Saturday, April 3, 2010

सुख की समाधान

बरेच दिवसानंतर लिहायला बसलो आणि कागद पेन एवढंच काय डोक्यातले विचार सुद्धा अनोळखी असल्यासारखे माझ्याशी वागू लागले. कामाचा ताण, भावनांचा कल्लोळ, खांद्यावरच्या जबाबदारया आणि डोळ्यांमधील स्वप्नं या सगळ्यांचा मेळ घालता घालता मी कधी तरी स्वताला विसरुन जातो आणि देहभान विसरुन छाती फुटेपर्यंत नुसता पळत सुटतो. माणसाच्या गरजा त्या किती, पण तो त्यांचंच जास्त दडपण घेतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या साध्यासुध्या गरजाचं रुपांतर मग ३ बीएचके फ्लॅट, फिरायला एक मोठी कार, आठवड्यातून दोन-तीनदा हॉटेलींग आणि वर्षातून कमीत कमी दोन तीन वेळा कुठेतरी पिकनीक एवढ्या मोठ्या लिस्ट मध्ये होतं. माणूस जेवढया प्रमाणात कमावतो तेवढ्याच प्रमाणात तो त्याचे खर्च ही वाढवत असतो, त्याच्या गरजा ही तशाच वाढत असतात. स्वप्न उराशी बाळगणं, ते पुर्ण करण्यासाठी धडपडणं, जिद्दीने मेहनत करून ते पुर्ण ही करणं यात एक आनंद असतो हे मला माहित आहे. पण कुठेतरी हे सगळं करताना आपण आपल्या आजुबाजुचे लोक, मित्र, सगे सोयरे एवढंच काय आयुष्यातले छोट्छोटे आनंद ही विसरून जातो. कित्येक दिवस झालं मी माझ्या जवळच्या मित्रांना फोन करुन अगदी मनमोकळं बोललो नाही, क्रिकेटची बॅट किंवा बॅडमिंटनचं रॅकेट हातात घेऊन खेळायला गेलो नाही, एखादा सिनेमा, नाटक किंवा गाण्याच्या मैफिलाचा प्रोग्राम पाहिलेला नाही. एवढंच काय कित्येक दिवस मी साधा रस्त्यावरुन स्वताच्याच तंद्रीत अगदी शांतपणे एकेक पाऊल टाकत साधा चाललो पण नाही. मी मिस करतोय... मित्रांबरोबर कट्यावर बसून निवांत मारलेल्या गप्पा, टेरेसवर झोपून मोजलेल्या चांदण्या, विमानांचा आवाज ए॑कून लहानपणी केलेला जल्लोष, रात्र रात्र बसून वाचलेली कादंबरी, आठवड्यात एकदाच लागणारा रविवारचा सिनेमा पाहण्यासाठी केलेली धडपड, गल्लीतलं क्रिकेट आणि चोरलेल्या कैरया, गोट्यांचा डाव आणि शाळेतली भांडणं, डब्यातला आईच्या हातचा मलिदा आणि सायकलीवरचं हुंदडणं, पहिलं प्रेम आणि आयुष्यातली पहिलीच कविता आणि असंच बरंच काही...मी खरंच हरवून बसलोय.माणुस पैसा आनंद मिळविण्यासाठी कमावतो की आनंद गमावण्यासाठी हा प्रश्न मग मला सतावू लागतो. सुख मिळवायचं असेन तर ते भोगायला ही शिकलं पाहिजे आणि ते भोगण्यासाठी समाधानी वूत्ती हवी. सुख आणि समाधान या दोन भिन्न गोष्टी आहे असं माझं ठाम मत. पण तरीही सुखी माणसं समाधानी असतात की समाधानी माणसं सुखी हा मला अजूनही न पेललेला प्रश्न...

-अजय

(...डायरीच्या पानांतून)

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------