Thursday, December 31, 2009

उलटा प्रवास

काल मुग्धाचं पोस्ट वाचलं आणि क्षणभर मुग्धा आणि तिची आई, ज्यांना मी आयुष्यात कधीच पाहिलं नाही त्यांचं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. माझा आत्मा हा थोड्यावेळ माझा राहीलाच नव्हता. तो कधीच उडुन गेला होता. कुणाच्या तरी शरीरात जाऊन तो विराजमान झाला होता. इथे राहिलं होतं ते फक्त माझं शरीर, एक निर्जीव शरीर. त्या निर्जीव शरीरालासुद्धा मुग्धाची तगमग समजत होती. आत्म्याविन पोरकं झालेलं माझं शरीर त्या पोरक्या झालेल्या मनाची स्पंदन झेलत होतं. ती स्पंदन झेलता झेलता त्याचे निर्जीव डोळे कधी भरुन आले समजलंच नाही. तिने लिहिलेल सारे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. ते सारं मीच काही त्यांच्या घरातलाच एखाद्या असल्याप्रमाणे पहात होतो, अनुभवत होतो. माझ्या डोळ्यांपुढे हे सारं घडत आहे असाच भास होत होता. समवेदना म्हणजे काय याचा अनुभव मी घेत होतो. कुणाचं तरी, थोड्यावेळासाठी का होईना मी आयुष्य जगत होतो. ही भावनाच मुळी खुप वेगळी होती. स्वताची दु: या शरीराने खुप झेलली पण दुसरयासाठी हे शरीर हळहळताना मी पुन्हा एकदा पहात होतो. "आत्म्याविन पोरकं झालेलं शरीर आणि आईविना पोरक झालेल मुलं यांच्यात फरक तो काय ? " आई म्हणजेच आपला आत्मा, तो नसेन तर हा देह कसा चालणार !

मुग्धाचं पोस्ट वाचुन झालं आणि थरथरत्या हाताने आईला फोन लावला...
"आई, अजय बोलतोय. बरी आहेस ना तू ? तुझं इन्सुलिनचं इंजेक्शन आज घेतलंस का ? "
"घेतलं मी, उद्या जाऊन पुन्हा एकदा शुगर टेस्ट करणार आहे. पण तू असा अचानक का फोन केलास?"
"काही नाही , सहजचं...." , मी,

पुढचं काहीच बोलवलं नाही कारण मी आता तो राहिलो नव्हतो. आईच्या लहानग्या बाळाकडे जाण्याचा उलटा प्रवास माझा केव्हाच सुरु झाला होता...

-अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
. यंदा कर्तव्य आहे ?
. फुंकर
३. मी आणि माझी फिल्लमबाजी
४. मी 'पुरुष' बोलतोय !

---------------------------------------------------------------------------------

Wednesday, December 30, 2009

च्या आयला

'च्या आयला' ही काही शिवी नाही; ते एक एक्सप्रेशन आहे. जसं तुम्ही आई गं, बापरे किंवा आईशप्पथ म्हणता तसंच 'च्या आयला' असं म्हणणं शिवी नसून ते एक एक्सप्रेशनच आहे. आणि समजा बोलता बोलता एखाद्यानेच दिलीच शिवी तर कुठं बिघडलं? मिळमिळीत जेवण असेन तर आपण ठेचा किंवा चटणी मागवतोच ना तसंच शिवीचंही आहे. माझ्या मते तर शिवी हा भाषेचा एक दागिना आहे. होय , 'शिवी भाषेचा एक दागिनाच आहे' हे विधान भल्याभल्यांना भाषातज्ञांना चकीत करु शकतं. भाषेला जर कशाने शोभा येत असेल तर त्यात शिवी सुद्धा येते. कुठलीही भाषा ही शिवीविना अपुरी आहे. जगाच्या पाठीवर अशी एकही भाषा तुम्हाला शोधून सापडणार नाही ज्यात शिवी नाही. शिवी कुठेही लिखीत स्वरुपात नसते म्हणजेच जसं पाककूतीच पुस्तक, योगासनांचं पुस्तक, रांगोळ्याचं पुस्तक असतं तस शिवीचं पुस्तक कुठे असतं का ? नाही, मग तरीही या शिव्या एका जनरेशनकडून दुसरया जनरेशन कडे जातातच ना, त्यापण अगदी जशाच्या तशा. कधीकधी तर त्या अधिकच अ‍ॅडव्हान्सही होतात. शिवी हा प्रकार कुठल्याही पुस्तकात लिखीत स्वरुपात नसतानासुद्धा अगदी प्रत्येकाच्या तोंडी रुळतो यातच शिवीचं साधेपण आहे. शिव्या कुणालाही शिकवाव्या लागत नाही एवढ्या त्या सोप्या असतात. लहान मुलाला जर थोडावेळ मुलांच्यात खेळायला सोडल तर तो बाहेर जाऊन एखादा श्लोक शिकण्याअगोदर एखाद्याने दिलेली शिवीच लवकर शिकतो. पाण्यात पडल्यावर जसं पोहायला येतं तसंच मूल बाहेर गेलं तर ते शिवी शिकूनच परत येतं. याचाच अर्थ शिवी शिकण अगदी सोपी गोष्ट आहे. जसंजसं वय वाढतं तसतसं ह्या शिवीमधले कर्ते, क्रियापदं आणि विशेषण बदलतात. वयाबरोबर शिवीमधली धार जर वाढली नाही तर आजुबाजुचे लोकांकडुन टिंगळटवाळी होऊ शकते.

