Friday, August 21, 2009

स्वप्न

आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याची तशी प्रत्येकालाच उत्सुकता असते. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांचा बारकाइने अभ्यासल्या तर तुमच्या असं लक्षात येइन की त्या घटना घडण्याच्या आधी तुम्हाला त्या होणार आहेत याची कुठेतरी कल्पना आधीच आलेली असते. त्या घटना घडुन गेल्यानंतर जेव्हा आपण ते सर्व धागे एकत्र जोडतो तेव्हा लक्षात येतं की आपण कुठेतरी हे सगळं समजायला कमी पडलो किंवा त्याचा योग्य अर्थ त्यावेळेला समजु शकलो नाही. माझ्याबाबतीत काल एक वरवर साधी वाटणारी पण काहीशी चमत्कारीक अशी घटना घडली आणि माझा शकुन, स्वप्न, दुष्टांत या गोष्टींवरचा विश्वास अधिकच दॄढ झाला ( पुन्हा एकदा !).

मंगळवार, सकाळचे ८ वाजले असतील. मी कसाबसा डोळे चोळत उठलो. नऊ तास झोपुनही माझ्यावर झोपेचा अंमल कायम होता. रात्री पडलेलं स्वप्न मी आठवायचा प्रयत्न करत होतो. गेले ४-५ दिवस मी घरुनच काम करत होतो. त्यादिवशी एक प्रेझेंटेशन द्यायचं होतं त्याची तयारी ही करत होतो. त्यासाठीच्या १०-१२ स्लाइड्स बनवुन झाल्या होत्या. बरोबर नोट्स ही काढल्या होत्या. आता पुन्हा एकदा सगळ्यावरुन शेवटची नजर फिरवली म्हणजे झालं. पण आज जे काही स्वप्न पडलं होतं त्यामुळे माझं मन थोडंस का होइना बेचैन झालं होतं.

तसा माझा स्वप्नांवर बिलकुल विश्वास नाही आणि त्यांचा अर्थ लावायच्या भानगडीतही मी पडत नाही. त्याला कारणही तसंच आहे. मला पडणारी स्वप्नंच चित्रविचीत्र असतात. प्रत्येक स्वप्न मला सकाळी आठवणेच असं नाही. एका स्वप्नात मी हिमालयात, बर्फात ते पण , सायकलीवरुन कोंबडीचा पाठलाग करतोय. एका स्वप्नात मी पाण्यात पुस्तक वाचतोय आणि त्याच पुस्तकाच्या एका पानातुन मी केनियाच्या जंगल सफारीला जातो असं काहीतरी. आता हिमालयात कोंबडी आणि सायकलचा काय संबंध ?

असो. त्यादिवशी पडलेलं स्वप्न हे मी सकाळी उठुन आठवायचा प्रयत्न करु लागलो. माझ्याबाबतीत काहीतरी 'वाईट' घडलंय आणि मी त्यादिवशी प्रेझेंटेशन हे उशीरा दिलं असं काहीसं ते स्वप्न होतं. वाईट काय घडलं हे मला आठवत नव्हतं किंवा स्वप्नात ते मी पाहिलं नसावं. नेहमी पडतात तसं हे ही एक स्वप्न याप्रमाणे मी ते स्वप्न विसरुन गेलो.

संध्याकाळचे पाच वाजले. मी सर्व काही उरकुन ऑफीसला निघायच्या तयारीत होतो. माझ्या सॅक मध्ये दोन्ही लॅपटॉप आणि रेनकोट टाकला, गाडीला किक मारली आणि निघालो. चव्हाणनगर(सातारा रोड) ते बाणेर हा तसा दररोजचा प्रवास. बाहेर आभाळ भरुन आलं होतं. पावसाची ही चिन्ह होती. पर्वतीला पोहोचतो तोच पावसाला सुरुवात झाली. थोडयाच वेळात पावसाचा जोर चांगलाच वाढला. रेनकोट घातलेला असुनही मी गाडी कडेला घेतली आणि शांतपणे आडोशाला पाऊस थांबण्याची वाट पहात उभा राहीलो. बराच वेळ झाला पण पाऊस काही थांबेना. वेळेत पोचायचं म्हणुन मी नाइलाजेने पावसात जाण्याचं ठरवल. पाउस चांगलाच कोसळत होता आणि थोड्याच वेळात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. थोडं पुढे जातो न जातो तोच काहीतरी आवाज झाला आणि माझी गाडी अडकल्यासारखी झाली. एकदम तोल गेल्यासारखं झालं होत. साइड स्टँन्ड न काढल्यामुळे बहुतेक तसं झालं असावं. पावसामुळं पुढचं निटंसं दिसत नव्ह्तं. पुढे जातो न जातो तोच गाडीचं पुढचं चाक कशाततरी अडकलं. चाक काढण्याचा प्रयत्न केला पण...शेवटी गाडीवरुन उतरावंच लागलं आणि २-३ मिनीट प्रयत्न केल्यावर चाक निघालं. लगेच निघालो. पुढे गेलो तर गरगरल्यासारखं झालं. काहीच समजेनासं झालं...अचानक ते पण. लगेचच स्वत:ला सावरलं.
झेड ब्रिज ओलांडुन पुढे फर्गुसन रोडवरुन विद्यापीठ रोड ला लागलो आणि मागुन हॉर्न वाजवत आलेली एक सुमो जीप आरशात पाहिली. क्षणाचाही विलंब न करता गाडी बाजुला घेतली आणि सुमोवाला कट मारुन गेला. पुढे गेलो आणि विद्यापीठजवळ गाडी घसरली. अजुन पुढे गेलो. बाणेर रोड वर ऑफीस जवळ एक कारवाला अंगावरच आला. त्याच्यातुनही सुटलो. मनात विचार येत होते की आज माझ्या हातुन असं काय होतंय. सगळ्या गोष्टी अगदी ठरविलेल्याप्रमाणे अशा काय घडत आहेत. एवढे सगळे प्रसंग ते पण मोजुन अर्ध्या तासात ! एवढे दिवस मी दररोज याच रस्त्याने येतो पण आजच्या सारखा प्रकार कधीच घडला नाही. बरेचशे प्रश्नांच ओझं मनातच ठेवुनच मी गाडी पार्क केली, रेनकोट काढला, केस कोरडे केलं आणि तेवढ्यात सकाळच स्वप्न आठवलं. घड्याळाकडे पाहिलं आणि एक छद्मी हास्य चेहरयावर उमटलं. ६.२० झाले होते. म्हणजे अजुन ४० मिनीट होते तर. तेवढा वेळ मला पुरेसा होता सेट-अप करण्यासाठी. म्हणजे मला पडलेलं स्वप्न हे ख्ररं होणार नव्हत तर !

