हमारा पुना में सबसे बडा प्रोजेक्ट हैं | ब्ला ब्ला ब्ला....." त्याने त्याची टेप चालु केली. मला कुणी भैया सापडला ना की विलक्षण आनंद होतो. आणि त्यात बिहारी म्हणजे मग तर काय, मी जाम खुष असतो. मागे एकदा मी जेव्हा ब्लॉग वर 'राज' ची स्तुती केली होती तेव्हा मला एका मुलीचं (अर्थातच बिहारी मुलीचं) ई-पत्र आलं होतं. त्यात तिने राज बद्दल बरंच काही लिहिलं होतं आणि मी त्याच्याबद्दल लिहिलं म्हणून माझा ही त्यात उद्धार केला होता. तिने बिहारी या शब्दाबद्दल आक्षेप घेतला होता. ज्यांना स्वत:ला बिहारी म्हणुन घ्यायला लाज वाटते त्यांनी स्वाभीमानाच्या गप्पा मारु नयेत, नाही का?

"मला लोकेशन सांगता का तुमचं, मी बाणेर वरुन येणार आहे", मी... जसं काही मी त्या गावचाच नाही.
"आप बाणेर से सीधा पुना-बँगलोर हाइवे से आइये. सिंहगड रोड के उपर का एक नया ओव्हरबिज जहा खत्म होता है उधर ही डाये मुडीयें, बस उधर ही हमारा प्रोजेक्ट है"...खे खे खे हसत, काही कारण आहे का हसण्याचं , पण उगाचच !
साला म्हणे पुना-बँगलोर हाइवे, पुणे असा सरळ म्हणायला काय भाडं पडतंय का, पटना लुधीयाना सारखा पुना,ठाना करुन ठेवलंय यांनी. तुमच्या 'पटना' ना 'पुतना' किंवा 'पूतणी' केलं तर आवडेल का रे तुम्हाला ? तुमची जीभ वळत नसेन तर वळवायला शिका नाहीतर आम्ही वळवु एक दिवस.

"डाये मतलब लेफ्ट का राईट ? " , माझं हिंदी तसं लहानपणापासुनच कच्च आहे. मला अजुनही कुणी ढाई असं म्हटलं तर मी त्याला विचारतो की ढाई म्हणजे १.५ की २.५. उगाचच आर.आर.पाटलांसारखं मी "बडे बडे देशोंमे ए॓सी छोटी छोटी" सारखी जड वाक्य हिंदीतुन म्हणायच्या फंदात पडत नाही. ज्यात मी स्वतःला comfortable समजतो त्यात बोलणं नेहमीच चांगलं.

"लेफ्ट लेफ्ट..." , हे म्हणताना त्याने डाव हात दोनदा हलवला असावा.

आतापर्यंतच्या संभाषणातुन मला हे समजलं होतं की ह्या माणसाला मराठी समजत असावं पण बोलता येत नसावं. तो मी हिंदीतुन बोलण्याची वाट पहात होता. पण मी त्याच्या २ पाऊला पुढचा.

"बरं बरं, मला २ बी.एच.के बद्दल थोडी माहिती देता का ?", मला या साईटची सर्व माहिती असुनही मी त्याला हे विचारत होतो कारण मला पहायच होतं की दिपावली निमीत्त यांचे काय दर आहेत. तसा या प्रोजे़क्ट ला मी एक-दीड वर्षांपुर्वी भेट देउन आलेलो आहे. पण यांचे चढे भाव ए॓कुन माझा पारा चढला होता त्यावेळेस. यांनीच नाही तर पुण्यातले सर्व प्रापर्टीचे भाव यांनी चढवलेले आहेत. याचा राग बरेच दिवसांपासुन माझ्या मनात आहे. हे असं का घडतंय याचा मी विचार करु लागलो.

सर्व भारतातले रियल इस्टेटचे दर कमी होउन सुद्धा पुण्यातले दर हे उलटे वाढतच आहेत. सर्वत्र मंदी चालु आहे किंवा थोडीफार कमी होत आहे. पण हे बिल्डर लोक खुप माजलेत आणि त्यांना माजवलयं या आपल्या पुढारयांनी. हेच पुढारी यांच्याकडुन निवडणुकीच्या वेळेस पैसा घेतात आणि मग हे बिल्डर लोक आपल्याला हवा तसा कायदा वाकवतात. अहो गेल्या ३ वर्षात चार पटीने पुण्यातले भाव वाढलेत. सामान्य माणुस पुण्यात राहु शकणार नाही याची पुरेपुर काळजी आपले नेते लोक घेत आहे. २ बी.एच.के प्लॅट पुण्यात कुठेही गेलात तरी ३०-३५ लाखाच्या खाली मिळत नाही. आयुष्यात फक्त घर घेणं हे एवढच काम नसत कॉमन मॅन चं, त्याची अनेक स्वप्नं असतात आणि ती स्वप्न ही खुप छोटी छोटी असतात. एक छोटंस घर घ्याव, दररोज लागणारया वस्तु विकत घ्याव्यात, आपल्या मुलांना चांगल्या शाळेत घालावं, त्यांच नीट शिक्षण करावं , जमलंच तर एखादी दु-चाकी घ्यावी, मुलगी असेन तर तिच्या लग्नासाठी एक एक पैसा जमवुन तिचं लग्न करावं आणि आयुष्याच्या शेवटी पेन्शन नाही मिळाली तर थोडाफार पैसा बँकेत जमा करावा. पण एवढं करण सुद्धा त्या कॉमन मॅन ला जमत नाही. घरासाठी मोठ्मोठे लोन काढा, भलेमोठे EMI भरा, महिन्याचा पगारातुन भला मोठा हिस्सा गेल्यावर राहिलेल्या पैशातुन २४ तास न मिळणारया विजेचे विजबिल, सोसायटी बिल, फोन बिल, रात्री-अपरात्री येणारया पाण्याची पाणीपट्टी, नगरपालिकेचा टॅक्स , मुलांची शिक्षणाची फी, त्यांचा महिन्याचा खर्च, महिन्याच रेशन, त्यात डाळ , साखरेचे भाव गगनाला भिडलेले, दररोज ऑफीस ला जाण्याचा खर्च, येणारे पै-पाहूणे, आजारपणं, जीवन विमाचे हफ्ते, टॅक्स वाचवण्यासाठी करावी लागणारी सोय आणि त्याचे हफ्ते ...अशा कित्येक गोष्टी या कॉमन मॅन ला त्या महीन्याच्या पगारातुन भागवाव्या लागतात. हे सगळं करता करता तो अगदी मेटाकुटीला येतो. त्याला जीव नकोसा होतो. त्याचा अख्ख आयुष्य हे हफ्ते भरण्यातच जातं. घर ही एकच गरज नसते त्याची,अजुनही कित्येक गरजा असतात त्याच्या. त्याला कोण समजावुन घेणार. कोण आणि कधी विचार करणार याचा.

