Friday, August 21, 2009

भाषणबाजी

मी काही तसा हाडाचा वकता वगैरे कधीच नव्हतो आणि अजुनही नाही. जेव्हा मी पाचवीत असेन तेव्हा मी आयुष्यातलं पहीलं-वहीलं भाषण ठोकलं होतं. ठोकलं यासाठी म्हणालो कारण ते भाषण मी एवढं पाठ करुन गेलो होतो की मला पुढची मुलं सोडुन फक्त लिहलेल भाषणच दिसत होतं. माझ्यात तसं स्टेज डेअरींग यथातथाच होतं पण वर्गात सर्वात स्कॉलर आणि पहिला येणारा विद्यार्थी म्हणुन दरवेळेस कुणाची जयंती,पुण्यतिथी किंवा अजुन काहीही कार्यक्रम असो, माझं नाव भाषणाच्या यादीत असायचं म्हणजे असायचचं. मी ही कधी नाही म्हटलो नाही कारण मलाही भाषण करणं हा प्रकार भारी आवडायचा.

भाषण म्ह्टलं की त्या विषयावरचा किंवा त्या व्यक्तिचा अभ्यास गरजेचा असायचा. मग सुरु व्हायचा माझा शोध. पुस्तकं गोळा करा, वाचनालयात जा, सरांना गाठा वगैरे. माहिती गोळा करुन झाली की मग स्वत:चं भाषण स्वत: लिहायचं. एवढं झाल्यावर मग ते पाठ करा, त्यासाठी भल्या पहाटे उठा. आरशासमोर उभं राहुन रंगीत तालीम करा. भाषणाच्या आदल्या दिवशी आई-पप्पां समोर एकदा ते भाषण करुन दाखवा असे प्रकार मग सुरु व्हायचे. एवढं सगळं करुन मग मी एखाद्या मोहिमेवर निघाल्यासारखा दही-साखर खाऊन घरातुन बाहेर पडायचो. बरं जाताना तो भाषणाचा कागद बरोबर असायचा. एवढ्या कष्टांमुळे तो ही अगदी जीर्ण होऊन जायचा. निघाल्यापासुन ते अगदी भाषण होईपर्यंत मी कुणाशीही जास्त बोलत नसे कारण एकदा पाठ केलेलं भाषण बिलकुल विसरता कामा नये ही काळजी. मला कधीही भाषण करताना कागद बाहेर काढावा लागला नाही. एकदा मात्र बोलता बोलता समोर हसणाररया मित्राचं तोंड पाहिलं आणि पुढची वाक्यचं विसरलो. त्याही परिस्थितीत मी कागद बाहेर काढला नाही. लागलीच...जय हिंद..जय महाराष्ट आणि छू मंतर. माझ्या वर्गात एक मुलगी होती. तिचा एवढा हळू आवाज होता की तिच "जय हिंद..जय महाराष्ट" सोडुन बाकी काहीच ए॓कू येत नसे. "जय हिंद..जय महाराष्ट" हे वाक्य मात्र ती मोठ्याने म्हणत असे. ते ए॓कल की सगळेजण अचानक झोपेतुन जागे होत आणि टाळ्या वाजवत.

भाषण म्हटल की माझ्या मनात नेहमी एक द्वंद्व सुरु व्हायच...भाषणाची सुरुवात मी बंधू-भगिनींने करू की मित्र-मैत्रिणींनो. सुरुवातीला मी, विवेकानंदांपासुन प्रेरणा घेउन म्हणा किंवा एक चाल होती म्हणुन म्हणा, बंधू-भगिनीं असेच म्हणत असे. पण एवढ्या छान छान मुलींना सर्वांसमक्ष भगिनी म्हणणं मला जडच जायचं. विवेकानंदांची केस थोडी वेगळी होती. त्यांचा ऑडीयन्स वेगळा असेन पण माझ तसं नाही ना. 'भगिनी' पेक्षा 'मैत्रिण' हा शब्द मला जास्त 'जवळचा' वाटे. जसजसं वय वाढत गेलं तसतसा मी माझ्या भाषणातुन ही जवळीक वाढवतच गेलो.

मी केलेलं पहिल भाषण बहुतेक लोकमान्य टिळकांवरच असेन. ज्या व्यक्तीचं भाषण असायचं ती व्यक्ती माझ्या अंगात संचारत असे. एकदा का भाषण सुरु झालं की संपेपर्यंत मी त्या व्यक्तीचं आयुष्य जगे. संपुर्ण भाषणात हातवारे, आवाजातला चढ-उतार आणि श्रोत्यांवर छाप पाडणे ही कला मी हळुहळु आत्मसात करत गेलो. समजा लोकमान्यांचा जन्माचा प्रसंग असेन तर मी अगदी शाहिराप्रमाणे तो रंगवुन सांगे, त्यांच्या मृत्युची वेळ असेन तर अगदी कमी आणि रडलेला आवाज, असे नाना बदल मी भाषणात करत असे. हातवारे ही तर माझी खुबी होती. "स्वराज्य माझा जन्मसिद्ध..." म्हणताना माझा एक हात कंबरेवर आणि दुसरा हवेत असे. एकदा असंच आमच्या संस्थेच्या संस्थापकाच्या पुण्यतिथीला मी भाषण केलं. त्या भाषणात "इवलेसे रोप लावियले द्वारी...तयाचा वेलू गेला गगनावरी" असं एक वाक्य होतं. "इवलेसे रोप" याच्यासाठी हावभाव करताना जेव्हा मी खाली बसुन हाताची अ‍ॅक्शन केली तेव्हा मागे बसलेले काही जण उभे राहुन पाहु लागले की मी मध्येच हे काय सुरु केलं म्हणुन. :-)

एकदा का मी कुणावरती भाषण केलं की तेच भाषण मी २-३ वर्ष तरी सहज रिपीट करायचो. मग त्या व्यक्तीची जयंती असो वा पुण्यतिथी माझ्या भाषणात कधीच बदल होत नसे. जयंती आणि पुण्यतिथीतला फरक मला उशीरा समजला. एखाद्या भाषणात आवडलेलं वाक्य किंवा सुभाषित मी प्रत्येक भाषणत वापरत असे. म्हणजे आता हेच बघा ना...चिखलात जसं कमळ उगवावं तसं टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखलगावातल्या एका गरीब कुटुंबात झाला. हेच वाक्य बापुंच्या भाषणात कसं ते पहा. चिखलात जसं कमळ उगवावं तसं बापुंचा जन्म गुजरात राज्यातील पोरीबंदर येथील एका गरीब कुटुंबात झाला. तसंच प्रकरण मृत्युचंही. मृत्यु कधी झाला याच्याशी मला काही देणंघेणं नसे. म्रुत्युच्या वेळेस "सुर्य अस्ताला चालला होता त्याचवेळेस हा सुर्य सुद्धा अनंतात विलीन झाला" हे माझं वाक्य प्रत्येक भाषणात असे, भले ती व्यक्ती जरी सकाळी गेली असली तरी आमच्या भाषणात ती आमच्याच सुर्याबरोबर संध्याकाळीच विलीन होत असे.