आता तुम्ही म्हणाल मी शिवी शिकलो पण त्याचा उपयोग काय ? अहो शिवी ही मल्टीपरपज असते. कुठल्याही भांडणाची सुरुवात आणि शेवट शिवीशिवाय होऊच शकत नाही. भांडणात समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात जो राग असतो तो साध्या शब्दात व्यक्त करणं एवढं सोपं नसतं, त्यासाठी शिवीसारखंच हत्यारच हातात घ्यावं लागतं. अहो शिव्या जर दिल्या नाहीत तर भांडणं भांडण वाटणार नाहीत. १०० वाक्य सुद्धा भांडणात जो इफेक्ट साधु शकणार नाहीत तो इफेक्ट एका ओळीची शिवी साधते. शिवी जशी रागाने शत्रू ला देतात तसं मित्राला दिली तरी चालते. म्हणजे तुम्ही जर खुप लाडात आलात तर मित्राला प्रेमाने शिवी देऊन संवाद सुरु करु शकता. कोल्हापुर मध्ये हा प्रकार भारी लोकप्रिय आहे. भांडणाच्या आणि प्रेमाच्या शिव्या कधीकधी सारख्या सुद्धा असु शकतात फक्त त्यावेळचं आवाजातलं टोनींग आणि एक्सप्रेशन वेगळे असतात. शिवी देऊन तुम्ही दु:ख, आश्चर्य, प्रेम अशा सारया भावना व्यक्त करु शकता. फक्त समोरच्या व्यक्तीला सुद्धा शिवीमागचा 'तो' अर्थ ज्ञात असावा. शिवीचा अर्थ समजुन घेण्यापेक्षा त्याच्यामागच्या भावना ओळखण अधीक महत्त्वाचं. शिव्या या सर्व वर्गातील आणि वयोगटातील लोक देतात. शिव्या या गावच्या चावडीपासुन ते अगदी विधानभवन, संसदभवन ते फुटबॉल आणि क्रिकेट्च्या मैदानावरही दिल्या जातात. आजकाल शिव्यांचा उपयोग सिनेमामध्येही होऊ लागलेला आहे. आजकाल कुठलाही सिनेमा घ्या त्यात सीन प्रभावी वाटावा म्हणून मुद्दाम शिव्या पेरल्या जातात. गदर मधला सनी देओलचा पाकिस्तानातला सीन असुद्यात किंवा नाना पाटेकराचा अब तक छप्पन असुद्यात, शिवीचा वापर सिनेमामध्ये सर्रासपणे केला जात आहे. एवढंच काय मध्यंतरी मराठीमध्ये मध्ये शिवीवरुन सुरुवात होणारं गाणं सुद्धा मी ए॑कलं होतं. इथुन पुढे जाऊन एखादी शिवी हेच टायटल असलेला सिनेमा आला तर त्यात आश्चर्य वाटु नये. माननीय ठाकरेंसारखे नेतेसुद्धा आपल्या भाषणामध्ये शिव्यांचा वापर करुन लोकांच्या टाळ्या मिळवतात. याच्यामुळेच शिवीकडे सध्या एक प्रभावी माध्यम म्हणून लोक बघायला लागलेत की काय अशी मला शंका येऊ लागली आहे.

शिवीचे तसे अनेक प्रकार आहेत. काही शिव्या ह्या सौम्य प्रकारात मोडल्या जातात तर काही उग्र तर काही अति उग्र. जेव्हा जशी गरज तेव्हा तसा उपयोग. शिव्या मध्ये नेहमी बापाला मध्ये न आणता आईलाच का आणलं जात हे मला माहित नाही. शिव्या देण्याचा सेन्स हा प्रत्येकामध्येच असतो. कोणी मनातल्या मनात शिव्या देतो तर कोणी खुलेआम. कोणी रागात असताना दात ओठ खाऊन शिवी देतो तर कुणी एखाद्याच्या अंगावर धाऊन जात शिवी देतो. शिव्या देणे ही सुद्धा एक कला आहे. उगाचच संदर्भहीन शिव्या देऊन जमत नाही. शिवी दिल्यावर जर अपेक्षित अर्थ साधला गेला नाही तर शिवी देण्याचा काय फायदा ? शिवी देणे ह्या प्रकारामध्ये मुलींपेक्षा मुलेच जास्त वरचढ असतात असं आतापर्यंतच्या अभ्यासावरुन लक्षात येत आहे. मुलीं सुद्धा शिव्या देतात पण त्या मुलांएवढ्या तिखट नसतात. मुलींच्या शिव्या ह्या चिंचा, बोर आणि आवळ्याप्रमाणे आंबट, तुरट आणि काहीवेळेस बेचव असतात. ग्रामिण भागातल्या स्त्रिया मात्र याला अपवाद असतात असं म्हणता येईन. त्यांची शिव्यांमधली जाण भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारी असते. दारु पिल्यावर माणसाच्या जिभेवर शिवी अवतरते किंवा त्याला शिवी प्रसन्न होते असंही दिसुन आलेलं आहे. बहुतेक दारुचा अन शिवीचा कुठेतरी, काहीतरी संबंध असावा. काही लोक ही शिवीअ‍ॅडीक्ट असतात म्हणजे त्यांचं कुठल्याही वाक्य शिवीविना पुर्ण होत नाही. आजकाल शिवीमध्ये पुढच्याला कामही सांगण्याची प्रथा पडलेली आहे. ही शिवी देण्याची नवीन प्रथा सामान्यता शेतकरी आणि कोळी लोकांकडुन लोकांच्यामध्ये पसरली असावी असा माझा तरी कयास आहे.

