मी काही तसा हाडाचा वकता वगैरे कधीच नव्हतो आणि अजुनही नाही. जेव्हा मी पाचवीत असेन तेव्हा मी आयुष्यातलं पहीलं-वहीलं भाषण ठोकलं होतं. ठोकलं यासाठी म्हणालो कारण ते भाषण मी एवढं पाठ करुन गेलो होतो की मला पुढची मुलं सोडुन फक्त लिहलेल भाषणच दिसत होतं. माझ्यात तसं स्टेज डेअरींग यथातथाच होतं पण वर्गात सर्वात स्कॉलर आणि पहिला येणारा विद्यार्थी म्हणुन दरवेळेस कुणाची जयंती,पुण्यतिथी किंवा अजुन काहीही कार्यक्रम असो, माझं नाव भाषणाच्या यादीत असायचं म्हणजे असायचचं. मी ही कधी नाही म्हटलो नाही कारण मलाही भाषण करणं हा प्रकार भारी आवडायचा.
भाषण म्ह्टलं की त्या विषयावरचा किंवा त्या व्यक्तिचा अभ्यास गरजेचा असायचा. मग सुरु व्हायचा माझा शोध. पुस्तकं गोळा करा, वाचनालयात जा, सरांना गाठा वगैरे. माहिती गोळा करुन झाली की मग स्वत:चं भाषण स्वत: लिहायचं. एवढं झाल्यावर मग ते पाठ करा, त्यासाठी भल्या पहाटे उठा. आरशासमोर उभं राहुन रंगीत तालीम करा. भाषणाच्या आदल्या दिवशी आई-पप्पां समोर एकदा ते भाषण करुन दाखवा असे प्रकार मग सुरु व्हायचे. एवढं सगळं करुन मग मी एखाद्या मोहिमेवर निघाल्यासारखा दही-साखर खाऊन घरातुन बाहेर पडायचो. बरं जाताना तो भाषणाचा कागद बरोबर असायचा. एवढ्या कष्टांमुळे तो ही अगदी जीर्ण होऊन जायचा. निघाल्यापासुन ते अगदी भाषण होईपर्यंत मी कुणाशीही जास्त बोलत नसे कारण एकदा पाठ केलेलं भाषण बिलकुल विसरता कामा नये ही काळजी. मला कधीही भाषण करताना कागद बाहेर काढावा लागला नाही. एकदा मात्र बोलता बोलता समोर हसणाररया मित्राचं तोंड पाहिलं आणि पुढची वाक्यचं विसरलो. त्याही परिस्थितीत मी कागद बाहेर काढला नाही. लागलीच...जय हिंद..जय महाराष्ट आणि छू मंतर. माझ्या वर्गात एक मुलगी होती. तिचा एवढा हळू आवाज होता की तिच "जय हिंद..जय महाराष्ट" सोडुन बाकी काहीच ए॓कू येत नसे. "जय हिंद..जय महाराष्ट" हे वाक्य मात्र ती मोठ्याने म्हणत असे. ते ए॓कल की सगळेजण अचानक झोपेतुन जागे होत आणि टाळ्या वाजवत.
भाषण म्हटल की माझ्या मनात नेहमी एक द्वंद्व सुरु व्हायच...भाषणाची सुरुवात मी बंधू-भगिनींने करू की मित्र-मैत्रिणींनो. सुरुवातीला मी, विवेकानंदांपासुन प्रेरणा घेउन म्हणा किंवा एक चाल होती म्हणुन म्हणा, बंधू-भगिनीं असेच म्हणत असे. पण एवढ्या छान छान मुलींना सर्वांसमक्ष भगिनी म्हणणं मला जडच जायचं. विवेकानंदांची केस थोडी वेगळी होती. त्यांचा ऑडीयन्स वेगळा असेन पण माझ तसं नाही ना. 'भगिनी' पेक्षा 'मैत्रिण' हा शब्द मला जास्त 'जवळचा' वाटे. जसजसं वय वाढत गेलं तसतसा मी माझ्या भाषणातुन ही जवळीक वाढवतच गेलो.