शाळेत भाषण करुन जेव्हा माझा आत्मविश्वास वाढला तेव्हा मी ठरवलं की आता आपण भाषणाच्या स्पर्धेत भाग घ्यायचा. भाषण करण्यापेक्षा त्या स्पर्धेसाठी फिरायला मिळेन हा त्यामागचा छुपा हेतु. बराच वेळा मी अशा स्पर्धेसाठी बाहेरच्या शाळेत जायचो. एकदा असंच एका स्पर्धेला गेलो असताना मी माझं भाषण विसरुन माझ्या मित्रांचंच भाषण ए॓कत बसलो. एकदा तर चक्क माझा भाषणाचा नंबर आला तेव्हा सभागॄहात इन मिन तीनच लोक होते. मी, एक परीक्षक आणि त्या शाळेचा शिपाई. शिपाई यासाठी की त्याला ते सभागृह बंद करायचं होतं.:-)

तस मी नेहमीच मराठीतच भाषण केलं. शाळेच्या जरी नावात "इंग्लिश" असं असलं ( न्यू इंग्लिश स्कुल ) तरी माझी शाळा ही मराठी शाळा होती. माझा तसा फक्त इंग्लिशच्या पिरीयडलाच इंग्लिशशी संबंध येत असे. त्यामुळे स्वतःची इंग्लिशमधली जाण ओळखुन मी कधीच इंग्लिशमध्ये भाषण करण्याच्या फंदात पडलो नाही. मी दहावीत असेन तेव्हा निरोप समारंभाच्या अगोदर ( Send-off ) संपुर्ण शाळा एक दिवस दहावीच्या विद्यार्थानी चालवावी असा प्रघात होता. मला हेडमास्टर बनवलं गेलं आणि माझ्यावर आमच्या हेडमास्टरांप्रमाणे इंग्लिश शिकवण्याची जबाबदारी आली. ती मी कशी का होईना निभावली. त्याचवेळेस इंग्लिशमधुन मी भाषणही केलं. त्यावेळेस माझी एवढी तंतरली होती की मी मधली काही वाक्य गाळुन कसंबसं भाषण पुर्ण केलं. दहावी झाली आणि अशी ही माझी भाषणबाजी सुद्धा संपली.

आता या वयात या सगळ्या गोष्टीं आठवुन खुप हसु येतं पण खरंच हे असे प्रकार प्रत्येक जणच लहानपणी करतो. 'लहानपण देगा देवा...' हे उगीचच का प्रत्येकजण म्हणत असतो !

-अजय

या ब्लॉग वरचे सर्वात जास्त वेळा पाहिले गेलेले पोस्ट वाचा.
१. ब्राईड-हंट
२. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे

स्वप्न

आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याची तशी प्रत्येकालाच उत्सुकता असते. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांचा बारकाइने अभ्यासल्या तर तुमच्या असं लक्षात येइन की त्या घटना घडण्याच्या आधी तुम्हाला त्या होणार आहेत याची कुठेतरी कल्पना आधीच आलेली असते. त्या घटना घडुन गेल्यानंतर जेव्हा आपण ते सर्व धागे एकत्र जोडतो तेव्हा लक्षात येतं की आपण कुठेतरी हे सगळं समजायला कमी पडलो किंवा त्याचा योग्य अर्थ त्यावेळेला समजु शकलो नाही. माझ्याबाबतीत काल एक वरवर साधी वाटणारी पण काहीशी चमत्कारीक अशी घटना घडली आणि माझा शकुन, स्वप्न, दुष्टांत या गोष्टींवरचा विश्वास अधिकच दॄढ झाला ( पुन्हा एकदा !).

मंगळवार, सकाळचे ८ वाजले असतील. मी कसाबसा डोळे चोळत उठलो. नऊ तास झोपुनही माझ्यावर झोपेचा अंमल कायम होता. रात्री पडलेलं स्वप्न मी आठवायचा प्रयत्न करत होतो. गेले ४-५ दिवस मी घरुनच काम करत होतो. त्यादिवशी एक प्रेझेंटेशन द्यायचं होतं त्याची तयारी ही करत होतो. त्यासाठीच्या १०-१२ स्लाइड्स बनवुन झाल्या होत्या. बरोबर नोट्स ही काढल्या होत्या. आता पुन्हा एकदा सगळ्यावरुन शेवटची नजर फिरवली म्हणजे झालं. पण आज जे काही स्वप्न पडलं होतं त्यामुळे माझं मन थोडंस का होइना बेचैन झालं होतं.

तसा माझा स्वप्नांवर बिलकुल विश्वास नाही आणि त्यांचा अर्थ लावायच्या भानगडीतही मी पडत नाही. त्याला कारणही तसंच आहे. मला पडणारी स्वप्नंच चित्रविचीत्र असतात. प्रत्येक स्वप्न मला सकाळी आठवणेच असं नाही. एका स्वप्नात मी हिमालयात, बर्फात ते पण , सायकलीवरुन कोंबडीचा पाठलाग करतोय. एका स्वप्नात मी पाण्यात पुस्तक वाचतोय आणि त्याच पुस्तकाच्या एका पानातुन मी केनियाच्या जंगल सफारीला जातो असं काहीतरी. आता हिमालयात कोंबडी आणि सायकलचा काय संबंध ?

असो. त्यादिवशी पडलेलं स्वप्न हे मी सकाळी उठुन आठवायचा प्रयत्न करु लागलो. माझ्याबाबतीत काहीतरी 'वाईट' घडलंय आणि मी त्यादिवशी प्रेझेंटेशन हे उशीरा दिलं असं काहीसं ते स्वप्न होतं. वाईट काय घडलं हे मला आठवत नव्हतं किंवा स्वप्नात ते मी पाहिलं नसावं. नेहमी पडतात तसं हे ही एक स्वप्न याप्रमाणे मी ते स्वप्न विसरुन गेलो.

संध्याकाळचे पाच वाजले. मी सर्व काही उरकुन ऑफीसला निघायच्या तयारीत होतो. माझ्या सॅक मध्ये दोन्ही लॅपटॉप आणि रेनकोट टाकला, गाडीला किक मारली आणि निघालो. चव्हाणनगर(सातारा रोड) ते बाणेर हा तसा दररोजचा प्रवास. बाहेर आभाळ भरुन आलं होतं. पावसाची ही चिन्ह होती. पर्वतीला पोहोचतो तोच पावसाला सुरुवात झाली. थोडयाच वेळात पावसाचा जोर चांगलाच वाढला. रेनकोट घातलेला असुनही मी गाडी कडेला घेतली आणि शांतपणे आडोशाला पाऊस थांबण्याची वाट पहात उभा राहीलो. बराच वेळ झाला पण पाऊस काही थांबेना. वेळेत पोचायचं म्हणुन मी नाइलाजेने पावसात जाण्याचं ठरवल. पाउस चांगलाच कोसळत होता आणि थोड्याच वेळात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. थोडं पुढे जातो न जातो तोच काहीतरी आवाज झाला आणि माझी गाडी अडकल्यासारखी झाली. एकदम तोल गेल्यासारखं झालं होत. साइड स्टँन्ड न काढल्यामुळे बहुतेक तसं झालं असावं. पावसामुळं पुढचं निटंसं दिसत नव्ह्तं. पुढे जातो न जातो तोच गाडीचं पुढचं चाक कशाततरी अडकलं. चाक काढण्याचा प्रयत्न केला पण...शेवटी गाडीवरुन उतरावंच लागलं आणि २-३ मिनीट प्रयत्न केल्यावर चाक निघालं. लगेच निघालो. पुढे गेलो तर गरगरल्यासारखं झालं. काहीच समजेनासं झालं...अचानक ते पण. लगेचच स्वत:ला सावरलं.
झेड ब्रिज ओलांडुन पुढे फर्गुसन रोडवरुन विद्यापीठ रोड ला लागलो आणि मागुन हॉर्न वाजवत आलेली एक सुमो जीप आरशात पाहिली. क्षणाचाही विलंब न करता गाडी बाजुला घेतली आणि सुमोवाला कट मारुन गेला. पुढे गेलो आणि विद्यापीठजवळ गाडी घसरली. अजुन पुढे गेलो. बाणेर रोड वर ऑफीस जवळ एक कारवाला अंगावरच आला. त्याच्यातुनही सुटलो. मनात विचार येत होते की आज माझ्या हातुन असं काय होतंय. सगळ्या गोष्टी अगदी ठरविलेल्याप्रमाणे अशा काय घडत आहेत. एवढे सगळे प्रसंग ते पण मोजुन अर्ध्या तासात ! एवढे दिवस मी दररोज याच रस्त्याने येतो पण आजच्या सारखा प्रकार कधीच घडला नाही. बरेचशे प्रश्नांच ओझं मनातच ठेवुनच मी गाडी पार्क केली, रेनकोट काढला, केस कोरडे केलं आणि तेवढ्यात सकाळच स्वप्न आठवलं. घड्याळाकडे पाहिलं आणि एक छद्मी हास्य चेहरयावर उमटलं. ६.२० झाले होते. म्हणजे अजुन ४० मिनीट होते तर. तेवढा वेळ मला पुरेसा होता सेट-अप करण्यासाठी. म्हणजे मला पडलेलं स्वप्न हे ख्ररं होणार नव्हत तर !