(क्रमशः : हे संभाषण असंच चालु राहणार आहे )

Wednesday, October 7, 2009

ए॓का आणि पोट धरुन हसा

या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. ब्राईड-हंट
२. मी 'पुरुष' बोलतोय !
३. यंदा कर्तव्य आहे ?
४. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे

ए॓का आणि पोट धरुन हसा ---
९४.३ टोमॅटो एफम कोल्हापुर वरुन हा बाबुराव लोकांना फोन करुन त्यांची खेचत असतो. काही MP3 फाईल्स इथे अपलोड करत आहे. कालच मला एका मित्राने ह्या ऑडीओ फाईल्स पाठवल्या. पोट धरुन हसाल ए॓कताना ! हा बाबुराव म्हणजे खरंच भारी माणुस असावा.

1. Mess

Get this widget | Track details | eSnips Social DNA


२. Not For sale
Get this widget | Track details | eSnips Social DNA


याचा दुसरा भाग ए॑कलात का ? नाही ना, मग पुन्हा एकदा, ए॓का आणि पोट धरुन हसा

आपल्या प्रतिक्रियेचे स्वागत आहे.

-अजय

Monday, October 5, 2009

'राज'कारण (१)

"तुम्ही जर लाठ्या-काठ्यांची भाषा केली तर हा राज ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम हातात घेईन. तीन-साडेतीन हजार मैलावरुन इथे येउन ही भाषा नाही करायची" असं अबु आझमीला त्याच्याच भाषेत सांगणारा ठणकावुन सांगणारा, "उत्तर प्रदेशात जो उत्तर प्रदेश दिन साजरा होत नाही तो महाराष्ट्रात साजरा होतो, महाराष्ट्रात इथुन पुढे फक्त महाराष्ट्रदिनच साजरा होईन, बाकीचे कुठलेही दिन साजरे करता येणार नाहीत." असं म्हणुन संपुर्ण देशातल्या, विशेषता भैया लोकांचा राग ओढवुन घेणारा, "शांत बसतो म्हणुन काय गांडोंची अवलाद समजु नये यांनी..." असं ठाकरी भाषेत प्रत्युतर देणारा, "माझा दुसरया कुठल्याही भाषेबदद्ल राग किंवा द्वेष नाही, फक्त मराठीबद्द्ल हट्ट आहे" असं म्हणुन लोकंच्या काळजाला हात घालणारा, मराठीत पाट्या लावा म्हणून आंदोलन करणारा, आपल्या प्रत्येक विधानावर ठाम असणारा, कधी मिश्कील तर कधी तेवढ्याच आक्रमकपणे आपला मुदुदा समोरच्याला पटवुन देणारा अशी ज्याची ओळख करुन देता येइन तो म्हणजे राज ठाकरे.

Love them or hate them, But you can not ignore them असं पुर्वी मार्क्सवादी पक्षाबाबतीत म्हटलं जायचं, आता हेच वाक्य राजच्या बाबतीत अगदी योग्य वाटतय. आज प्रत्येक वर्तमानपत्रात मनसे किंवा राज ठाकरे बद्द्ल रकाणे च्या रकाणे भरुन येत आहेत. प्रत्येक चॅनेल वरती दररोज त्यांची मुलाखत होत आहे. स्वतःच म्हणण राज आजकाल खुप ठामपणे मांडत आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेस त्याच्या पक्षाने जी भरभरुन मतं मिळवली त्याचाच परिणाम म्हणुन की काय राज आजकाल खुप कॉन्फीडन्ट दिसत आहे. राज मध्ये एक करीश्मा आहे, तो म्हणजे त्याचं बोलणं, समोरच्यावर छाप पाडणे आणि तरूण-महीला वर्गाला मोहीत करणे. याच्याच बरोबर तो जे मुद्दे मांडत आहे ते लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचे आहेत. मराठीच्या गळचेपीचा मुददा, महाराष्ट्राची अस्मितेचा मुद्दा, नोकरयांचा मुद्दा म्हणा किंवा अजुन कुठलाही मुद्दा असो...राज तो मुद्दा प्रभावीपणे मांडतो.

राजचा पक्ष यावेळेस किती जागा मिळवेन याच्यापेक्षा तो शिवसेनेचं किती नुकसान करेन यातच लोकांना जास्त रस आहे असं दिसुन येतंय. राज मतं खातोय हे वरकरणी जरी खरं असलं तरी जर नीट विचार केला तर हे जाणवतय की ही वेळ एका transition ची आहे. लोकांना एक नवीन पर्याय मिळु पाह्तोय. लोक राजच्या personality किंवा राजच्या बोलण्यावर भाळुन मतं देतात असं जर कुणी म्हणत असेन तर त्याला मी नक्कीच विरोध करेन. लो़क कदाचीत अशाच एका तरूण तडफदार नेत्यासाठी डोळे लावुन बसले होते. तुम्ही नायक हा सिनेमा पाहिला असेन, त्यात अनिल कपुर एका दिवसात मुख्यमंत्री बनुन जे काही सिस्टीम बदलुन टाकतो ते बघताना आपण टाळ्या वाजवतो. राज बहुतेक त्याच नायकाच्या पावलावर पाउल टाकुन चाललाय असं कुठंतरी नक्की वाटुन जातं.