मी केलेलं पहिल भाषण बहुतेक लोकमान्य टिळकांवरच असेन. ज्या व्यक्तीचं भाषण असायचं ती व्यक्ती माझ्या अंगात संचारत असे. एकदा का भाषण सुरु झालं की संपेपर्यंत मी त्या व्यक्तीचं आयुष्य जगे. संपुर्ण भाषणात हातवारे, आवाजातला चढ-उतार आणि श्रोत्यांवर छाप पाडणे ही कला मी हळुहळु आत्मसात करत गेलो. समजा लोकमान्यांचा जन्माचा प्रसंग असेन तर मी अगदी शाहिराप्रमाणे तो रंगवुन सांगे, त्यांच्या मृत्युची वेळ असेन तर अगदी कमी आणि रडलेला आवाज, असे नाना बदल मी भाषणात करत असे. हातवारे ही तर माझी खुबी होती. "स्वराज्य माझा जन्मसिद्ध..." म्हणताना माझा एक हात कंबरेवर आणि दुसरा हवेत असे. एकदा असंच आमच्या संस्थेच्या संस्थापकाच्या पुण्यतिथीला मी भाषण केलं. त्या भाषणात "इवलेसे रोप लावियले द्वारी...तयाचा वेलू गेला गगनावरी" असं एक वाक्य होतं. "इवलेसे रोप" याच्यासाठी हावभाव करताना जेव्हा मी खाली बसुन हाताची अॅक्शन केली तेव्हा मागे बसलेले काही जण उभे राहुन पाहु लागले की मी मध्येच हे काय सुरु केलं म्हणुन. :-)
एकदा का मी कुणावरती भाषण केलं की तेच भाषण मी २-३ वर्ष तरी सहज रिपीट करायचो. मग त्या व्यक्तीची जयंती असो वा पुण्यतिथी माझ्या भाषणात कधीच बदल होत नसे. जयंती आणि पुण्यतिथीतला फरक मला उशीरा समजला. एखाद्या भाषणात आवडलेलं वाक्य किंवा सुभाषित मी प्रत्येक भाषणत वापरत असे. म्हणजे आता हेच बघा ना...चिखलात जसं कमळ उगवावं तसं टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखलगावातल्या एका गरीब कुटुंबात झाला. हेच वाक्य बापुंच्या भाषणात कसं ते पहा. चिखलात जसं कमळ उगवावं तसं बापुंचा जन्म गुजरात राज्यातील पोरीबंदर येथील एका गरीब कुटुंबात झाला. तसंच प्रकरण मृत्युचंही. मृत्यु कधी झाला याच्याशी मला काही देणंघेणं नसे. म्रुत्युच्या वेळेस "सुर्य अस्ताला चालला होता त्याचवेळेस हा सुर्य सुद्धा अनंतात विलीन झाला" हे माझं वाक्य प्रत्येक भाषणात असे, भले ती व्यक्ती जरी सकाळी गेली असली तरी आमच्या भाषणात ती आमच्याच सुर्याबरोबर संध्याकाळीच विलीन होत असे.
शाळेत भाषण करुन जेव्हा माझा आत्मविश्वास वाढला तेव्हा मी ठरवलं की आता आपण भाषणाच्या स्पर्धेत भाग घ्यायचा. भाषण करण्यापेक्षा त्या स्पर्धेसाठी फिरायला मिळेन हा त्यामागचा छुपा हेतु. बराच वेळा मी अशा स्पर्धेसाठी बाहेरच्या शाळेत जायचो. एकदा असंच एका स्पर्धेला गेलो असताना मी माझं भाषण विसरुन माझ्या मित्रांचंच भाषण ए॓कत बसलो. एकदा तर चक्क माझा भाषणाचा नंबर आला तेव्हा सभागॄहात इन मिन तीनच लोक होते. मी, एक परीक्षक आणि त्या शाळेचा शिपाई. शिपाई यासाठी की त्याला ते सभागृह बंद करायचं होतं.:-)
तस मी नेहमीच मराठीतच भाषण केलं. शाळेच्या जरी नावात "इंग्लिश" असं असलं ( न्यू इंग्लिश स्कुल ) तरी माझी शाळा ही मराठी शाळा होती. माझा तसा फक्त इंग्लिशच्या पिरीयडलाच इंग्लिशशी संबंध येत असे. त्यामुळे स्वतःची इंग्लिशमधली जाण ओळखुन मी कधीच इंग्लिशमध्ये भाषण करण्याच्या फंदात पडलो नाही. मी दहावीत असेन तेव्हा निरोप समारंभाच्या अगोदर ( Send-off ) संपुर्ण शाळा एक दिवस दहावीच्या विद्यार्थानी चालवावी असा प्रघात होता. मला हेडमास्टर बनवलं गेलं आणि माझ्यावर आमच्या हेडमास्टरांप्रमाणे इंग्लिश शिकवण्याची जबाबदारी आली. ती मी कशी का होईना निभावली. त्याचवेळेस इंग्लिशमधुन मी भाषणही केलं. त्यावेळेस माझी एवढी तंतरली होती की मी मधली काही वाक्य गाळुन कसंबसं भाषण पुर्ण केलं. दहावी झाली आणि अशी ही माझी भाषणबाजी सुद्धा संपली.
आता या वयात या सगळ्या गोष्टीं आठवुन खुप हसु येतं पण खरंच हे असे प्रकार प्रत्येक जणच लहानपणी करतो. 'लहानपण देगा देवा...' हे उगीचच का प्रत्येकजण म्हणत असतो !
-अजय
या ब्लॉग वरचे सर्वात जास्त वेळा पाहिले गेलेले पोस्ट वाचा.
१. ब्राईड-हंट
२. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
7 comments:
jhokyat chalalie gadi rao...
chhan lihitoys keep it up!
-mugdha
www.mugdhajoshi.wordpress.com
मस्तच लिहिलंयंस रे...
"सुर्याचं अस्ताला जाणं" तर भारीच :)
Tu vargat pahila yaychas ??
@mugdha, satish - dhanywad
@amey - ho ree , ka bar, bhagun vatat nahi ka majhykade ? :-)
mastach. dont know how I missed it... मी सुध्धा शाळेत असताना दरवर्षी टिळक आणि बापूंच्या पुण्यतिथीला आणि जयंतीला तीच तीच भाषणे ठोकत असे :) इतिहासातल्या जन्मतारखा साल सणावर कधी लक्षात राहीले नव्हते पण टिळक आणि बापूच्या जन्म आणि मरणाच्या तारखा मात्र चांगल्याच पाठ झाल्या होत्या :)
Dhanywad Pravin, tujhykadun lavkarach yachyavar post vachayala milen ashi apeksha karto
Sahich ahe..
Chan karaychas bhashanachi tayari.. Ani sagalyanna suryasta chya veli swargloki pathavaychas kay..! :-))
Mast lihitos..
Post a Comment