वर ऑफिस मध्ये गेलो. अगोदर थोडा फ्रेश झालो. मग जागेवर येऊन सॅक उघडली. एक लॅपटॉप बाहेर काढला. थोडासा ओला झालेला दिसला. शीट...यात तर माझा बराच डेटा आहे. आयची कटकट...पाण्याच्या बादलीतुन कपडा बाहेर काढावा तसा तो दुसरा लॅपटॉप मी बाहेर काढला. सॅकच्या एका कप्यात पाणीच पाणी. या लॅपटॉपवर माझं संपुर्ण प्रेझेंटेशन होतं. आता मात्र माझी खरोखरच फाटली होती. मोजुन २० मिनीटे होती माझ्याकडे. दोन्ही लॅपटॉप सिस-अ‍ॅडमिनकडे दिले, एक मशीन सुरु होण्याची शक्यता नव्हतीच. एकाचा लॅपटॉप घेतला, पटकन सगळ काही आठवुन स्लाईड्स तयार करायला बसलो. सोर्स कोडची एक कॉपी डेस्कटॉप मशीन वर होती म्हणुन बरं झालं. कॉन्फरन्स रुम मध्ये गेलो आणि सगळा सेट-अप केला. नंबर डाएल केला आणि थोडंस लेट सुरु करेन असं सांगितलं कारण अजुन काही स्लाईड्स करायच्या बा़की होत्या. त्यानंतर ...सगळं काही झाल्यावर प्रेझेंटेशन १५ मिनिट उशीरा सुरु झालं.

प्रेझेंटेशन संपवुन बाहेर पडलो तेव्हा डोक्यात फक्त मला पडलेल्या स्वप्नाचाच विचार चालू होता. ते स्वप्न खरं ठरलं होतं. फक्त त्यात माझ्या बाबतीत काय वाईट घडलं हे मी तेव्हा पाहु शकलो नव्हतो पण ते सारं मी अनुभवलं होतं. म्हणजे कुठेतरी मला हे अगोदरच माहीत होतं की असं काहीतरी घडणार होतं पण तरीही मी काहीच करु शकलो नाही हीच एक गोष्ट मला अजुनही खटकतेय.

तुम्ही अल-केमिस्ट वाचलय ? त्यातही अस म्हटलय की आपल्या आजुबाजुच्या घडणाररया प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष द्या, त्या तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात. त्यांचा अर्थ लावा म्हणजे तुम्हाला बरंच काही समजेन. प्रत्येक जण तो अर्थ लावु शकत नाही. खरं तर ते सगळे देवाचे संदेश असतात. या शकुनांचा जर अर्थ उलगडला तर आपण आपल्या आयुष्यात घडणारया गोष्टीं अगोदरच पाहु शकतो.

-अजय

Saturday, August 15, 2009

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...

'जन गण मन' चे शब्द कानावर पडले आणि मी सगळी कामं टाकुन सावधान उभा राहिलो. पण मनात नाना विचार येत होते. अनेक लोक हुतात्मा झाले भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी, पण आजची भारताची अवस्था एवढी ही काही चांगली नाही. भारत खुप प्रगती करत आहे पण काही गोष्टी भारताच्या प्रगतीसाठी खुप घातक आहेत. असंच मागे एकदा एक कविता केली होती. आज १५ ऑगस्ट च्या निमीत्ताने ती लिहावीशी वाटली इथे.


याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...

रस्त्यावर खून पडतात...दिवसा रक्ताची होळी खेळतात
बरेचशे लोक उभे असतात...मारणारयांचे फोटो काढतात
मेलेल्यांचे पुतळे बनतात...मारणारे त्याना हार घालतात
बाकीचे सारे गिधाडे बनून...राहिलेल्याच्यी लक्तरे तोडतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


जिवंत जळणारयाला जळू देतात...सारे शांतपणे उभे असतात
रस्त्यावर तमाशा पाहणारे...सारे आपल्यासारखेच असतात
काळवंडलेल्या माणुसकीबरोबर ... काळवंडलेले चेहरेही असतात
डोळ्यात अश्रू आणून काहीजण...औपचारिकताही पूर्ण करतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


सारे रस्ते बंद पडतात...महात्म्यांना उपाशी ठेवतात
नावात काय असतं म्हणून...सारे त्याला 'उपोषण' म्हणतात
नंतर काही पुढारी येतात...हार तुर्‍यांनी सन्मान करतात
शब्दांची मग फेरफार करून...मोसंबीचा रस पाजतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


या देशात फक्त...गुंडच राज्य करतात
हळुच बोला नाहीतर...संन्याशाला फाशी देतात
बोलुनचालुन गुंडच ते...नाही नाही ते धंदे करतात
कुठंच नाही डाळ शिजली ...तर राजकारणात प्रवेश करतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


निवडणुका जवळ येतात...पुढारी मग अनवाणी चालतात
तू काय किंवा मी काय...सारेच त्यांच्या मागे असतात
घोषणा हवेत विरुन जातात...आश्वासनांचे फुगे फुटतात
एकदा मंत्री बनल्यावर...मुग गिळुन गप्प बसतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


निवडणुका संपतात...शेंबडी लोकं मंत्री बनतात
जिंकणार्याला 'सत्ताधारी'...हारणार्याला 'विपक्ष' म्हणतात
सत्ताधारी' किंवा 'विपक्ष' ... एकाच माळेचे मणी असतात
लोकशाहीसारख्या खेळणाल्या...स्वतःच्या तालावर नाचवत राहतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


विरपप्पन किंवा गवळी...सारे सरेआम फिरत असतात
पोलिस त्यांना संरक्षण देउन...आपली कर्तव्य चोख बजावतात
त्यांच तरी काय चुकलं...ते तर भाउबंदकीचा धर्म निभावतात
'सारे भारतीय बांधव आहेत'...अशी प्रतीज्ञा सारे घेतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