मला स्वत:ला असं वाटतं की राजला यावेळेस जास्त जागा मिळणार नाहीत, त्यालाही त्याचा अंदाज आहे. पण त्याचीही ही निवडणुक म्हणजे ट्रायल आहे. २०१४ आणि २०१९ हेच त्याचं लक्ष असेन. माझा अंदाज असं सांगतो की राजच्या जास्तीत जास्त ६-७ जागा निवडुन येतील. आघाडी सरकार विरुद्ध लोकांमध्ये खुप राग असुनही सरकार पुन्हा आघाडीचंच येईन. शिवसेना आणि भाजपा मध्ये निवडणुकीनंतर फाटाफूट चालु होईन. याच्यापेक्षा जर जास्त जागा मनसे ला मिळाल्या तर असं समजायला हरकत नाही की अजुन ही महाराष्ट्रातील लोक मुद्यावर मते देतात आणि कदाचीत अशीच मते महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन अध्याय सुरु करतील.

(क्रमशः)

-अजय

Friday, August 21, 2009

भाषणबाजी

मी काही तसा हाडाचा वकता वगैरे कधीच नव्हतो आणि अजुनही नाही. जेव्हा मी पाचवीत असेन तेव्हा मी आयुष्यातलं पहीलं-वहीलं भाषण ठोकलं होतं. ठोकलं यासाठी म्हणालो कारण ते भाषण मी एवढं पाठ करुन गेलो होतो की मला पुढची मुलं सोडुन फक्त लिहलेल भाषणच दिसत होतं. माझ्यात तसं स्टेज डेअरींग यथातथाच होतं पण वर्गात सर्वात स्कॉलर आणि पहिला येणारा विद्यार्थी म्हणुन दरवेळेस कुणाची जयंती,पुण्यतिथी किंवा अजुन काहीही कार्यक्रम असो, माझं नाव भाषणाच्या यादीत असायचं म्हणजे असायचचं. मी ही कधी नाही म्हटलो नाही कारण मलाही भाषण करणं हा प्रकार भारी आवडायचा.

भाषण म्ह्टलं की त्या विषयावरचा किंवा त्या व्यक्तिचा अभ्यास गरजेचा असायचा. मग सुरु व्हायचा माझा शोध. पुस्तकं गोळा करा, वाचनालयात जा, सरांना गाठा वगैरे. माहिती गोळा करुन झाली की मग स्वत:चं भाषण स्वत: लिहायचं. एवढं झाल्यावर मग ते पाठ करा, त्यासाठी भल्या पहाटे उठा. आरशासमोर उभं राहुन रंगीत तालीम करा. भाषणाच्या आदल्या दिवशी आई-पप्पां समोर एकदा ते भाषण करुन दाखवा असे प्रकार मग सुरु व्हायचे. एवढं सगळं करुन मग मी एखाद्या मोहिमेवर निघाल्यासारखा दही-साखर खाऊन घरातुन बाहेर पडायचो. बरं जाताना तो भाषणाचा कागद बरोबर असायचा. एवढ्या कष्टांमुळे तो ही अगदी जीर्ण होऊन जायचा. निघाल्यापासुन ते अगदी भाषण होईपर्यंत मी कुणाशीही जास्त बोलत नसे कारण एकदा पाठ केलेलं भाषण बिलकुल विसरता कामा नये ही काळजी. मला कधीही भाषण करताना कागद बाहेर काढावा लागला नाही. एकदा मात्र बोलता बोलता समोर हसणाररया मित्राचं तोंड पाहिलं आणि पुढची वाक्यचं विसरलो. त्याही परिस्थितीत मी कागद बाहेर काढला नाही. लागलीच...जय हिंद..जय महाराष्ट आणि छू मंतर. माझ्या वर्गात एक मुलगी होती. तिचा एवढा हळू आवाज होता की तिच "जय हिंद..जय महाराष्ट" सोडुन बाकी काहीच ए॓कू येत नसे. "जय हिंद..जय महाराष्ट" हे वाक्य मात्र ती मोठ्याने म्हणत असे. ते ए॓कल की सगळेजण अचानक झोपेतुन जागे होत आणि टाळ्या वाजवत.

भाषण म्हटल की माझ्या मनात नेहमी एक द्वंद्व सुरु व्हायच...भाषणाची सुरुवात मी बंधू-भगिनींने करू की मित्र-मैत्रिणींनो. सुरुवातीला मी, विवेकानंदांपासुन प्रेरणा घेउन म्हणा किंवा एक चाल होती म्हणुन म्हणा, बंधू-भगिनीं असेच म्हणत असे. पण एवढ्या छान छान मुलींना सर्वांसमक्ष भगिनी म्हणणं मला जडच जायचं. विवेकानंदांची केस थोडी वेगळी होती. त्यांचा ऑडीयन्स वेगळा असेन पण माझ तसं नाही ना. 'भगिनी' पेक्षा 'मैत्रिण' हा शब्द मला जास्त 'जवळचा' वाटे. जसजसं वय वाढत गेलं तसतसा मी माझ्या भाषणातुन ही जवळीक वाढवतच गेलो.

मी केलेलं पहिल भाषण बहुतेक लोकमान्य टिळकांवरच असेन. ज्या व्यक्तीचं भाषण असायचं ती व्यक्ती माझ्या अंगात संचारत असे. एकदा का भाषण सुरु झालं की संपेपर्यंत मी त्या व्यक्तीचं आयुष्य जगे. संपुर्ण भाषणात हातवारे, आवाजातला चढ-उतार आणि श्रोत्यांवर छाप पाडणे ही कला मी हळुहळु आत्मसात करत गेलो. समजा लोकमान्यांचा जन्माचा प्रसंग असेन तर मी अगदी शाहिराप्रमाणे तो रंगवुन सांगे, त्यांच्या मृत्युची वेळ असेन तर अगदी कमी आणि रडलेला आवाज, असे नाना बदल मी भाषणात करत असे. हातवारे ही तर माझी खुबी होती. "स्वराज्य माझा जन्मसिद्ध..." म्हणताना माझा एक हात कंबरेवर आणि दुसरा हवेत असे. एकदा असंच आमच्या संस्थेच्या संस्थापकाच्या पुण्यतिथीला मी भाषण केलं. त्या भाषणात "इवलेसे रोप लावियले द्वारी...तयाचा वेलू गेला गगनावरी" असं एक वाक्य होतं. "इवलेसे रोप" याच्यासाठी हावभाव करताना जेव्हा मी खाली बसुन हाताची अ‍ॅक्शन केली तेव्हा मागे बसलेले काही जण उभे राहुन पाहु लागले की मी मध्येच हे काय सुरु केलं म्हणुन. :-)