इतिहासात डोकावला असता, चाकाचा, विमानाचा किंवा फोन चा शोध कधी लागला हे जसं निश्चीतपणे सांगता येतं तसं शिवीचा शोध नक्की कधी लागला हे सांगता येणं अवघड आहे. पण जेव्हा कुठलीही भाषा विकसीत होत असते तेव्हा त्याच्या अगदी सुरुवातीच्याच टप्याला शिवीचा शोध लागली असण्याची शक्यता आहे. पहिली शिवी कोणी कोणास दिली असावी याच्यावर आपल्या इतिहाससंशोधकांनी संशोधन करणे गरजेचं आहे. शिवीचा विकास कसा झाला, या विकासाला कोणी कसा हातभार लावला, शिव्या कशा पद्धतीने लोकांच्या मध्ये रुळल्या गेल्या आणि त्या तितक्याच लवकर प्रसिद्ध कशा झाल्या ही माहिती लोकांसमोर येणं गरजेची आहे. जसे साहित्यसंमेलन वा कवितांचे संमेलन होतात तसेच शिव्यांचे संमेलन होणं गरजेचे आहे. याच्याहीपुढे जाऊन शिव्यांसाठी खास स्पर्धा भरवल्या जाव्यात. शासन दरबारी शिव्यांची नेहमीच उपेक्षा झाली आहे. त्यामुळे शासनाने शिव्यांच्या आणि पर्यायाने भाषेच्याच विकासासाठी खास लक्ष देणं गरजेचं आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, अशीच विविधता शिव्यांच्या बाबतीतही आपल्याला इथे पहायला मिळते. कोल्हापुरी शिव्या आणि विदर्भातल्या शिव्या यामधला भाव जरी सारखा असला तरी त्यात वापरलेले शब्द, टोनींग किंवा शोधलेले वीक पॉईंट यात भिन्नता आढळते. सरकारने यासाठी लोकांना एक व्यासपीठ देणं गरजेचं आहे जिथे येऊन लोक आपल्या शिव्या एकमेकांशी शेअर करतील आणि आपल्या ज्ञानात भर टाकतील. महाराष्ट्राच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाने किमान हे एक तरी लोकोपयोगी काम करुन स्वताला लोकांच्या शिव्यांपासुन वाचवावं एवढीच एक छोटी अपेक्षा.

-अजय

(या वेळेस शिव्यांवर लिहीण्याचं धाडस मी केलेलं आहे. शिवीवर निबंध लिहीतानासुद्धा कुठेही शिवीचा वापर न करण्याची काळजी मी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वाक्यामध्ये शिवी वा शिव्या हा शब्द आणुन एक वेगळाच परिणाम साधण्याचा प्रयत्नही मी इथे केला आहे.)


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.चार गोष्टी.
२.उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.
३.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Monday, December 28, 2009

चार गोष्टी

१. लग्नाला उभे राहिलेले लोक हे लवकरच एक थट्टेचा विषय बनतात. शेंबुड न पुसता येणारया पोरासोरापासुन ते नव्वद वर्षाच्या आजोबापर्यंत सारयांचा एकच प्रश्न असतो..."काय मग कुठंपर्यंत आलंय लग्नाचं ? यंदा उरकरणार की नाही ? अहो बघुन बघुन असं कसलं स्थळ पाहताय ते तरी सांगा." किंवा "उरकुन टाक आता लवकर, बस्स झालं". लग्नाला उभे राहिलेयापेक्षा जास्त घाई यांनाच असते. अशा लोकांची जमात ही प्रत्येक समाजात आणि सर्व वयोगटात पहायला मिळते.

२. नवरा-बायकोमध्ये संवाद असणं फार गरजेचं असतं. आपला जोडीदार हा आपला सर्वात जवळचा मित्र असावा. त्याच्याशी गप्पा मारणं हे अगदी सहजतेनचं घडलं पाहिजे. त्यासाठी विषय किंवा वेळ शोधावी लागत असेन तर समजावं की कोणीतरी कमी पडतंय. बरेच वेळा नवरा बायको बाहेर जेवायला जातात आणि सुतक पाळल्यासारखं दोघंही शांत बसुन, एकमेकांकडे न पाहता जेवण करत असतात. ज्या टेबलावर चमचेच आवाज करतात अशा टेबल्यावरच्या लोकांची लग्न टिकतील ही पण त्याला यशस्वी झाली असं म्हणायचं का?

३. काही लोकांच्या मते मुल झाल्यावर बायको मधला 'चार्म' संपतो. मला अशा लोकांची खरंच किव येते. मुल झाल्यावर स्त्री कुणाची बायको, मुलगी किंवा बहीण रहात नाही. ती तेव्हा फक्त एका बाळाची 'आई' असते. तिच्या मनात त्यावेळेस फक्त ममत्वाचीच भावना असते. देवानेच स्त्री ला तसं बनवलंय त्याला आपण कोण होतो नावं ठेवणारे ?

४. एकसारखं एखाद्या मुलीकडे पाहण्याने ती मुलगी तुम्हाला पटेन ही खुळी समजूत आहे. खरं तर तिच्याकडे एकदाच पहा, नजरानजर होऊद्यात आणि नजरानजर झाली की तिला एक छोटीशी स्माईल द्या. पुन्हा त्या मुलीकडे बराच वेळ पाहूच नका पण थोडासा अंदाज घ्या की तिचं तुमच्याकडे लक्ष आहे का. आणि मग जाता जाता बराच वेळाने पुन्हा एकदा तिच्याकडे स्माईल देऊन जा. काही काही जण उगाचच लाळ गाळत एकसारखं मुलीकडे पहात असतात. मुलीसुद्धा अशा लोकांना किती भाव देतात त्याच जाणे.

५. ब्लॉग वर एक लेख लिहिण्यापाठीमागे ब्लॉगरची किती मेहनत असते हे एकदा स्वता एखादा लेख मराठीत लिहून पहा. एखादं पुस्तक वाचायचं म्ह्टलं तरी तुम्हाला पैसे देऊन ते पुस्तक विकत घ्यावं लागत. मग एखाद्याच्या ब्लॉगवर जाऊन जेव्हा तुम्ही त्याचे लिखाण फुकट वाचता तेव्हा फक्त 'छान लिहीलयंस' अशी एक प्रतिक्रिया द्यायला काय हरकत आहे ? मराठीचा कैवार घेणारे किंवा स्वताला 'तारणहार' म्हणविणारयांची भाषणं जर तुम्ही तासनतास ए॑कत असाल तर हीच मराठी जगण्यासाठी उत्तमोत्तम लिखाण करुन प्रयत्न करणारयांसाठी तुम्ही साधा एक मिनीट देऊ शकत नाही. एखादा लेख चांगला वाटला तर त्याला प्रोत्साहित करा, फायदा तुमचाच आहे कारण ब्लॉगर अजुन मेहनत घेऊन याहीपेक्षा चांगलं काही देण्याचा प्रयत्न करेन.