स्वातंत्र्याची ज्योत खरं तर...सारेच पेटवत ठेवतात
दंगलीत आणि जाळपोळीत...तिच हाती घेतात
गर्जना जरी वेगळ्या तरी...उद्देश मात्र एकच असतात
मंदिर किंवा मस्जिद...रक्ताने बरबटलेले जातात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


बाहेरचे असे इंग्रज ...इथे येउन राज्य करतात
फक्त दीडशे वर्ष म्हणुन...लोक मनाचं समाधान करतात
'झंडा उंचे रहे हमारा'...कसं का होइना सारे म्हणतात
कारण वर्षातुन असे प्रसंग..फक्त दोनचवेळा येतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


देवापुढे पैसे टाकतात..हवं नको ते सारं मागतात
एकच देश असा जिथे ...देवालाही लाच देतात
देवालाही लाजवतात..अशी सारी कूत्य इथे घडतात
म्हणुनच देवाला इथं...'दगड' बनवुन गप्प बसवतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


सर्व भारतीय लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, जय हिद !

-अजय

Friday, August 14, 2009

ध्यास नाविन्याचा

गेले २ दिवस मी कार्यालयात न जाता घरुनच काम करत आहे. परवा सगळ्यांना डुक्कर-तापाच्या ( स्वाइन फ्लु ) भीतीने कार्यालयात न येता घरुनच काम करा अस ई-पत्र ( इमेल) आलं होत. गेले २ दिवस मी घरीच माझं कार्यालय बनवलं आहे. २-३ लॅपटॉप च्या घोळ्क्यात बसून मी घरुनच काम करतोय. त्यात आज सुट्टी, त्यामुळे जास्तच कंटाळा आलाय. ना बाहेर कुठे फिरता येतय ना कुठे गाडी काढुन जात येतयं. सकाळपासुन एका प्रेझेंटेशन ( याच्यासाठीचा मराठी शब्द मला सापडला नाही) ची तयारी करत होतो. जेवण करुन थोडा झोपायचा प्रयत्नही करुन पाहिला. नंतर आले टाकुन केलेला चहा पिता पिता यू-ट्यूब वरचे काही चलचित्रही पाहिली. बातम्या ऐकल्या, ब्लॉग वाचले अगदी सगळे मेल सुद्धा तपासले. १-२ उगाचच दूरध्वनीही केले. पण कुठल्याही प्रकारे माझा कंटाळा दूर होइना. म्हणुन नवीन काहीतरी लिहावं यासाठी लेखनी हातात घेतली.

तसा मी खुप चंचल स्वभावाचा आहे असं मला नेहमी जाणवतं. म्हणजे असं की मी एकाच गोष्टी मध्ये जास्त वेळ स्वतःला अडकवून ठेवू शकत नाही. एखादी गोष्ट करताना मा़झं लक्ष हजार गोष्टींकडे विचलीत होतं. समोरचा माणूस जर माझ्याशी बोलत असेन तर त्याचं सगळंच बोलणं मी ए॑कून घेतो असं नाही. त्याचं बोलणं चालु असताना मी अगदी दुर कुठेतरी जाऊन येतो. कधी कधी स्वत:ला भुतकाळात लोटुन देतो. समोरच्या माणसाबद्द्ल काही आडाखे बांधतो. ते आडाखे जर बरोबर ठरले तर मनातल्या मनात हसतो, कधी कधी खिदळतो आणि स्वत:वरच खुष ही होतो. पण समोरच्याला अगदी त्याच मागमुस लागु न देता. मनात कितीतरी तरंग उमटत असतात, काही आपोआपच विरुन जातात, काही माझी साथ देतात.

या जगात प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. माणुस हा काळाबरोबर धावत असतो अगदी घायकुतीला येइपर्यंत तो पळत असतो. जीवनाच्या प्रवाहात त्याला अनेक व्यक्ती भेटत असता, नाना रंगाच्या, नाना ढंगाच्या. काहींचे स्वभाव अगदी आपल्याशी मिळतेजुळते... अगदी आपल्यासारखे ... विरघळुन जावं त्यांच्यात अस वाटणारे. तर काहींचे अगदी आपल्या विरुद्ध. काही लोक अगदीच तह्रेवाईक. माणुस धावत असतो दररोज...नवीन क्षितीजाच्या शोधात. तो दररोज काहीतरी नवीन शोधत असतो कारण त्याला नाविन्याचा ध्यास असतो. दररोज नवीन स्वप्न बघत असतो, नवीन वर्तुळ तयार करत असतो. आणि हे तो जाणुनबाजुन करत असतो कारण नाविन्याचा ध्यास हे त्याचं ब्रीद !

आपल्या आयुष्यात कितीतरी घटना घडत असतात, काही अगदी आपल्या मनासारख्या तर काहीं अगदी अनपेक्षीतपणे...आपल्याला नको अशा. पण आपल्या सगळ्याच गोष्टींचा स्वीकार करावा लागतो. प्रत्येक गोष्ट अगदी आपल्याला हवी असेन त्त्याचपद्धतीने घडेल असं नाही. मग अशा वेळेस काय करावं. सरळ स्वताला झोकुन द्यावं आणि तो जस आपल्याला नेईन तस त्याच्या बरोबर जावं. अशावेळेस खुप हलकं हलकं वाटतं.

लिहताना सुदधा माझा चंचल स्वभाव मला सोडत नाही. तीन परिच्छेदामध्ये मी नवनवीन विषयाबद्दल लिहून गेलो. असो, त्यादिवशी मी एक कीर्तनाची सीडी घेऊन आलो, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरिकर याचं एक खुप हसवणारं कीर्तन-प्रवचन आहे असं मी ऐकलं होतं म्हणून खास त्याची सीडी शोधून घेऊन आलो. नाव आहे "भाग्यवान माणसाची लक्षणे", पोट धरून हसाल. गावचा बाज आहे या प्रवचनाला, अगदी नगरी स्टाइल मध्ये. मी २-३ तास पोट धरुन हसलोय हे प्रवचन ए॓कताना. तुम्ही ते जरूर ऐका आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं ते.

I have uploaded mp3 files on megaupload.com, here are the links for you

http://www.megaupload.com/?d=T72BTVBV
http://www.megaupload.com/?d=XW66G8YZ

-अजय

Tuesday, August 11, 2009

हा एक खरा घडलेला प्रसंग आहे...

हा एक खरा घडलेला प्रसंग आहे. हा प्रसंग जेवढ्या वेळेस मी माझ्या भावाच्या तोंडून ए॓कतो तेव्हा तेव्हा मी सुन्न होउन जातो. प्रसंगच तसा आहे... दरोडेखोर, चोर, पारधी फक्त मी न्यूजपेपर, सिनेमा किंवा बाबा कदमांच्या कादंबरी मध्येच पाहिले किंवा ए॓कले होते. पण जेव्हा कुणाच्या तोंडुन अशा प्रकारचे घडलेले किस्से ए॑कायला मिळतात तेव्हा मात्र "आपण जर त्या जागेवर असतो तर ?" हा एकच प्रश्न मनात उभा राहतो. अशी ही कहाणी माझ्या भावाच्याच जुबानी...