एकदा का मी कुणावरती भाषण केलं की तेच भाषण मी २-३ वर्ष तरी सहज रिपीट करायचो. मग त्या व्यक्तीची जयंती असो वा पुण्यतिथी माझ्या भाषणात कधीच बदल होत नसे. जयंती आणि पुण्यतिथीतला फरक मला उशीरा समजला. एखाद्या भाषणात आवडलेलं वाक्य किंवा सुभाषित मी प्रत्येक भाषणत वापरत असे. म्हणजे आता हेच बघा ना...चिखलात जसं कमळ उगवावं तसं टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखलगावातल्या एका गरीब कुटुंबात झाला. हेच वाक्य बापुंच्या भाषणात कसं ते पहा. चिखलात जसं कमळ उगवावं तसं बापुंचा जन्म गुजरात राज्यातील पोरीबंदर येथील एका गरीब कुटुंबात झाला. तसंच प्रकरण मृत्युचंही. मृत्यु कधी झाला याच्याशी मला काही देणंघेणं नसे. म्रुत्युच्या वेळेस "सुर्य अस्ताला चालला होता त्याचवेळेस हा सुर्य सुद्धा अनंतात विलीन झाला" हे माझं वाक्य प्रत्येक भाषणात असे, भले ती व्यक्ती जरी सकाळी गेली असली तरी आमच्या भाषणात ती आमच्याच सुर्याबरोबर संध्याकाळीच विलीन होत असे.

शाळेत भाषण करुन जेव्हा माझा आत्मविश्वास वाढला तेव्हा मी ठरवलं की आता आपण भाषणाच्या स्पर्धेत भाग घ्यायचा. भाषण करण्यापेक्षा त्या स्पर्धेसाठी फिरायला मिळेन हा त्यामागचा छुपा हेतु. बराच वेळा मी अशा स्पर्धेसाठी बाहेरच्या शाळेत जायचो. एकदा असंच एका स्पर्धेला गेलो असताना मी माझं भाषण विसरुन माझ्या मित्रांचंच भाषण ए॓कत बसलो. एकदा तर चक्क माझा भाषणाचा नंबर आला तेव्हा सभागॄहात इन मिन तीनच लोक होते. मी, एक परीक्षक आणि त्या शाळेचा शिपाई. शिपाई यासाठी की त्याला ते सभागृह बंद करायचं होतं.:-)

तस मी नेहमीच मराठीतच भाषण केलं. शाळेच्या जरी नावात "इंग्लिश" असं असलं ( न्यू इंग्लिश स्कुल ) तरी माझी शाळा ही मराठी शाळा होती. माझा तसा फक्त इंग्लिशच्या पिरीयडलाच इंग्लिशशी संबंध येत असे. त्यामुळे स्वतःची इंग्लिशमधली जाण ओळखुन मी कधीच इंग्लिशमध्ये भाषण करण्याच्या फंदात पडलो नाही. मी दहावीत असेन तेव्हा निरोप समारंभाच्या अगोदर ( Send-off ) संपुर्ण शाळा एक दिवस दहावीच्या विद्यार्थानी चालवावी असा प्रघात होता. मला हेडमास्टर बनवलं गेलं आणि माझ्यावर आमच्या हेडमास्टरांप्रमाणे इंग्लिश शिकवण्याची जबाबदारी आली. ती मी कशी का होईना निभावली. त्याचवेळेस इंग्लिशमधुन मी भाषणही केलं. त्यावेळेस माझी एवढी तंतरली होती की मी मधली काही वाक्य गाळुन कसंबसं भाषण पुर्ण केलं. दहावी झाली आणि अशी ही माझी भाषणबाजी सुद्धा संपली.

आता या वयात या सगळ्या गोष्टीं आठवुन खुप हसु येतं पण खरंच हे असे प्रकार प्रत्येक जणच लहानपणी करतो. 'लहानपण देगा देवा...' हे उगीचच का प्रत्येकजण म्हणत असतो !

-अजय

या ब्लॉग वरचे सर्वात जास्त वेळा पाहिले गेलेले पोस्ट वाचा.
१. ब्राईड-हंट
२. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे

स्वप्न

आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याची तशी प्रत्येकालाच उत्सुकता असते. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांचा बारकाइने अभ्यासल्या तर तुमच्या असं लक्षात येइन की त्या घटना घडण्याच्या आधी तुम्हाला त्या होणार आहेत याची कुठेतरी कल्पना आधीच आलेली असते. त्या घटना घडुन गेल्यानंतर जेव्हा आपण ते सर्व धागे एकत्र जोडतो तेव्हा लक्षात येतं की आपण कुठेतरी हे सगळं समजायला कमी पडलो किंवा त्याचा योग्य अर्थ त्यावेळेला समजु शकलो नाही. माझ्याबाबतीत काल एक वरवर साधी वाटणारी पण काहीशी चमत्कारीक अशी घटना घडली आणि माझा शकुन, स्वप्न, दुष्टांत या गोष्टींवरचा विश्वास अधिकच दॄढ झाला ( पुन्हा एकदा !).

मंगळवार, सकाळचे ८ वाजले असतील. मी कसाबसा डोळे चोळत उठलो. नऊ तास झोपुनही माझ्यावर झोपेचा अंमल कायम होता. रात्री पडलेलं स्वप्न मी आठवायचा प्रयत्न करत होतो. गेले ४-५ दिवस मी घरुनच काम करत होतो. त्यादिवशी एक प्रेझेंटेशन द्यायचं होतं त्याची तयारी ही करत होतो. त्यासाठीच्या १०-१२ स्लाइड्स बनवुन झाल्या होत्या. बरोबर नोट्स ही काढल्या होत्या. आता पुन्हा एकदा सगळ्यावरुन शेवटची नजर फिरवली म्हणजे झालं. पण आज जे काही स्वप्न पडलं होतं त्यामुळे माझं मन थोडंस का होइना बेचैन झालं होतं.

तसा माझा स्वप्नांवर बिलकुल विश्वास नाही आणि त्यांचा अर्थ लावायच्या भानगडीतही मी पडत नाही. त्याला कारणही तसंच आहे. मला पडणारी स्वप्नंच चित्रविचीत्र असतात. प्रत्येक स्वप्न मला सकाळी आठवणेच असं नाही. एका स्वप्नात मी हिमालयात, बर्फात ते पण , सायकलीवरुन कोंबडीचा पाठलाग करतोय. एका स्वप्नात मी पाण्यात पुस्तक वाचतोय आणि त्याच पुस्तकाच्या एका पानातुन मी केनियाच्या जंगल सफारीला जातो असं काहीतरी. आता हिमालयात कोंबडी आणि सायकलचा काय संबंध ?