६. लोक देवाकडे हवं नको ते सारं मागायला जातात अगदी परीक्षेत चांगले गुण मिळुदेत पासुन मुलगा होऊदेत यापर्यंत सारंच. मी सुद्धा कित्येक वेळा मंदीरात गेलो आहे, दरवेळेस काही मागण्यासाठीच. देव सुद्धा प्रत्येकाच्याच अडचणी ए॑कत असतो. या जगातील प्रत्येक गोष्ट ही त्याच्या मर्जीप्रमाणेच चालली आहे याच्यावर­ माझा ठाम विश्वास. पण एखादी गोष्ट जशी आपण मागायला मंदीरात जातो त्याप्रमाणे ती गोष्ट मिळाल्यावरसुद्धा मंदीरात जावं आणि त्या विश्वविनायकाचे आभार मानावे. प्रयत्न आपले जरी असले तरी त्याला कुणाच्यातरी आशिर्वादाची गरज असतेच ना ! उगाचच का आपण आई-वडीलांच्या नतमस्तक होतो?

७. मागच्या आठवड्यात मी बिग बझार मध्ये गेलो होतो. तेथे घडलेला खराखुरा प्रसंग. मी तिथे खाण्यापिण्याच्या वस्तु घेत असताना एक मुलगा आला आणि म्हणाला की तुम्ही बेधुंद ब्लॉगवाले ना ? मला थोडंस आश्चर्य वाटलं पण थोड्याफार गप्पा मारुन मी तिथुन निघालो. देसाई आंबवाले किंवा चितळे बंधू मिठाईवालेसारखं 'अजय सोनवणे ब्लॉगवाले' असं आता नाव लावावं लागेन बहुतेक मला. ब्लॉगवालेच्या ए॑वजी ब्लॉगवाला असं मुस्लीम नावही आवडेन.:-)

-अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.
२.मी आणि माझी फिल्लमबाजी
३. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Thursday, December 24, 2009

'शिवाजी' म्हणजे काय ?

'शिवाजी' म्हणजे काय हे समजावून घ्यायच असेन तर ही ५ मिनिटांची क्लिप जरुर ए॑का. ( शिवाजी महाराज न म्हणता शिवाजी म्हटल्याबद्दल क्षमस्व. पण तिथे शिवाजी असंच म्हणायच आहे. )

बोला शिवाजी महाराज की जय !

Get this widget | Track details | eSnips Social DNAवि.सु : इथुन पुढे मी माझ्या ब्लॉगवरुन कुठल्याही प्रकारच्या ऑडीओ फाईल्स शेअर करणार नाही. या ब्लॉग वरुन मी फक्त माझे अनुभव, विचार, भावना आणि लेखच प्रसिद्ध करेन असं ठरवलं आहे.

-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.मी आणि माझी फिल्लमबाजी
२.फुंकर
३.मी 'पुरुष' बोलतोय !
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.

उद्धवजी,

माझं नाव अजय सोनवणे, वय २७, मुळचा पुण्याचा. पुण्यातच एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. काही दिवसांपुर्वी माझी कार मी एका शोरुम मध्ये सर्व्हींसींग साठी दिली असताना त्यांच्या हातुन ती ठोकली गेली व त्याची भरपाई न मिळता त्यांच्याकडुन उलट मला बरेच दिवस मनस्तापच भोगावा लागला. बरेच प्रयत्न करुनही त्या शोरुमचा मालक, जो एक उत्तर भारतीय आहे त्याच्याकडुन काहीच भरपाई न मिळाल्याने शेवटचा पर्याय म्हणुन मी शिवसेनेची मदत घेण्याचं ठरवलं. शिवसेनेच्या कॉल सेंटर ला फोन लावला आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीचं काय होईल अशी मनात शंका होतीच. आतापर्यंत राजकिय पक्षांचा अनुभव तसा फारसा काही चांगला नव्हताच आणि राजकीय पक्ष एका सामान्य व्यक्तीची तक्रार किती गांभीर्याने घेतील असा सवाल होता. पण शिवसेनेच्या कॉल सेंटर ने मला तातडीने नगरसेवक सागर माळकरांचा फोन नंबर दिला आणि तिथुनच सगळी चक्र पटापटा फिरू लागली. एक नगरसेवक, ज्यांचा नी माझा कधीही काही संबंध आला नव्हता, ना मी त्यांच्या मतदारसंघातला मतदारही नव्हतो, तरीही त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि कुशलतेने हे प्रकरण हाताळलं आणि मला योग्य तो न्याय मिळवुन दिला. भरपाई आणि त्याचबरोबर माझी गाडी ही मला मिळवुन दिली. एका सामान्य व्यक्तीसाठी एक नगरसेवक स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करुन एवढं काही करतो याच्यावर खरंच विश्वास बसत नव्हता. लोकशाहीमध्ये लोकांसाठी लोकप्रतिनिधीं असतो हे मला आज पहायला मिळालं.

ज्या पद्धतीने शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी आणि नगरसेवक सागर माळकरांनी हे प्रकरण शेवटपर्यंत लावुन धरत मार्गी लावलं त्याला तोड नाही. शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी दररोज मला स्वताहुन फोन करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी मोठी भूमिका बजावली. असा अनुभव मला कदाचित पहिल्यांदाच येत होता. सत्तेत नसताना एखादा पक्ष सामान्य लोकांची एवढी कामे करत असेन तर सत्तेत आल्यावर काय करु शकेन याचा आता लोकांनाही विचार करावा. माझ्या ब्लॉगच्या माध्यमातुन मी लोकांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवेन.
या कॉल सेंटरमागच्या कल्पनेला, सगळ्या अ‍ॅडमीनीस्ट्रेशनला, लो़कांची कामं करण्याच्या तुमच्या भावनेला आणि सागर माळकरांसारकख्या लोकप्रतिनिधींना माझा सलाम.

उद्धवजी, शिवसेनेचा भगवा तुमच्या हातुन असाच फडकत राहो. या कामी आमची तुम्हाला सदैव साथ राहीनच. आता तरी माझ्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा !
आपण या इ-मेल ला रिप्लाय देऊन मला याची पोचपावती द्यावी ही विनंती.

जय महाराष्ट्र !

-अजय सोनवणे
+९१-९८९०३०००४७

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.मी आणि माझी फिल्लमबाजी
२.फुंकर
३.मी 'पुरुष' बोलतोय !
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Wednesday, December 23, 2009

टॅग...