"७-८ वर्षापुवीची गोष्ट, एप्रिल महिना होता. एप्रिल म्हणजे लाही लाही करणारं ऊन, त्यात शेवटचा आठवडा होता. आमच्या गावची यात्रा येऊन ठेपली होती. सगळया परगावी राहणारया लोकांचे पाय गावाकडे वळले होते. मी त्यावेळेस फलटणला होतो. मी ही त्या दिवशी स्वत:चा काम उरकून टू-व्हीलर वर गावाकडे येण्यासाठी निघालो होतो. संध्याकाळची वेळ होती, अंधार लवकर पडला होता. गावापासून १० किमीच्या अंतरावर एक निर्जन आणि डोंगरातुन जाणारा रस्ता आहे. शक्यतो त्या रस्त्याने अंधार पडल्यावर कुणी येत नसे. पण मला त्या दिवशी उशीर झाला होता आणि घरी लवकरही पोचायचं होतं म्हणुन मग मी तो रस्ता पकडला.

सात-साडेसात वाजले असतील. सगळीकडे बरयापैकी अंधार पडला होता. रातकिडे नुकतेच बाहेर पडुन किर्र-किर्र असा आवाज करायला लागले होते. रस्त्याच्या एका बाजूला नीरा नदी तर दुसरया बाजूला डोंगर. भयाण शांतता पसरली होती. त्या शांततेत नदीच्या पाण्याचा आवाजसुद्धा खुप भेसुर वाटत होता. रस्ता तसा वळणा-वळणांचा होता. एक चढ उतरून मी जेव्हा सपाट रस्त्यावर लागलो तेव्हा गाडीने चांगलाच वेग पकडला होता. आता फक्त काही मिनीटांचं अंतर बा़की होतं. पण मला माझ्या पुढे, अगदी १ किमी वर काय घडणार आहे याची बिलकूल ­कल्पना नव्हती. घरी लवकर गेलं पाहिजे हा एकच विचार त्यावेळी डोक्यात चालू होता आणि तेवढयात मला हेडलाईट च्या प्रकाशात एक माणुस दिसला. हा माणुस रस्त्याच्या कडेला उभा होता आणि हात दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा करत होता. मी गाडीचा वेग थोडा कमी केला. अजुन जवळ गेल्यावर मला दिसलं की त्या माणसाने धोतर आणि शर्ट घातलेला आहे. मी ब्रेक लावणार तेवढ्यात एवढया उशीरा इथं कोण आलं असावं हा विचार मनात आला. थोडंस विचीत्र वाटलं. झटदिशी मी गाडीचं वेग वाढवला. गाडीचा वेग वाढलेला पाहून त्या माणसाने बोंब ठोकली. विचार करायलाही वेळ नव्ह्ता. काय होत होतं हे कळतच नव्ह्तं पण कुठल्याही परिस्थीतीत तिथे थांबणं धोक्याचं आहे हेच समजून गेलं होतं. मी तेवढयाच वेगात गाडी त्याच्या अंगावर घातल्यासारखी केली व त्याला चकवून पुढे आलो. मागच्या माणसाची बोंब बहुतेक पुढ्च्यांसाठी इशारा होता कारण पुढे ४ हट्टे-कट्टे लोक रस्त्याचा कडेला असलेल्या खड्ड्यातून वर येत होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. एव्हाना माझ्या गाडीने बराच वेग पकडला होता. मी त्याच वेगात गाडी त्यांच्या अंगावर घातली. त्यांनी माझ्यावर काठ्या उगारल्या, काहींनी मारल्या देखील. त्यांना ही मी सही-सलामतपणे चकवण्यात यशस्वी झालो होतो. पुढे एक वळण होतं. तिथे ३-४ लोक उभे असलेले मला दिसले. त्यात १-२ स्त्रिया असाव्यात. एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं की गाडी अंगावर घालणं हेच माझं शस्त्र आहे. मी पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चूकवलं. त्यातली एक बाई मोठमोठ्याने बोंब मारु लागली. तिची मी बोंब ए॑कुन मी प्रचंड घाबरलो. हे सगळं फक्त १०-१५ सेकंदात झालं होत. मला विचार करायला ही वेळ नव्हता.

मी आता सरळ रस्त्यावर आलो होतो. पुढे एक अरूंद पुल होता. एकावेळेस एकच चार-चाकी गाडी जाउ शकते इतका अरुंद. गाडीच्या प्रकाशात त्या पुलावर मला एक माणुस, एका हातात कुह्राड उगारून व दुसरया हाताने थांबण्याचा इशारा करत उभा असलेला दिसला. आता मात्र परिस्थीती आणीबाणीची होती. एक तर रस्ता अरूंद, त्यात त्याच्या हातात कुह्राड. आता मी थोडा कुठे शुद्धीत आलो होतो. एवढा वेळ जे चाललं होतं ते सगळं मा़झ्या हातातून होत गेलं. पण आता मला हे सगळं काय चाललंय हे समजत होतं. माझ्या डोळ्यांसमोर माझा साक्षात म्रूत्यु उभा होता. आता जर थांबलो तर काही खैर नाही. मागचा-पुढ्चा सगळाच मार बसणार. कदाचीत जीवे मारतील सुद्धा. विचार करायला फक्त ३-४ सेकंदच होते. ठरवल जे काही होइन ते...तेवढ्याच वेगात गाडी पळवली. समोरचा माणूस काहीतरी ओरडत होता. सरळ त्याच्या अंगावर गाडी घातली. तो बाजुला सरला. कुह्राडीचा सर-सर करत वार झाला...मी थोडासा वाकलो. वार झाला होता पण मला कुठेच काही लागल्याचं जाणवत नव्हतं. म्हणजे मी सही-सलामत होतो. मी त्याला यशस्वीपणे चकवून पुढे आलो होतो. वार बहुतेक चुकला होता. मी अगदी थोडक्यात, नशीबानेच बचावलो होतो.
आता पुढे एक वळण होतं. त्या वळणावर मला गाडीचा वेग कमी करावाच लागणार होता. पण माझ्या नशीबाने त्याठिकाणी कुणीही नव्हतं. आता मला समजलं होतं की मा़झी किती मोठ्या संकटातून सुटका झाली होती. देव माझ्या पाठीशी उभा होता म्हणुनच मी वाचलो. त्याच्यानंतरचं अंतर मी अगदी ६-७ मिनीटांमध्येच कापलं. घरी येऊनच मी गाडीचा ब्रेक दाबला. छाती धडधडत होती. कपाळावर घाम आला होता. समोर पप्पा काहीतरी म्हणत होते. त्यांचे शब्द नुसतेच कानावर पडत होते पण ते समजण्याइतका मी शुद्धीवर नव्हतो. गाडीवरून उतरलो आणि घडलेली हकीकत सर्वांना सांगितली.

अजुनही जेव्हा जेव्हा हा चित्रपट मा़झ्या डोळ्यांपुढुन जातो तेव्हा तेव्हा माझ्या मनात काही प्रश्न उभे राहतात. समजा, पहिला माणुस दिसला होता तिथे जर मी गाडी थांबवली असती तर? चुकुन एखाद्या माणसाची काठी गाडीला लागुन गाडीचा वेग कमी झाला असता किंवा गाडीवरुन मी पडलो असतो तर? त्या शेवटच्या माणसाच्या कुह्राडीचा वार जर माझ्यावर झाला असता तर ? त्या शेवटच्या वळणावर जिथे गाडीचा वेग अगदी कमी होतो तिथे जर कुणी असतं तर ? मी जर त्यांच्या हातात सापडलो असतो तर ?