असो. त्यादिवशी पडलेलं स्वप्न हे मी सकाळी उठुन आठवायचा प्रयत्न करु लागलो. माझ्याबाबतीत काहीतरी 'वाईट' घडलंय आणि मी त्यादिवशी प्रेझेंटेशन हे उशीरा दिलं असं काहीसं ते स्वप्न होतं. वाईट काय घडलं हे मला आठवत नव्हतं किंवा स्वप्नात ते मी पाहिलं नसावं. नेहमी पडतात तसं हे ही एक स्वप्न याप्रमाणे मी ते स्वप्न विसरुन गेलो.

संध्याकाळचे पाच वाजले. मी सर्व काही उरकुन ऑफीसला निघायच्या तयारीत होतो. माझ्या सॅक मध्ये दोन्ही लॅपटॉप आणि रेनकोट टाकला, गाडीला किक मारली आणि निघालो. चव्हाणनगर(सातारा रोड) ते बाणेर हा तसा दररोजचा प्रवास. बाहेर आभाळ भरुन आलं होतं. पावसाची ही चिन्ह होती. पर्वतीला पोहोचतो तोच पावसाला सुरुवात झाली. थोडयाच वेळात पावसाचा जोर चांगलाच वाढला. रेनकोट घातलेला असुनही मी गाडी कडेला घेतली आणि शांतपणे आडोशाला पाऊस थांबण्याची वाट पहात उभा राहीलो. बराच वेळ झाला पण पाऊस काही थांबेना. वेळेत पोचायचं म्हणुन मी नाइलाजेने पावसात जाण्याचं ठरवल. पाउस चांगलाच कोसळत होता आणि थोड्याच वेळात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. थोडं पुढे जातो न जातो तोच काहीतरी आवाज झाला आणि माझी गाडी अडकल्यासारखी झाली. एकदम तोल गेल्यासारखं झालं होत. साइड स्टँन्ड न काढल्यामुळे बहुतेक तसं झालं असावं. पावसामुळं पुढचं निटंसं दिसत नव्ह्तं. पुढे जातो न जातो तोच गाडीचं पुढचं चाक कशाततरी अडकलं. चाक काढण्याचा प्रयत्न केला पण...शेवटी गाडीवरुन उतरावंच लागलं आणि २-३ मिनीट प्रयत्न केल्यावर चाक निघालं. लगेच निघालो. पुढे गेलो तर गरगरल्यासारखं झालं. काहीच समजेनासं झालं...अचानक ते पण. लगेचच स्वत:ला सावरलं.
झेड ब्रिज ओलांडुन पुढे फर्गुसन रोडवरुन विद्यापीठ रोड ला लागलो आणि मागुन हॉर्न वाजवत आलेली एक सुमो जीप आरशात पाहिली. क्षणाचाही विलंब न करता गाडी बाजुला घेतली आणि सुमोवाला कट मारुन गेला. पुढे गेलो आणि विद्यापीठजवळ गाडी घसरली. अजुन पुढे गेलो. बाणेर रोड वर ऑफीस जवळ एक कारवाला अंगावरच आला. त्याच्यातुनही सुटलो. मनात विचार येत होते की आज माझ्या हातुन असं काय होतंय. सगळ्या गोष्टी अगदी ठरविलेल्याप्रमाणे अशा काय घडत आहेत. एवढे सगळे प्रसंग ते पण मोजुन अर्ध्या तासात ! एवढे दिवस मी दररोज याच रस्त्याने येतो पण आजच्या सारखा प्रकार कधीच घडला नाही. बरेचशे प्रश्नांच ओझं मनातच ठेवुनच मी गाडी पार्क केली, रेनकोट काढला, केस कोरडे केलं आणि तेवढ्यात सकाळच स्वप्न आठवलं. घड्याळाकडे पाहिलं आणि एक छद्मी हास्य चेहरयावर उमटलं. ६.२० झाले होते. म्हणजे अजुन ४० मिनीट होते तर. तेवढा वेळ मला पुरेसा होता सेट-अप करण्यासाठी. म्हणजे मला पडलेलं स्वप्न हे ख्ररं होणार नव्हत तर !

वर ऑफिस मध्ये गेलो. अगोदर थोडा फ्रेश झालो. मग जागेवर येऊन सॅक उघडली. एक लॅपटॉप बाहेर काढला. थोडासा ओला झालेला दिसला. शीट...यात तर माझा बराच डेटा आहे. आयची कटकट...पाण्याच्या बादलीतुन कपडा बाहेर काढावा तसा तो दुसरा लॅपटॉप मी बाहेर काढला. सॅकच्या एका कप्यात पाणीच पाणी. या लॅपटॉपवर माझं संपुर्ण प्रेझेंटेशन होतं. आता मात्र माझी खरोखरच फाटली होती. मोजुन २० मिनीटे होती माझ्याकडे. दोन्ही लॅपटॉप सिस-अ‍ॅडमिनकडे दिले, एक मशीन सुरु होण्याची शक्यता नव्हतीच. एकाचा लॅपटॉप घेतला, पटकन सगळ काही आठवुन स्लाईड्स तयार करायला बसलो. सोर्स कोडची एक कॉपी डेस्कटॉप मशीन वर होती म्हणुन बरं झालं. कॉन्फरन्स रुम मध्ये गेलो आणि सगळा सेट-अप केला. नंबर डाएल केला आणि थोडंस लेट सुरु करेन असं सांगितलं कारण अजुन काही स्लाईड्स करायच्या बा़की होत्या. त्यानंतर ...सगळं काही झाल्यावर प्रेझेंटेशन १५ मिनिट उशीरा सुरु झालं.

प्रेझेंटेशन संपवुन बाहेर पडलो तेव्हा डोक्यात फक्त मला पडलेल्या स्वप्नाचाच विचार चालू होता. ते स्वप्न खरं ठरलं होतं. फक्त त्यात माझ्या बाबतीत काय वाईट घडलं हे मी तेव्हा पाहु शकलो नव्हतो पण ते सारं मी अनुभवलं होतं. म्हणजे कुठेतरी मला हे अगोदरच माहीत होतं की असं काहीतरी घडणार होतं पण तरीही मी काहीच करु शकलो नाही हीच एक गोष्ट मला अजुनही खटकतेय.