अपर्णा ने टॅग केलं म्हणुन हा सारा खटाटोप ...

1.Where is your cell phone?
कालपासुन बंद पडलाय. या सेल फोनने माझे आतापर्यंत ७ चार्जर बंद पाडलेत. आजचा ८ वा ही चार्जर बंद पाडलाय पा पठ्याने. पण मी ही काही कमी नाही. आज जाउन मी नववा चार्जर जाऊन आणणार पण फोन नाही बदलणार.

2.Your hair?
एकदम मोकळे मोकळे वाटतायत आज, आज जेलफिल नाही लावणार.

3.Your mother?
खुप प्रेमळ

4.Your father?

संत एकनाथासारखे शांत

5.Your favorite food?
वरण भात वरुन तुप, फीश, प्रांझ, महाराष्टीयन काहीही द्या !

6.Your dream last night?
मी माझ्या ड्रीम गर्ल बरोबर एखाद्या जंगल सफारीवर

7.Your favorite drink?
कॉफी

8.Your dream/goal?
एकदा तरी आयुष्यात केनियाची सफारी आणि इटलीला भेट

9.What room are you in?
बेड रुम

10.Your hobby?
चित्रपट पाहणे

11.Your fear?
मला एक भयानक स्वप्न नेहमी पडतं त्याचीच भीती वाटते.

12.Where do you want to be in 6 years?
जमिनीवरच...

13.Where were you last night?
घरीच

14.Something that you aren’t diplomatic?
जवळचे लोक

15.Muffins?
खुप

16.Wish list item?
कॅटरीना कैफ, आयेशा टाकीया ( दोघी भारी आहेत राव :-) )

17.Where did you grow up?
मुंबई (दादर) , भोर

18.Last thing you did?
आंघोळ

19.What are you wearing?
फॉर्मल ड्रेस

20.Your TV?
बातम्या शिवाय नाही पहात मी

21.Your pets?
काहीच नाही.

22.Friends
खुप, एकदम जवळचे मोजकेच


23.Your life?
इनज्याईंग

24.Your mood?
आज थोडा उदास आहे, मीटींग आहे ऑफीसात ना

25.Missing someone?
हो ( विचारलं नाही म्हणुन नाव सांगत नाही :-) )

26.Vehicle?
टू व्हिलर

27.Something you’re not wearing?
शुज

28.Your favorite store?
फिश करी जो चांगला देईन ते

Your favorite color?
जांभळा

29.When was the last time you laughed?
आज सकाळीच, एक सिनेमा पहात होतो

30.Last time you cried?
५ महिन्यापुर्वी, खुप कठीण काळ होता माझ्यासाठी तो. अंगावर पांघरून घेऊन खुप खुप रडलो, आयुष्यात पहिल्यांदाच एवढा रडलो असेन.

31.Your best friend?
लॅपटॉप

32.One place that you go to over and over?
टॉयलेट :-)

33.One person who emails me regularly?
कूणीच नाही तसं, मला फॉरवर्ड ईमेल आणि ब्लोग प्रतिक्रिया सोडुन काहीच ईमेल येत नाहीत :-(

34.Favorite place to eat?
पूण्यातल एक महाराष्टीयन थाळी देणारं


अगदी विक्रमी वेळात आजची ही पोस्ट लिहली. मजा आली पण.

मी मिनल, रोहीणी , भाग्यश्री ताईंना टॅग करतोय.

-अजय

Monday, December 21, 2009

मी आणि माझी फिल्लमबाजी

फार पाठीमागे नाही अगदी २० वर्षापुर्वी गोष्ट. तेव्हा आमच्या घरी एक क्राऊन चा जुना ब्लॅक अ‍ॅड व्हाईट टी व्ही होता. त्या काळी ब्लॅक अ‍ॅड व्हाईट टी व्ही ला थोडाफार कलर चा फिल यावा म्हणुन निळी काच लावलेली असे. आमच्यासाठी फिल्मी जग त्यावेळी फक्त त्या काळया, पांढरया आणि निळया या तीन रंगातच सामावलेलं होतं. रंगीत टी व्ही तेव्हा ­प्रत्येकाच्या घरी नसायचे. आमच्या घरी रविवारी भल्या पहाटेपासुन लवकर उरकण्याची घाई सुरु असायची. माझ्या आईला रविवारची 'रंगोली' फार आवडायची आणि तिच्यामुळेच मला सुद्धा. मग सकाळी सातच्या आत आमची आंघोळ वगैरे उरकुन आम्ही चारजण टी व्ही समोर अगदी अगदी ठाण मांडुन बसे. देवाच्या पुजेसाठी आम्ही एवढे भक्तिभावाने कधी बसलो नाही पण रंगोली साठी मात्र एक मिनीटभर सुद्धा जागचे हलत नव्हतो. त्या वेळी आठवड्यात एक दिवसच गाणी पहायला मिळत असे. त्यामुळे रंगोलीचं महत्त्व काही औरच होतं. मला त्यावेळेस राज कपुर आणि देवानंद फार आवडायचे. देवआनंदचं एका बाजुला तिरका तिरका होत पळणं पाहुन मला एकदा वाटलं होतं की आता हा नक्कीच खाली पडणार. तेव्हा मला आईने समजावलेलं की ही तर त्याची स्टाईल आहे. राज, रणधीर आणि राजीव, राज कपुर च्या एका गाण्यात लहान मुलं म्हणुन होती, रेखाला अमिताभशी लग्न करायच होतं, मीना कुमारी कॅन्सर मुळे मरण पावली आणि अशा बरयाच गोष्टी मला लहानपणीच समजल्या होत्या. मला त्यावेळी 'एक दोन तीन .." हे तेजाब मधलं गाणं पाठ होतं. मग कुणी नविन माणूस घरी आलं की आमचा न चुकता गाण्याचा कार्यक्रम होत असे. त्यासाठी कुणालाही मला 'अजय ते गाणं गाऊन दाखव बरं' असं म्हणण्याची मी वेळ येऊ दिली नाही. माझा आवाज चांगला नसतानाही फक्त या आवडीपोटीच मी शाळेच्या स्नेहसंमेलनात सुद्धा गायलो होतो. एवढंच काय आयुष्यात मी पहिलं कुठलं पुस्तक हातात घेतलं असं जर मला कुणी विचारलंच तर मी 'चांदोबा' सोडुन एखाद्या फिल्मी मासिकाचच नाव घेईन, याच्यावरुन तुम्हाला अंदाज आलाच असेन की मी किती फिल्मी आहे ते :-)