या जर तरला काहीच उत्तर नाहीत. कुठेतरी माझं नशीब जोरावर होतं आणि सा़क्षात परमेश्वरच माझ्या पाठीशी होता म्हणुनच मी बचावलो !"

-अजय

Monday, August 10, 2009

तू नसताना...

मला तो दिवस नक्की आठवत नाही ज्यादिवशी मला ही कविता सुचली. कदाचीत त्याल ८-९ वर्ष झाली असतील. माझ्या एका मित्राच्या आग्रहावरुन मी आज ही कविता मराठीत टाइप ( मराठीत काय म्हणतात बरं टाइप करण्याला?) करुन इथे उपलब्ध करुन देत आहे.



हातात पेन...ओठांवर रेंगाळणारे शब्द
लिहू तरी काय...तू नसताना...

थकलेलं शरीर...घाबरलेलं मन...
समजाउ कसं त्याला...तू नसताना...

अनोळखे प्रवासी...न संपणारी वाट...
एकटाच कसा चालू...तू नसताना...

घोंघावणारं वादळ...समुद्राची ओहोटी...
पोचू कसा किनारयाला...तू नसताना...

जमलेला परिवार...गजबजलेला गाव...
तरीही एकाकीपण...तू नसताना...

पौर्णिमेची रात्र...आकाशतला चंद्र...
फक्त हेच सोबतीला...तू नसताना...

तुझं ते हसणं...एकटक बघणं...
सारयाच आठवणी त्रासदायक...तू नसताना...

मनातील घालमेल...डोळ्यांत पाणी...
एकटाच सहन करणार...तू नसताना...

समोरच उभी तू...तू नक्की तूच...
वारंवार असेच भास...तू नसताना...

गुंतलेले धागे...न सुटणारी गाठ...
बंध तरीही बळकट...तू नसताना...

पाण्यावरचे तरंग...क्षणभरचं अस्तित्व...
माझसुद्धा असंच काही...तू नसताना !


-अजय

Tuesday, August 4, 2009

ब्राईड-हंट

या १ ऑगस्ट ला मी चकक २७ वर्ष संपवून २८ व्या वर्षात पर्दापण केलं. एम.सी.एस केलं आणी त्यानंतर लगेचच नोकरी लागली. बघता बघता ५ वर्ष कशी गेली ते समजलं ही नाही. मग साहजिकच प्रत्येकाच्या घरात होतात तसं आमच्याही घरात 'माझ्या लग्नाची' कुजबुज सुरु झाली. सुरुवात कशी झाली ते मला निटसं आठवत नाही पण अंदाजे एक वर्षापुर्वी एके दिवशी मी पुण्याहून माझ्या गावी (जे अंदाजे ४० किमी अंतरावर आहे) गेलो होतो. असाच आईशी गप्पा मारत असताना आईने विषयाला हात घातला.

"काय रे ... तु आता २६ वर्षांचा झालास, लग्नाचा काही विचार आहे की नाही, कधी करायचय तुला"...आईने विचारलं
"अगं करु ना, एवढी काय घाई आहे, मी आत्ता तर कुठे २६ वर्षांचा झालो आहे ना..."
"हं...आत्तापासुन सुरुवात केली म्हण़जे चांगलं, तुझं कुठं 'काही' आहे का?"...भितभित आई, 'काही' या शब्द उच्चारताना डोळे बारीक करून.
"नाही म्हणजे..." मी फिल्मी स्टाईल मध्ये सस्पेंस वाढवुन
"म्हणजे आहे...!"
"नाही...म्हणजे असं काही नाही माझं, पण..."
"पण-बिण काही नाही...तुला कशा प्रकारची मुलगी हवी आहे ते सांग म्हणजे आम्हाला तसं शोधायला"
"अगं ते कसं सांगू? मी तर आयुष्यात पहिल्यांदाच लग्न करत आहे. गाडी थोडीच घ्याचही आहे मला की ज्याचं स्पेसिफिकेशन असं लगेच सांगता येईन. एवढी सीसी, एवढं माईलेज, अशी बॉडी, एवढी दणकट !" ...मी हसत हसत
" अरे म्हणजे शिक्षण, रंग, ऊंची वगैरे वगैरे...एक काम कर तू दादाशी बोलुन घे म्हणजे तुला तो नीट सांगेन." इति मातोश्री.

तुम्हाला खरंच सांगतो मुलगी कशी असावी याचा मी त्यावेळेपर्यंत कधीही विचार केला नव्ह्ता. पण आता जेव्हा वेळ आलीच आहे तेव्हा मी याचा विचार करु लागलो. आजुबाजुचेही बरेच लोक होतेच ना ! ते एक एक करुन उपदेश करु लागले.

" तुला सांगतो बघं अजय...मुलगी बघताना भाजीबाजारासमुलगी बिलकुल करायचं नाही, एकदा भाजी पसंत पडली की पुढच्या दुकानात अजिबात जायचं नाही. नाहीतर खुप गोंधळ उडतो."...दादा.
"अरे पण ४-५ दुकानं पालथी घातल्याशिवाय आपण भाजीसुद्धा घेत नाही आणि तु मला एकातच उरकायला लावतोयस..." यावर प्रचंड हशा ! हाच दादा स्वत:च्यावेळेस किती कन्फ्यूज झाला होता हे मलाच माहित.

"अजय...मुलगी पाहिल्या-पाहिल्या जरं तुला 'एक दुजे के लिए' वाटलं ना की बस्स !"...माझा एक चुलत भाऊ, कदाचीत 'एक दुजे के लिए' जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा हा कॉलेज मध्ये असावा :-)

"काहीही झाली तरी ऊंची हवीच रे...कमीत कमी ५.४ तरी..." ...पप्पा,
ऊंचीचा हट्ट कशापायी हे मला अजुन ही नीट समजलेलं नाही.

"मुलगी गोरीपान नसली तरी चालेन पण नाक आणि डोळ्यांत सरस हवी..", मातोश्री,
तिला काय मॉडेलिंग करायचं वा मिस युनिव्हर्स व्हायचंय थोडंच.

"मुलगी शिकलेली हवी, सॉफ्ट्वेअर इंजिनिअर किंवा डॉक्टर हवीच"..आजु बाजुचे...

"बाकी काही असो,९६ कुळी मराठा आणि ते पण आपल्यासारखे देशमुखच हवेत"...पाहुणे-रावळे.

एवढया साय्रा गोंधळात मला काय हवंय हे मी माझ्या मनाला विचारुन पाहिलं. मला फक्त सुसंस्कॄत, समंजस व जबाबदार मुलगी हवी. आणि त्या वेळेस पासून सुरु झाला आमच्या घरात माझ्यासाठी ब्राईड-हंट ( bride-hunt ).

त्यानंतर काही दिवसांत माझी काही महीन्यांसाठी अमेरीका वारी घडली. येईपर्यंत या लोकानी ३-४ स्थळ माझ्यासाठी पाहून ठेवली होती. त्यातली एक मुलगी सर्वांना खुप आवडली. रितीरिवाजा प्रमाणे कांदे-पोहेचा कार्यक्रम झाला. आयुष्यात मी पहिल्यांदाच एका मुलीच्या घरी जाऊन मुलीच्या वडीलांसमोर मुलीकडे डोळे वर करुन बघणार होतो. तसं कॉलेज मध्ये असताना मुलींकडे बघणे हा माझा व माझ्या मित्रांचा आवडता छंद होता, पण एकडे गोष्ट थोडी वेगळी होती. मनातुन थोडासा घाबरलो होतो पण उगाचच वाघ असल्याचा आविभार्वात वावरत होतो.