तुम्ही अल-केमिस्ट वाचलय ? त्यातही अस म्हटलय की आपल्या आजुबाजुच्या घडणाररया प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष द्या, त्या तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात. त्यांचा अर्थ लावा म्हणजे तुम्हाला बरंच काही समजेन. प्रत्येक जण तो अर्थ लावु शकत नाही. खरं तर ते सगळे देवाचे संदेश असतात. या शकुनांचा जर अर्थ उलगडला तर आपण आपल्या आयुष्यात घडणारया गोष्टीं अगोदरच पाहु शकतो.

-अजय

Saturday, August 15, 2009

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...

'जन गण मन' चे शब्द कानावर पडले आणि मी सगळी कामं टाकुन सावधान उभा राहिलो. पण मनात नाना विचार येत होते. अनेक लोक हुतात्मा झाले भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी, पण आजची भारताची अवस्था एवढी ही काही चांगली नाही. भारत खुप प्रगती करत आहे पण काही गोष्टी भारताच्या प्रगतीसाठी खुप घातक आहेत. असंच मागे एकदा एक कविता केली होती. आज १५ ऑगस्ट च्या निमीत्ताने ती लिहावीशी वाटली इथे.


याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...

रस्त्यावर खून पडतात...दिवसा रक्ताची होळी खेळतात
बरेचशे लोक उभे असतात...मारणारयांचे फोटो काढतात
मेलेल्यांचे पुतळे बनतात...मारणारे त्याना हार घालतात
बाकीचे सारे गिधाडे बनून...राहिलेल्याच्यी लक्तरे तोडतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


जिवंत जळणारयाला जळू देतात...सारे शांतपणे उभे असतात
रस्त्यावर तमाशा पाहणारे...सारे आपल्यासारखेच असतात
काळवंडलेल्या माणुसकीबरोबर ... काळवंडलेले चेहरेही असतात
डोळ्यात अश्रू आणून काहीजण...औपचारिकताही पूर्ण करतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


सारे रस्ते बंद पडतात...महात्म्यांना उपाशी ठेवतात
नावात काय असतं म्हणून...सारे त्याला 'उपोषण' म्हणतात
नंतर काही पुढारी येतात...हार तुर्‍यांनी सन्मान करतात
शब्दांची मग फेरफार करून...मोसंबीचा रस पाजतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


या देशात फक्त...गुंडच राज्य करतात
हळुच बोला नाहीतर...संन्याशाला फाशी देतात
बोलुनचालुन गुंडच ते...नाही नाही ते धंदे करतात
कुठंच नाही डाळ शिजली ...तर राजकारणात प्रवेश करतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


निवडणुका जवळ येतात...पुढारी मग अनवाणी चालतात
तू काय किंवा मी काय...सारेच त्यांच्या मागे असतात
घोषणा हवेत विरुन जातात...आश्वासनांचे फुगे फुटतात
एकदा मंत्री बनल्यावर...मुग गिळुन गप्प बसतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


निवडणुका संपतात...शेंबडी लोकं मंत्री बनतात
जिंकणार्याला 'सत्ताधारी'...हारणार्याला 'विपक्ष' म्हणतात
सत्ताधारी' किंवा 'विपक्ष' ... एकाच माळेचे मणी असतात
लोकशाहीसारख्या खेळणाल्या...स्वतःच्या तालावर नाचवत राहतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


विरपप्पन किंवा गवळी...सारे सरेआम फिरत असतात
पोलिस त्यांना संरक्षण देउन...आपली कर्तव्य चोख बजावतात
त्यांच तरी काय चुकलं...ते तर भाउबंदकीचा धर्म निभावतात
'सारे भारतीय बांधव आहेत'...अशी प्रतीज्ञा सारे घेतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


स्वातंत्र्याची ज्योत खरं तर...सारेच पेटवत ठेवतात
दंगलीत आणि जाळपोळीत...तिच हाती घेतात
गर्जना जरी वेगळ्या तरी...उद्देश मात्र एकच असतात
मंदिर किंवा मस्जिद...रक्ताने बरबटलेले जातात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


बाहेरचे असे इंग्रज ...इथे येउन राज्य करतात
फक्त दीडशे वर्ष म्हणुन...लोक मनाचं समाधान करतात
'झंडा उंचे रहे हमारा'...कसं का होइना सारे म्हणतात
कारण वर्षातुन असे प्रसंग..फक्त दोनचवेळा येतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


देवापुढे पैसे टाकतात..हवं नको ते सारं मागतात
एकच देश असा जिथे ...देवालाही लाच देतात
देवालाही लाजवतात..अशी सारी कूत्य इथे घडतात
म्हणुनच देवाला इथं...'दगड' बनवुन गप्प बसवतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


सर्व भारतीय लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, जय हिद !

-अजय

Friday, August 14, 2009

ध्यास नाविन्याचा

गेले २ दिवस मी कार्यालयात न जाता घरुनच काम करत आहे. परवा सगळ्यांना डुक्कर-तापाच्या ( स्वाइन फ्लु ) भीतीने कार्यालयात न येता घरुनच काम करा अस ई-पत्र ( इमेल) आलं होत. गेले २ दिवस मी घरीच माझं कार्यालय बनवलं आहे. २-३ लॅपटॉप च्या घोळ्क्यात बसून मी घरुनच काम करतोय. त्यात आज सुट्टी, त्यामुळे जास्तच कंटाळा आलाय. ना बाहेर कुठे फिरता येतय ना कुठे गाडी काढुन जात येतयं. सकाळपासुन एका प्रेझेंटेशन ( याच्यासाठीचा मराठी शब्द मला सापडला नाही) ची तयारी करत होतो. जेवण करुन थोडा झोपायचा प्रयत्नही करुन पाहिला. नंतर आले टाकुन केलेला चहा पिता पिता यू-ट्यूब वरचे काही चलचित्रही पाहिली. बातम्या ऐकल्या, ब्लॉग वाचले अगदी सगळे मेल सुद्धा तपासले. १-२ उगाचच दूरध्वनीही केले. पण कुठल्याही प्रकारे माझा कंटाळा दूर होइना. म्हणुन नवीन काहीतरी लिहावं यासाठी लेखनी हातात घेतली.