त्या वेळी टी व्ही म्हणजे म्हणजे डी डी नॅशनल वा ते एकच असं चॅनेल आम्हाला माहित होतं. शुक्रवार व शनिवारी हिंदी आणि रविवारी मराठी सिनेमा टी व्ही वर लागत असे. आठवड्यातुन इन मिन तीन सिनेमे म्हणजे आमच्यासाठी मोठा अर्पुप प्रकार होता. शुक्रवारच्या सिनेमाची तयारी सकाळपासुनच सुरु होई. आमच्या शेजारी राहणारा निलेश सिनेमा पाहण्यासाठी माझ्या सोबतीला असे. शुक्रवारचा सिनेमा कुठला या पासुन त्यात कोण कोण आहेत याची चर्चा आम्ही शाळेच्या कट्यापासुन ते मुतारी पर्यंत, सर्व जागी करत असे.
"आजच्या पिक्चर मध्ये कोण कोण आहेत ? हिरो किती आहेत त्यात ?"..मी, जेवढे जास्त हिरो तेवढी जास्त मजा असं साधं समीकरण असे आमचं.
"धर्मेद,जितेंद्र आणि बरीच गॅग आहे त्यात. आयच्या ...भारी पिक्चर दिसतोय".. निलेश. 'आयच्या' हा त्याचा भारी आवडता शब्द. हा शब्द तो प्रत्येक भाव व्यकत करणासाठी वापरी. म्हणजे आनंद झाला तरी आयच्या, दु:ख झालं तरी आयच्या, विस्मयचकीत झाला तरी आयच्या आणि राग आला तरी आयच्याच.
"फा़ईटींग आहे का राव...", मी, फाईटींग हा आमच्यासाठी सिनेमाचा आत्मा असे. पिक्चर मधील फाइटींग बघुन आम्ही खरया खुरया मारामारीत सुद्धा ढिशुम ढिशुम असा तोंडानेच आवाज करत असे. :-)
"हो मस्त फाईटींग दिसतेय, तुला माहितेय का त्यात हेलीकॉप्टर मध्ये सुद्धा फाईटींग आहे. त्यात हिरो कडे कुत्रा आणि माकड सुद्धा आहे...", निलेश. कुत्रा आणि माकड सिनेमात असणं म्हणजे जास्तच एंटरटेनमेंट.
"सॉलीड सिनेमा असणार राव मग...तु लवकर उरकुन घरी ये. आज मी शेवटपर्यंत सिनेमा पाहणार.", मी. निलेशला माझ्यासारखीच सिनेमाची आवड होती फरक एवढाच की मी सिनेमा पाहताना मध्येच झोपत असे आणि तो मला
सारखा हलवुन जागा करी. मी कधीच कुठलाही सिनेमा शेवटपर्यंत पाहिला नाही आणि टी व्ही सुद्धा कधी बंद केला नाही. पण सकाळी उठल्यावर टी व्ही कुणी बंद केला यापे़क्षा मी कुठल्या सीन नंतर झोपलो याचीच जास्त उत्कंठा असायची. निलेशला बिचार्‍याला दरवेळेस मला राहीलेल्या सिनेमाची स्टोरी सांगावी लागत असे.

एकदा मी नाना पाटेकरचा सिनेमा पाहुन शनिवारी सकाळी शाळेत गेलो. त्या दिवशी नाना पाटेकर माझ्या अगदी अंगात भिनलेला होता. त्यात इतिहासाच्या तासाला आमचे पाटील सर हे क्रांतीवीर नाना पाटीलांचा धडा शिकवत होते. शिकवता शिकवता त्यांनी अचानक माझ्या शेजारी बसलेल्याला उभं करुन नाना पाटीलांविषयी एक प्रश्न विचारला. त्याला उत्तर येत नव्हतं म्हणुन त्याने मला खुण केली. मी ही दिलं फेकुन ...नाना पाटीलांच्या ए॑वजी नाना पाटेकर. त्याने ही दिलं तेच उत्तर नाना पाटेकर म्हणुन. सगळ्या वर्गात हशा. मग काय पाटील सरांच्या अंगात माझा नाना पाटेकर घुसला आणि त्यांनी बिचारयाला चांगलचं झोडपलं. त्या मित्राचा अगदी कालपर्यंत असा गैरसमज होता की मी त्याला नाना पाटील म्हणालो पण त्यानेच नाना पाटेकर ए॑कलं. नुकताच त्याचा हा गैरसमज जेव्हा मी दुर केला तेव्हा त्याला माझ्या इनोसंन्ट चेहर्‍यामागचा खरा शैतानी चेहरा दिसला.

आमच्या घराच्या बाजुला त्यावेळी व्हिडीओ वर सिनेमा दाखविण्याचा उद्योग एकाने सुरु केला होता, तो माझा मित्रच होता. मग काय सिनेमा कुठलाही असो माझी उपस्थिती तिथे सन्मानणीय असायची. एकदा त्याने 'शोले' सिनेमा दाखविला. शाळेतली झाडुन सारी मुलं सिनेमा बघायला आली यात माझा थोडाफार हात होता. शाळेत जेव्हा याचा शोध लागला तेव्हा मग काय आम्हा सर्वांना समोर घेऊन चांगल्या छड्या मारण्यात आल्या. त्यानंतर माझे मित्र कित्येक दिवस मला सारखे 'कितने आदमी थे रे शोले देखेने...?" असं विचारायचे. :-)