" कधी आलात तुम्ही अमेरिकेवरुन..."..मुलीचे वडील, 'तुम्ही' हा शव्द ऐकून मी चार फुट वर उडालो. अहो ज्याला गेली २६ वर्षे 'छोट्या' या नावाची सवय झाली होती त्याला 'तुम्ही' हा शब्द जड वाटणारच ना !
"@@@ ...गेल्याच आठवडयात"... उगाचच हसत मी :-).
पहिल्यांदाच बघायला जात होतो म्हणून मी आणि माझा 'एक दुजे के लिए' वाला चुलत भाऊ असे दोघंच होतो. हाच भाऊ एकदा माझ्या सख्या भावाच्या कांदे-पोहे साठी गेला असताना, तिथली मुलगी मान खाली घालुन बोलत होती, त्यावर हे महाशय तिला म्हणाले की "ताई ...आम्ही तुम्हाला खास पाह्ण्यासाठी म्हणून इथे १०० किमी वरून आलो आहोत आणि तुम्ही मान खाली घालून काय बोलता ?" त्यानंतर म्हणे त्या मुलीने जाईपर्यंत मान काही खाली केली नाही. असे हे आमचे बंधू महाशय.
"इकडे कुठे जॉब करता ? " ...मुलीचे मामा.
"माहित असलेल्या गोष्टी काय विचारता" मी मनातल्या मनात :-)
"मी बाणेर ला अमूक-तमूक कंपनी मध्ये गेल्या दीड वर्षापासुन सिनीअर सॉफ्ट्वेअर इंजिनीअर म्हणुन जॉब करतो. त्याच्या अगोदर मी अमूक-तमूक या कंपनीमध्ये एवढेएवढे वर्ष काम केलं आहे. माझं काम हे अमूक-ढमूक टेक्नॉलॉजी मध्ये आहे. मी गरवारे कॉलेज मध्ये एम.सी.एस केलं. त्यानंतर कॅम्पस इंटरव्हू सिलेक्शन झालं. आणि आता मा़झ्या करिअर ला ५ वर्षे पुर्ण झाली आहेत."....मी एका दमात सगळं उरकून टाकलं. सगळे अवाक !
"पगार किती मिळतो ?" मुलीचे वडील.
हा प्रश्न मला कुणी विचारला तर खुप ऑकवर्ड वाटतं. कारण पगार सांगणे आणि विचारणे मला कधीच आवडत नाही. पण मुलीच्या वडीलांनी विचारणं गरजेचंच असतं हे ही मला माहित होतं.
"'X' हजार..."
चेहरयावर हसु आणून मी पुढचे प्रश्न टाळले. थोड्याच वेळात मुलगी काहीतरी खायला घेऊन आली. बघा-बघी,बोला-चाली झाली आणि अशा प्रकारे माझा आयुष्यातला पहिला कार्यक्रम उरकला.
आजकाल मी कांदे-पोहे प्रकरणात बराच सरावला गेलो आहे. माझे दोनाचे चार हात होईपर्यंत माझे आई-वडील काही शांत बसणार नाहीत आणि मला ही बसू देणार नाहीत. तूर्तास तरी मी इथे थांबतो, पुन्हा येईन असेच काही अनुभव घेऊन.

-अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Monday, August 3, 2009

मी आणि माझं पुणे

गेले कित्येक वर्षांपासून मला पुण्याच्या वाहतुकीबद्दल व एकंदरच चमत्कारीक कारभाराबद्दल खूप सारे प्रश्न पडलेले आहेत, ते असे...

१.पीएमटी ही नेहमी प्रवासी घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला न थांबता मागून येणार्‍या गाडयांचा विचार न करता मध्येच का उभी राहते ?
२.पुण्यातले ट्रॅफिक पोलीस हे भकाभक धूर सोडणारया रिक्षा व पीएमटी ला सोडून सिग्नलवर शांतपणे उभे असणारया बिचारया टू व्हीलर वाल्यांनाच का बरं पीयूसी सर्टिफिकेट मागत असतात, मला सांगा धूर जास्त कोण सोडतं ?
३.ज्या दिवशी आपल्याकडे स्वताची गाडी नसते व आपण बससाठी स्टॉप वर उभे असतो तेव्हाच सार्‍या बसेस आपल्यावर सूड उगवल्यासारख्या न थांबता का जातात ?
४.स्वारगेट ते कात्रज ( म्हणजे सातारा रोड ) या रोडवर "बीआरटी" करुन महानगरपालिकेने काय साध्य केले ? एका संपुर्ण लेनमध्ये बस बादशाही थाटाने चालते. एक लेन साइकल, एक लेन फू्टपाथसाठी, एक लेन गाड्या पार्किंग आणि त्यातुन राहिलेल्या जागेतून मग गाडया अंग चोरुन हळु हळु चालत असतात, असं का लेकाहो. अहो स्वारगेट चौकात पालिकेने रोडवर चक्क गोलाकॄती लॉन बनवले आहे, जिकडे गाडया चालवायण्यासाठी वा चालायलाही जागा नाही तिकडे एवढ मोठं लॉन कशासाठी?
५.साइकल वाले हे साइकल ट्रॅक मोकळा सोडून मुख्य रस्त्यावरूनचं का बरं साइकल चालवतात, अरे तुमच्यासाठी खास पालिकेने साइकलट्रॅक तयार केला आहे ना...तिकडे *कलमडा* ना !
६.पुण्यात सगळीकडे, गरज असेन नसेन तिकडे ओव्हरब्रिज उभारले आहेत, पण मला सांगा की स्वारगेट किंवा कात्रज चौकात गरज असतानाही ओव्हरब्रिज न उभारुन तिकडे सोयीस्करपणे दुर्लश केले जात आहे, असं का?
७.रिक्शावाले हे नेहमी अचानक साक्षाक्तार झाल्यासारखे हात न दाखवता, मागच्याचा कसलाही विचार न करता का बरं वळतात ? मला तर रिक्शा या वाहनाच्या डिझाइन इंजिनिअरची किव येते. हे असे एकच वाहन आहे ज्याचा वाहन चालक नककी काय करणार आहे हे पाठीमागच्या गाडीवानाला ( म्हणजे ड्रायव्हर ) कळत नाही, कारण ही पाठीमागे रुंद व पुढे निमुळती होत गेलेली असते.
८.रिक्शावाले हे नेहमी रस्त्यावर रिक्शा उभी करुन लोक (passenger) का भरत असतात ? बस स्टॉप वर उभं राह्ण्याचं सोडुन लो़क रस्त्यावर उभे राहुन ट्रॅफिक जाम करण्यात धन्यता का मानतात?
९.ज्या वाहनांना उजवीकडे वळायच असतं ते डावीकडच्या लेन मधुन का चालत असतात आणि हळु चालणारी वाहने फास्ट लेन वरुन का जात असतात?
१०.झेब्रा क्रॉसींग हा पादचारर्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असतो, तिकडे लो़क सिग्नलला थांबल्यावर पुढे पुढे का करतात? रस्ता ओलांडणारया लोकांच्या अंगावर गाडी घालण्यात किंवा त्यांना घाबरवण्यात मोटारसाइकलवाल्यांना काय बरं आनंद वाटतो?
११.रस्त्याची कामं ही ३६५ दिवस का चालु असतात, एवढं करुनही ती कधीच पुर्ण होत नाहीत वा पुर्ण झाली तरी नीट केली जात नाही. एकच रस्ता पुन्हा पुन्हा खोदुन बनवला जातो. सिमेंन्ट चे बॉक्स काढुन नवीन बसवले जातात. रोड वाढवुन ती जागा पार्किंगसाठी वापरली जाते, मग रोड वाढवायचा तरी कशासाठी?
१२. महानगरपालिकेचा "town planning" नावाचा विभाग कु्ठल्या ******* हाती दिला गेला आहे ज्याला साधं हे ही समजत नाही की शहर उभारताना बागा, खेळाची मैदानं व इतर अशा अनेक गोष्टींसाठी जागा सोडावी लागते. जिकडे पहावं तिकडे नुसत्या बिल्डिंग उभारल्या गेल्या आहेत.