तसा मी खुप चंचल स्वभावाचा आहे असं मला नेहमी जाणवतं. म्हणजे असं की मी एकाच गोष्टी मध्ये जास्त वेळ स्वतःला अडकवून ठेवू शकत नाही. एखादी गोष्ट करताना मा़झं लक्ष हजार गोष्टींकडे विचलीत होतं. समोरचा माणूस जर माझ्याशी बोलत असेन तर त्याचं सगळंच बोलणं मी ए॑कून घेतो असं नाही. त्याचं बोलणं चालु असताना मी अगदी दुर कुठेतरी जाऊन येतो. कधी कधी स्वत:ला भुतकाळात लोटुन देतो. समोरच्या माणसाबद्द्ल काही आडाखे बांधतो. ते आडाखे जर बरोबर ठरले तर मनातल्या मनात हसतो, कधी कधी खिदळतो आणि स्वत:वरच खुष ही होतो. पण समोरच्याला अगदी त्याच मागमुस लागु न देता. मनात कितीतरी तरंग उमटत असतात, काही आपोआपच विरुन जातात, काही माझी साथ देतात.

या जगात प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. माणुस हा काळाबरोबर धावत असतो अगदी घायकुतीला येइपर्यंत तो पळत असतो. जीवनाच्या प्रवाहात त्याला अनेक व्यक्ती भेटत असता, नाना रंगाच्या, नाना ढंगाच्या. काहींचे स्वभाव अगदी आपल्याशी मिळतेजुळते... अगदी आपल्यासारखे ... विरघळुन जावं त्यांच्यात अस वाटणारे. तर काहींचे अगदी आपल्या विरुद्ध. काही लोक अगदीच तह्रेवाईक. माणुस धावत असतो दररोज...नवीन क्षितीजाच्या शोधात. तो दररोज काहीतरी नवीन शोधत असतो कारण त्याला नाविन्याचा ध्यास असतो. दररोज नवीन स्वप्न बघत असतो, नवीन वर्तुळ तयार करत असतो. आणि हे तो जाणुनबाजुन करत असतो कारण नाविन्याचा ध्यास हे त्याचं ब्रीद !

आपल्या आयुष्यात कितीतरी घटना घडत असतात, काही अगदी आपल्या मनासारख्या तर काहीं अगदी अनपेक्षीतपणे...आपल्याला नको अशा. पण आपल्या सगळ्याच गोष्टींचा स्वीकार करावा लागतो. प्रत्येक गोष्ट अगदी आपल्याला हवी असेन त्त्याचपद्धतीने घडेल असं नाही. मग अशा वेळेस काय करावं. सरळ स्वताला झोकुन द्यावं आणि तो जस आपल्याला नेईन तस त्याच्या बरोबर जावं. अशावेळेस खुप हलकं हलकं वाटतं.

लिहताना सुदधा माझा चंचल स्वभाव मला सोडत नाही. तीन परिच्छेदामध्ये मी नवनवीन विषयाबद्दल लिहून गेलो. असो, त्यादिवशी मी एक कीर्तनाची सीडी घेऊन आलो, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरिकर याचं एक खुप हसवणारं कीर्तन-प्रवचन आहे असं मी ऐकलं होतं म्हणून खास त्याची सीडी शोधून घेऊन आलो. नाव आहे "भाग्यवान माणसाची लक्षणे", पोट धरून हसाल. गावचा बाज आहे या प्रवचनाला, अगदी नगरी स्टाइल मध्ये. मी २-३ तास पोट धरुन हसलोय हे प्रवचन ए॓कताना. तुम्ही ते जरूर ऐका आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं ते.

I have uploaded mp3 files on megaupload.com, here are the links for you

http://www.megaupload.com/?d=T72BTVBV
http://www.megaupload.com/?d=XW66G8YZ

-अजय

Tuesday, August 11, 2009

हा एक खरा घडलेला प्रसंग आहे...

हा एक खरा घडलेला प्रसंग आहे. हा प्रसंग जेवढ्या वेळेस मी माझ्या भावाच्या तोंडून ए॓कतो तेव्हा तेव्हा मी सुन्न होउन जातो. प्रसंगच तसा आहे... दरोडेखोर, चोर, पारधी फक्त मी न्यूजपेपर, सिनेमा किंवा बाबा कदमांच्या कादंबरी मध्येच पाहिले किंवा ए॓कले होते. पण जेव्हा कुणाच्या तोंडुन अशा प्रकारचे घडलेले किस्से ए॑कायला मिळतात तेव्हा मात्र "आपण जर त्या जागेवर असतो तर ?" हा एकच प्रश्न मनात उभा राहतो. अशी ही कहाणी माझ्या भावाच्याच जुबानी...

"७-८ वर्षापुवीची गोष्ट, एप्रिल महिना होता. एप्रिल म्हणजे लाही लाही करणारं ऊन, त्यात शेवटचा आठवडा होता. आमच्या गावची यात्रा येऊन ठेपली होती. सगळया परगावी राहणारया लोकांचे पाय गावाकडे वळले होते. मी त्यावेळेस फलटणला होतो. मी ही त्या दिवशी स्वत:चा काम उरकून टू-व्हीलर वर गावाकडे येण्यासाठी निघालो होतो. संध्याकाळची वेळ होती, अंधार लवकर पडला होता. गावापासून १० किमीच्या अंतरावर एक निर्जन आणि डोंगरातुन जाणारा रस्ता आहे. शक्यतो त्या रस्त्याने अंधार पडल्यावर कुणी येत नसे. पण मला त्या दिवशी उशीर झाला होता आणि घरी लवकरही पोचायचं होतं म्हणुन मग मी तो रस्ता पकडला.