वर ऑफिस मध्ये गेलो. अगोदर थोडा फ्रेश झालो. मग जागेवर येऊन सॅक उघडली. एक लॅपटॉप बाहेर काढला. थोडासा ओला झालेला दिसला. शीट...यात तर माझा बराच डेटा आहे. आयची कटकट...पाण्याच्या बादलीतुन कपडा बाहेर काढावा तसा तो दुसरा लॅपटॉप मी बाहेर काढला. सॅकच्या एका कप्यात पाणीच पाणी. या लॅपटॉपवर माझं संपुर्ण प्रेझेंटेशन होतं. आता मात्र माझी खरोखरच फाटली होती. मोजुन २० मिनीटे होती माझ्याकडे. दोन्ही लॅपटॉप सिस-अ‍ॅडमिनकडे दिले, एक मशीन सुरु होण्याची शक्यता नव्हतीच. एकाचा लॅपटॉप घेतला, पटकन सगळ काही आठवुन स्लाईड्स तयार करायला बसलो. सोर्स कोडची एक कॉपी डेस्कटॉप मशीन वर होती म्हणुन बरं झालं. कॉन्फरन्स रुम मध्ये गेलो आणि सगळा सेट-अप केला. नंबर डाएल केला आणि थोडंस लेट सुरु करेन असं सांगितलं कारण अजुन काही स्लाईड्स करायच्या बा़की होत्या. त्यानंतर ...सगळं काही झाल्यावर प्रेझेंटेशन १५ मिनिट उशीरा सुरु झालं.

प्रेझेंटेशन संपवुन बाहेर पडलो तेव्हा डोक्यात फक्त मला पडलेल्या स्वप्नाचाच विचार चालू होता. ते स्वप्न खरं ठरलं होतं. फक्त त्यात माझ्या बाबतीत काय वाईट घडलं हे मी तेव्हा पाहु शकलो नव्हतो पण ते सारं मी अनुभवलं होतं. म्हणजे कुठेतरी मला हे अगोदरच माहीत होतं की असं काहीतरी घडणार होतं पण तरीही मी काहीच करु शकलो नाही हीच एक गोष्ट मला अजुनही खटकतेय.

तुम्ही अल-केमिस्ट वाचलय ? त्यातही अस म्हटलय की आपल्या आजुबाजुच्या घडणाररया प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष द्या, त्या तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात. त्यांचा अर्थ लावा म्हणजे तुम्हाला बरंच काही समजेन. प्रत्येक जण तो अर्थ लावु शकत नाही. खरं तर ते सगळे देवाचे संदेश असतात. या शकुनांचा जर अर्थ उलगडला तर आपण आपल्या आयुष्यात घडणारया गोष्टीं अगोदरच पाहु शकतो.

-अजय

6 comments:

Photographer Pappu!!! said...

माझी स्वप्ने ही देखील अशीच काहीतरी असतात. मी कधी अर्थ लावायाचा प्रयत्न केला नाहीय, यापुढे करेन म्हणतो.

Satish Gawde said...

खरंय मित्रा तुझं. आपण स्वप्न म्हणून दुर्लक्ष करतो आणि मग घटना घडून गेल्यावर आपल्याला जाणवतं की याची पुर्वसुचना तर आपल्याला मिळाली होती.

लेख छान झाला आहे...

Anagha said...

naahi patle..
je hotay te TYA parmeshvaraavar vishwas theun swikaraav ase vatte.. :)
Lekh chaangalaa aahe pan . purvasuchannan sathi aaple man tevhade tayaar pahije naa???

Mugdha said...

Chhan lihilays!! majhyababtitahi asa hota barechda...

Ajay Sonawane said...

@प्रविण : धन्यवाद !
@सतिश : असं खरंच वाटत की पुर्वसुचना मिळायला हवी होती पण खरं सांगु काही वेळेस आपल्याला अशा बरयाच हिंट मिळत असतात, त्या समजुन घेणं एवढंच आपलं काम.
@अनघा: परमेश्वरावर आपण सारखं नाही सोपवुन देऊ शकत, आपलं मन तयार पाहिजे पुर्वसुचना साठी म्हणजे तुला काय म्हणायचं ते मला नाही समजलं पण ठीक ए ! धन्यवाद !
@मुग्धा: धन्यवाद, बरेच दिवस झालं तुझ्याकडुन नवीन काही वाचायला नाही मिळालं :-)

Madhuri Kulkarni said...

if only...nawacha cinema aala hota 2005 madhe. Tyat asech kahise nayaka babat ghadate.
Its really a good movie. Last yearla aalela roobaroo dekhil tyawarach betalela hota.

Madhuri