अजुन ही असे बरेच चीड आणणारे प्रश्न आहेत, गरज आहे उघडे डोळे ठेउन आपल्या आजुबाजुला बघण्याची. अहो आपण अजुन किती दिवस असं आंधळ्याचा चष्मा लावुन बसणार आहोत. मुग गिळुन बसणं एक दिवस आपल्या अंगलट येईन पण तेव्हा आपल्या हातातुन कदाचीत सारं निसटलं ही असेन !

-अजय

महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा !

असाच काल-परवाचा प्रसंग असेन, मला बॅंकेतुन एका मुलीचा फोन आला. अमुक तमुक क्रेडीट कार्डासाठी तिने फोन केला होता. तोड्क्या-मोड्क्या हिंदीत ती बोलत होती. मी माझ्या मराठी बाण्याला जागत तिला मराठीत बोलण्याची विनंती केली
आणि काय आश्चर्य ! ती चक्क सदाशिव पेठेतील असल्यासारखी मराठी बोलु लागली. मला याच गोष्टीचा राग येतो. तुम्ही तुमच्या घरात, स्वतःच्या राज्यात दुसरया भाषेचा का आधार घेता? तुमची स्वतःची भाषा मराठी एवढी सम्रूद्ढ असताना, ज्या भाषेला संत ज्ञानेश्वर,संत तुकारामांपासुन ते आत्ताच्या संत गाड्गेबाबापर्यंत वाढवलं गेलं, कवि कुसुमाग्रज आणि बहिणाबाई साररख्यांनी जोपासलं, हीच ती मराठी ज्या भाषेला गेली कित्येक शतकांचा वारसा आहे तिचीच तुम्हांला लाज कसली वाटते. मी हिंदी या भाषेचा दुस्वास करत नाही फक्त स्वतःच्या भाषेचा हट्ट धरतोय आणि का धरु नये तु्म्ही सांगा ना. तुम्ही जपान, चीन, फ्रांस, जर्मनी एवढंच काय कनार्टक, आंध्र, तामिळनाडु यांच्याकडे पहा. बघा कसे स्वत्त:च्या भाषेला घट्ट चिकटून बसले आहेत. स्वत्त:च्या भाषेचा त्यांना सार्थ अभिमान आहे आणि नुसता अभिमान असून चालत नाही तर ते तो पदोपदी दाखवत असतात. अमेरिकेवरुन येताना जेव्हा मी फ्रंकफर्ट विमानतळावर उतरलो तेव्हाच मला समजलं की एखादा देश, तिथले लोक स्वतःच्या भाषेवर किती ठाम असतात. जिकडे जाईन तिकडे फकत जर्मन भाषेतलेच बोर्ड होते.असाच एकदा बेंगळुरु ला गेलो होतो. तिथे आय.बी.एम सारख्या एवढ्या मोठ्या कंपनीवर सुद्धा कन्नड मध्ये नाव लिहलेलं होतं.
आमच्याकडे मात्र सगळंच उलटं. मराठी भाषेतील पाट्यांचा जर आम्ही महाराष्ट्रात, ज्याची मराठी ही राजभाषा आहे, आग्रह धरला तर काही लोक त्याच्याविरूद्ध न्यायालयात जातात. मुंबई महानगरपालिकेत हिंदी भाषेचा ठराव मांडला जातो. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा बोलली जाते. जया बच्चन नावाची बुड्ढी सर्वांसमोर मराठीचा अपमान करते. कित्येक लोक जे वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राह्तात त्यांना मराठी भाषा येत नाही याचा त्यांना अभिमान वाटतो आणि मराठी येत नाही म्हणून काही अडत नाही असंही वर ते अभिमानाने सांगतात. यात चूक कणाची ? चूक आपलीच कारण हिंदीत बोलायला सुरूवात आपणच करतो. रिक्शात बसल्यावर रिक्शावाल्याशी आपण हिंदीतच सुरूवात करतो. कुठ्ल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर वेटर ला आपण स्वताहूनच हिंदीत ऑर्डर देतो. बोला ना त्याला मराठीत की एक कांदे-पोहे घे. कुठ्ल्याही मॉल मध्ये गेल्यावर तिथल्या काऊंटर किंवा सेल्समनशी मराठीत संवाद साधा ना. अहो आपली संस्कुती, आपली भाषा आपणच टिकवायची असते, ती आपणच जोपासायची वाढवायची असते. त्यासाठी बाहेरच थोडंच कुणी येणार आहे.

मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा विषय असेन आणि राज ठाकरे चा विषय निघणार नाही असं कसं होइन. कुणाला राज आवडो वा ना आवडो, मला मात्र हा माणुस आवडतो आणि त्याचे विचार ही पटतात. तो ज्या तडफेने मराठी भाषा, मराठी माणुस आणि महाराष्ट्राबद्द्ल बोलतो तसं कुणी बोलताना दिसत नाही म्हणून तो एवढा प्रसिदधी मिळवतोय. जो विचार आपण करत असतो तोच तो बोलून दाखवतो. आणि कुणी तरी हे बोलून दाखवायला नको का? सगळे मूग गिळन गप्प बसलेत. उत्तर प्रदेश, बिहार मधुन भर-भरून लोक येतच आहेत. त्यांना कुणीतरी कुठेतरी थांबवायला नको का? अहो, घटनेत लिहलं आहे की कुणीही कुठेही जावु शकत, कुठेही राहू शकतं, मान्य आहे. पण या येणारया लोकांची मग्रुरी पाहिली ना की मग कळेन तुम्हाला. कोण बरोबर आणि कोण चूक ते. एकदा काही दिवस मुंबई मध्ये रहा मग समजेन.

अजुन ही असं बोलण्यासारखं बरंच काही आहे पण खरंच सांगतो त्रास होतो ह्या गोष्टींचा. हे सगळं बघितलं ना की माझी तळपायाची आग मस्तकात जाते, प्रचंड राग येतो आणि मराठी माणसाची कीवही येते. आपण काय करतो आहोत , कुणाचा बळी देतो आहोत आणि कुणाला मोठे करतो आहोत याचा विचार करुन माझं डोकं जड होतं आणि हात नकळतचं लॅपटॉप कडे जातात..."जय जय महाराष्ट्र माझा..." हे गाणं ए‍कण्यासाठी. कमीत कमी गाण्यात तरी महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा, नाही का ?

आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियाचं स्वागत आहे !

-अजय