रविवारच्या संध्याकाळच्या सिनेमासाठी मी आणि आमच्या घरचे सारेच, अगदी चारच्या आत सगळ काही आवरुन तयार होत असे. मग चार वाजता चहा घेता घेता आम्ही सारे अशोक सराफ, लक्ष्मीकांतचे सिनेमे पाहत असु. पण आमचे एक सर मात्र मुलांनी सिनेमा पाहण्याच्या अगदी विरुद्ध होते आणि त्यासाठीच ते सगळ्यांच्या घरी या वेळेत जायचे आणि जो सिनेमा पाहताना दिसेन त्याला झोडपायचे. मला याची कुणकुण अगोदरच लागली होती. म्हणुन मी घरी बाहेर जातो म्हणुन सांगितलं आणि स्वत: दरवाजावरुन पोटमाळ्यावर चढुन कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी सिनेमा पाहत बसलो. सर खाली चहा पित आहेत आणि मी पठ्या त्यांच्या वर बसुन सिनेमा पाहतोय असं त्यावेळी चित्र होतं. सिनेमा पाहण्यासाठी मी असे बरेच प्रकार केले आहेत.

सिनेमाच्या वेडापायी बराच वेळा मी सिनेमात जे दिसेन ते करायचा प्रयत्न करायचो. शाहरुख सारखे केस पुढे आणणं, गोविंदा सारखी शिटी वाजविणे, ते सिनेमातले डायलॉग्ज म्हणणं वगैरे. माझा भाऊ सुद्धा माझ्या एवढा नाही पण बरयापैकी फिल्मी होताच. इंजीनिअरींगला असताना तो उगाचच मायनस नंबरचा चष्मा घालायचा आणि आपण खुप अभ्यास करण्यातल्या कॅटॅगरीतले आहोत अस दाखवायचा. नंतर नंतर त्याने त्याच्या पॅन्ट सुद्धा बेल बॉटम घालणं सुरु केलं होतं पण तो पर्यंत ती स्टाईल गेली होती. माझी बहिण सुद्धा फिल्मी प्रकाराला अपवाद नव्हती. तिला करीश्मा न जाणो का पण आवडायची. मग तिच्यासारखे केशरचना करणे सारखे प्रकार आलेच. थोडे पुढचे केस मुलांसारख्रे उजव्या हाताला वळविणे व ते मधुन अधुन मानेला झटका मारुन मागे सारणे असा प्रकार तिने एकदा केला होता. पण नंतर मातोश्रींनी त्याला भलतीच उपमा दिल्याने तो लगेचच बंद झाला. माझ्या स्वभावगुणानुसार मला एकच हिरो वा हिरोइन जास्त दिवस आवडले नाही. सूरुवात राज कपुर पासुन करुन मी अगदी शाहरुख पर्यंत सगळ्यांना फॉलो केलं. कोणी एके काळी मला मिथुनदा ही आवडायचा हे मी आज सर्वांसमोर मान्यही करतो. शाळेत असताना मी भलताच फिल्मी प्रेमी होतो, पण कॉलेज मध्ये माझं हे वेड बरंच कमी झालं. नोकरीला लागलो आणि या वेडाला पुन्हा पालवी फुटली. एकदा असाच एका मैत्रीणीबरोबर सिनेमा पहायला थिएटरला गेलो आणि मध्यांतराला कळलं की माझ्या पुढे दोन तीन सीटवर माझेच एक मित्र आणि वहिनी बसलेल्या आहेत. मग काय, सिनेमा संपायच्या आतच मी मैत्रीणीला घेऊन थिएटरच्या बाहेर. तसं माझं आणि तिचं काही नव्हत पण दोघेच सिनेमाला आलोय असं जर त्याला दिसलं असतं तर त्याने मला आयुष्यभर त्याच विषयावर चिडवलं असतं.

असं हे माझ चित्रपटांचं वेड, हवंहवंस पण नामानिराळं !

मी
वीस वर्षे
अंदाजे १५ भाषा
१० वा अधीक देशांचे
४००० पे़क्षा जास्त सिनेमे
ज्यात १०००० हुनी अधिक कलाकार
प्रत्येक सिनेमात हाताळलेला नविन विषय
दररोज एक तरी सिनेमा पहायचा असं समीकरण
आणि हे वेड आयुष्याच्या शेवटपर्यंत जोपासण्याचा ध्यास...

- अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. फुंकर
२. मी 'पुरुष' बोलतोय !
३. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Monday, December 14, 2009

फुंकर

"जीवन म्हणजे ऊन पावसाचा खे़ळ आहे. जसं उन्हामागुन पावसाळा येतो तसंच दु:खामागुन सुख येतं,,," हे वाक्य मी शाळेत असताना नेहमी ए॑कायचो. कधी हे वाक्य सुविचाराच्या फळयावर लिहिलं असायचं तर कधी ते कुठल्यातरी निबंधाच्या पुस्तकात असायचं. त्या काळी मला या जीवनाबद्दलच्या वाक्यांमधले शब्द भारी भारदस्त वाटायचे पण कधी अर्थ समजला नाही. अर्थ समजावुन घ्यावं असही कधी त्या कोवळ्या वयात वाटलं नाही. आयुष्यातली एकेक वर्ष जसजशी कमी होत गेली तसतसं या शब्दांचा अर्थ मला गवसत गेला पण जीवनाबद्दलच गुढ मात्र वाढतच गेलं. आज ही जेव्हा मी मागे वळुन फळ्यावरचं ते वाक्य डोळ्यासमोर आणतो तेव्हा मला काहीतरी नवाच अर्थ गवसलेला असतो. हे जीवन अजुनही मला दररोज काहीतरी नवीन शिकवायचा प्रयत्न करतं.