सात-साडेसात वाजले असतील. सगळीकडे बरयापैकी अंधार पडला होता. रातकिडे नुकतेच बाहेर पडुन किर्र-किर्र असा आवाज करायला लागले होते. रस्त्याच्या एका बाजूला नीरा नदी तर दुसरया बाजूला डोंगर. भयाण शांतता पसरली होती. त्या शांततेत नदीच्या पाण्याचा आवाजसुद्धा खुप भेसुर वाटत होता. रस्ता तसा वळणा-वळणांचा होता. एक चढ उतरून मी जेव्हा सपाट रस्त्यावर लागलो तेव्हा गाडीने चांगलाच वेग पकडला होता. आता फक्त काही मिनीटांचं अंतर बा़की होतं. पण मला माझ्या पुढे, अगदी १ किमी वर काय घडणार आहे याची बिलकूल ­कल्पना नव्हती. घरी लवकर गेलं पाहिजे हा एकच विचार त्यावेळी डोक्यात चालू होता आणि तेवढयात मला हेडलाईट च्या प्रकाशात एक माणुस दिसला. हा माणुस रस्त्याच्या कडेला उभा होता आणि हात दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा करत होता. मी गाडीचा वेग थोडा कमी केला. अजुन जवळ गेल्यावर मला दिसलं की त्या माणसाने धोतर आणि शर्ट घातलेला आहे. मी ब्रेक लावणार तेवढ्यात एवढया उशीरा इथं कोण आलं असावं हा विचार मनात आला. थोडंस विचीत्र वाटलं. झटदिशी मी गाडीचं वेग वाढवला. गाडीचा वेग वाढलेला पाहून त्या माणसाने बोंब ठोकली. विचार करायलाही वेळ नव्ह्ता. काय होत होतं हे कळतच नव्ह्तं पण कुठल्याही परिस्थीतीत तिथे थांबणं धोक्याचं आहे हेच समजून गेलं होतं. मी तेवढयाच वेगात गाडी त्याच्या अंगावर घातल्यासारखी केली व त्याला चकवून पुढे आलो. मागच्या माणसाची बोंब बहुतेक पुढ्च्यांसाठी इशारा होता कारण पुढे ४ हट्टे-कट्टे लोक रस्त्याचा कडेला असलेल्या खड्ड्यातून वर येत होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. एव्हाना माझ्या गाडीने बराच वेग पकडला होता. मी त्याच वेगात गाडी त्यांच्या अंगावर घातली. त्यांनी माझ्यावर काठ्या उगारल्या, काहींनी मारल्या देखील. त्यांना ही मी सही-सलामतपणे चकवण्यात यशस्वी झालो होतो. पुढे एक वळण होतं. तिथे ३-४ लोक उभे असलेले मला दिसले. त्यात १-२ स्त्रिया असाव्यात. एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं की गाडी अंगावर घालणं हेच माझं शस्त्र आहे. मी पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चूकवलं. त्यातली एक बाई मोठमोठ्याने बोंब मारु लागली. तिची मी बोंब ए॑कुन मी प्रचंड घाबरलो. हे सगळं फक्त १०-१५ सेकंदात झालं होत. मला विचार करायला ही वेळ नव्हता.

मी आता सरळ रस्त्यावर आलो होतो. पुढे एक अरूंद पुल होता. एकावेळेस एकच चार-चाकी गाडी जाउ शकते इतका अरुंद. गाडीच्या प्रकाशात त्या पुलावर मला एक माणुस, एका हातात कुह्राड उगारून व दुसरया हाताने थांबण्याचा इशारा करत उभा असलेला दिसला. आता मात्र परिस्थीती आणीबाणीची होती. एक तर रस्ता अरूंद, त्यात त्याच्या हातात कुह्राड. आता मी थोडा कुठे शुद्धीत आलो होतो. एवढा वेळ जे चाललं होतं ते सगळं मा़झ्या हातातून होत गेलं. पण आता मला हे सगळं काय चाललंय हे समजत होतं. माझ्या डोळ्यांसमोर माझा साक्षात म्रूत्यु उभा होता. आता जर थांबलो तर काही खैर नाही. मागचा-पुढ्चा सगळाच मार बसणार. कदाचीत जीवे मारतील सुद्धा. विचार करायला फक्त ३-४ सेकंदच होते. ठरवल जे काही होइन ते...तेवढ्याच वेगात गाडी पळवली. समोरचा माणूस काहीतरी ओरडत होता. सरळ त्याच्या अंगावर गाडी घातली. तो बाजुला सरला. कुह्राडीचा सर-सर करत वार झाला...मी थोडासा वाकलो. वार झाला होता पण मला कुठेच काही लागल्याचं जाणवत नव्हतं. म्हणजे मी सही-सलामत होतो. मी त्याला यशस्वीपणे चकवून पुढे आलो होतो. वार बहुतेक चुकला होता. मी अगदी थोडक्यात, नशीबानेच बचावलो होतो.
आता पुढे एक वळण होतं. त्या वळणावर मला गाडीचा वेग कमी करावाच लागणार होता. पण माझ्या नशीबाने त्याठिकाणी कुणीही नव्हतं. आता मला समजलं होतं की मा़झी किती मोठ्या संकटातून सुटका झाली होती. देव माझ्या पाठीशी उभा होता म्हणुनच मी वाचलो. त्याच्यानंतरचं अंतर मी अगदी ६-७ मिनीटांमध्येच कापलं. घरी येऊनच मी गाडीचा ब्रेक दाबला. छाती धडधडत होती. कपाळावर घाम आला होता. समोर पप्पा काहीतरी म्हणत होते. त्यांचे शब्द नुसतेच कानावर पडत होते पण ते समजण्याइतका मी शुद्धीवर नव्हतो. गाडीवरून उतरलो आणि घडलेली हकीकत सर्वांना सांगितली.

अजुनही जेव्हा जेव्हा हा चित्रपट मा़झ्या डोळ्यांपुढुन जातो तेव्हा तेव्हा माझ्या मनात काही प्रश्न उभे राहतात. समजा, पहिला माणुस दिसला होता तिथे जर मी गाडी थांबवली असती तर? चुकुन एखाद्या माणसाची काठी गाडीला लागुन गाडीचा वेग कमी झाला असता किंवा गाडीवरुन मी पडलो असतो तर? त्या शेवटच्या माणसाच्या कुह्राडीचा वार जर माझ्यावर झाला असता तर ? त्या शेवटच्या वळणावर जिथे गाडीचा वेग अगदी कमी होतो तिथे जर कुणी असतं तर ? मी जर त्यांच्या हातात सापडलो असतो तर ?

या जर तरला काहीच उत्तर नाहीत. कुठेतरी माझं नशीब जोरावर होतं आणि सा़क्षात परमेश्वरच माझ्या पाठीशी होता म्हणुनच मी बचावलो !"

-अजय