जीवन हेच मुळी खुप संमीश्र असतं. कधी ते तुम्हाला खुप हसवेन तर कधी अचानक डोळ्यातुन पाणीही काढेन. 'जगी सर्वसुखी असा कोण आहे..?", सर्वसुखी असा कुणीच नाही, भोग हे प्रत्येकाच्याच वाटयाला असतात. फरक एवढाच की त्यांचा काळ वेगळा असतो. कुणाला मुल होत नाही याचं दु:ख तर कुणाला मुलगा होत नाही याच दु:ख तर कुणाला मुलगा सांभाळत नाही म्हणुन काळजी. कुणी प्रियकर किंवा प्रेयसी शी भेट होत नाही म्हणुन दु:खी तर कुणी लग्न होत नाही म्हणुन चिंतातुर तर कुणी लग्न झाल्यावर नवरा/बायको पहिल्यासारखं प्रेम करत नाही म्हणुन खट्टु. कुणी संसारात नवरयामुळे सुखी नाही तर कुणी सासुमुळे. कुणाला एकट जगण नकोसं झालय तर कुणाला एकत्र कुटुंबात राहण मान्य नाही. कुणी नोकरी नाही म्हणुन वणवण भटकतोय तर कुणी खुप काम आहे म्हणुन अस्वस्थ तर कुणी नोकरी करुन कंटाळलेला. प्रत्येकजण कशात ना कशात तरी अडकलेला. विवंचना पत्येकालाच आहेत कारण वेगवेगळी फक्त.

लहान असतानाची लवकर मोठं होण्याची इच्छा जेव्हा पुर्ण झाली तेव्हा त्या आनंदाला एक दु:खाचीही किनार होती. जसजस वय वाढत गेलं तसतसा मी मोठा झालो पण या मोठ्या लोकांचे प्रश्न ही मोठेच ना. बरयाच वेळेला माझ्याही आजुबाजुला वादळं घोंघावली. कधी कधी मी त्यात सापडलो, धडपडलो तर कधी सहीसलामत बाहेर ही पडलो. जेव्हा खाली पडलो त्यानंतर एका नवीन उमेदीने उभाही राहीलो. अशाच वादळांनी मला शिकवलं पाय रोवुन उभं रहायला. आजुबाजुला सगळ्या गोष्टी जेव्हा जमीनदोस्त होत असतात तेव्हा डोकं शांत ठेवुन पुढची वाटचाल करायला आणि पुन्हा आपल्या जहाजाचं शीड उभारुन नवीन किनारा शोधायला. नवनवीन आव्हान असली तर मजा येते जगण्याला नाहीतर मिळमिळीत आयुष्य काय कामाचं ? परीक्षा नसेन तर आपण कधी पायरी चढुच शकणार नाही. आव्हान येतात ते आपल्या बाहुतलं बळ पहायला. त्या आव्हानाला परतुन लावण्यासाठी तुमचे बाहु तेव्हा फुगले पाहिजेत. त्यांना घाबरुन जो पळतो त्याच्याचमागे ते हात धुऊन लागतात.

तुम्ही कधी वर्तमानपत्रातली 'वाघाला बकरी जवळ घेउन जाणारा रस्ता शोधा" हे कोडं सोडवलंय का ? त्यात एका टोकाला वाघ, एका टोकाला बकरी आणि मध्ये रस्त्यांचं जंजाळ असतं. त्यात बरेच रस्ते हे फसवे असतात तर काही मध्येच संपणारे. काही रस्ते आपल्या जिथुन सुरुवात होते तिथेच पुन्हा घेऊन येतात. त्यातला एकच रस्ता असा असतो जो आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातो. तुम्हाला नेमका तोच रस्ता शोधायचा असतो. तुम्ही जर अशी कोडी उलटी सोडविलीत म्हणजे उत्तरापासुन सुरुवात करुन प्रश्नाकडे पोहोचायचं तर तुम्ही लवकर कोडं सोडविण्यात यशस्वी होता. आपल्या आयुष्यात अशीच कोडी आपल्याला सोडवायची असतात. एक कोड सुटलं की दुसरं मग तिसरं. उसंत मिळाली तर ठीक नाहीतर चालुच. देव आपल्याला असे प्रश्न सोडवायला देऊन आपली परीक्षाच घेत असतो. उत्तराकडुन जर प्रश्नांच्या दिशेने प्रवास केला तर असे आयुष्यातले मोठे प्रश्न ही सुटू शकतील.

जेव्हा जेव्हा असे कठीण पसंगातुन तुम्ही जात असता तेव्हा आपलीच माणसं कधीतरी खुप दुर गेल्यासारखी वाटतात तर कधी तो एकदम परकी आहेत अस भास होतो. माणुस म्हणजे तर्‍हेवाईकपणा आलाच. काहींचा तो स्वभावगुण असतो तर काहींचा तो कावा. जेव्हा तुमचं दु:ख कधी अनावर होईन, सगळे जवळचे परके वाटायला लागतील, जेव्हा देवाने टाकलेला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेनासं होईन, जेव्हा तुम्हाला असं वाटेन की आता मी अगदीच एकाकी पडलोय किंवा अगदीच अगतिक झालोय तेव्हा ... तेव्हा आपलं दु:ख कुणाजवळ तरी मो़कळ करावं, त्याला वाट करुन द्यावी. अशावेळेस बोलावं, भरपुर बोलाव अगदी मोठमोठ्याने ओरडावं आणि आतला ज्वाला बाहेर आणावा. काहीही झालं तरी बोला, सांगा, शेअर करा.

२-३ दिवसापुर्वी एका मैत्रीणीशी बोलत असताना तिने असंच तिचं मन मोकळं केलं आणि मग मला तिची होणारी फरफट, तिचा त्रागा समजला. एखादी व्यक्ती आयुष्यात एवढं कसं काय सगळ सहन करु शकते ? एखाद्याला इतकं सहनशील होता येतं ? कधी कधी वाटतं की मी माझ्या आयुष्यात अजुन काहीच वादळ झेलली नाहीत. लोकांची दु:ख पाहिली की माझी दु:ख मला खुप छोटी वाटु लागतात. लोकांची दु:ख समजुन घेण्याबरोबरच ती कमी कशी करता येतील याचा मी बराच वेळा विचार करतो पण उत्तर मात्र सापडत नाही.

"भाजलेल्या जागेवर फुंकर मारुन वेदना कमी करता येतात पण एखाद्याच्या पोळलेल्या मनावर कशी फुंकर मारायची, कुणी सांगेन का मला...?"

-अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. मी 'पुरुष' बोलतोय !
२. यंदा कर्तव्य आहे ?
३. ब्राईड-हंट
---------------------------------------------------------------------------------