Monday, March 8, 2010

खरंच का "जय महाराष्ट्र"

या वर्षी महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षे साजरा करतोय पण खरंच "जय महाराष्ट्र" म्हणण्यासारखा आहे का आपला महाराष्ट्र सद्य स्थितीला ?

१. गेली १५ वर्षे मी 'लोडशेडींग' हा शब्द ए॑कतोय. कित्येक सरकारं आली आणि गेली पण हा इतका महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी एकाही सरकारने ठोस पावले उचललेली नाहीत. गावामध्ये १५-१५ तास वीज नसते आणि आली तर ती रात्रीची येते. शेतकरी आत्महत्या करेन नाहीतर काय. शेतीला पाणी देण्यासाठी वीज नाही तिथे पाणी असूनही काय फायदा ना. देशाचे उर्जामंत्री हे महाराष्ट्राचेच सुपुत्र आहेत आणि गेली काही वर्षे ते उर्जामंत्री म्हणून काम करत आहेत. राज्य आणि केंद्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार असूनसुद्धा हा प्रश्न गेली १० वर्षे का सुटत नाही. लोकांना अंधारात ठेऊन काम करणारयांची हा प्रश्न सोडविण्याची तळमळ दिसत नाही, तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

२. माझा शेतकरी बांधव हा कधी सावकाराच्या कर्जाखाली दबून तर कधी गरीबीने कंटाळून तर कधी मुलीच्या लग्नाच्या चिंतेने आत्महत्या करतोय. आपलं स्वताचं कुटुंब चालविण्यापुरताही त्याच्या हातात पैसा येत नाही. आपल्या शेतात पिकल्या गेलेल्या मालाला ठोस बाजारभावच जर मिळाला नाही तर तो पुन्हा पिकविण्याचं धाडस कसा करेन. आपल्या कच्च्या बच्च्यांना साधं दोन वेळचं जेवण देणं त्याला महाग होत चाललंय तर त्यांना बाकींच्यासारखी चांगली चुंगली कपडे, शिक्षण तो कुठुन देईन. महाराष्ट्राचा जाणता राजा असं ज्याला म्हणतात तो देशाचा कूषी मंत्री असूनसुद्धा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढतच चाललयं आणि तो आकडा काही हजारामध्ये आहे ही शरमेची गोष्ट आहे, तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

३. धान्यांचे भाव गगणाला भिडत असताना, दररोजच्या जेवणाची लोकांना भ्रांत पडत असताना आपलं सरकार धान्यापासून दारू बनविण्याच्या कारखान्याला परवानगी देऊच कसं शकतं. याउपर त्या कारखान्यांना ( जे यांचेच आहेत !) त्यांना सबसिडी पण आणि ती पण थोडीथोडकी नाही तर काहीं करोडोंमध्ये ? वाह...काय अजब कारभार आहे. लोकांना खायला अन्न नाही म्हणून दारु प्या. दारुपायी लोकांचे घरदार उद्धवस्त होत असताना त्याच दारुवर स्वताची पोळी भाजून घ्यायला लाज कशी वाटत नाही या नालायक लोकांना. ज्या गांधीजीनी दारुमुक्तीचा रस्ता दाखविला त्याच गांधीजीच्या कॉग्रेसमधली धेंड गांधी टोपी आणि खादी घालून लोकांना त्याच दारुच्यानादी लावायची काळी कामं करतात, तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

४. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा फक्त ए॑कण्यापुरता शब्द राहिलाय आजकाल. झेंडा, शिक्षणाच्या आयचा घो सारख्या चित्रपटांना आणि काही नाटकांना विरोध, एका न्यूज चॅनेल वर हल्ला होणं ही सारी कशाची उदाहरणं आहेत. एखाद्याला आपलं मत मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. मिडीया हा लोकशाहीचा एक पाया आहे. मिडीयानेसुद्धा सवंग लोकप्रियतेच्या मागे न धावता स्वताची विश्वासार्हता वाढवावी पण मिडीयावर असे हल्ले होणं हे साहजिकच कुठल्याही लोकशाहीला शोभणारं नाही हे ही तितकंच खरं. असे हल्ले करुन गुन्हेगार इथे मोकाट फिरतात तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

५. २६/११ च्या मुंबई हल्ल्यावरुन आपण खरंच काय बरं शि़कलो ? त्याच्यानंतरपण आमची यंत्रणा तेवढीच ढिसा़ळ आहे हे पुणे हल्ल्यावरुन दाखवून दिलंय. काल मुंबई, आज पुणे, परवा अजुन कुठलंतरी शहर असं किती दिवस चालणार आहे. लोकांचं जीवन खरंच एवढं स्वस्त झालंय का की कुणीही येउन इथ दहशत पसरवुन जावं. आम्ही दुसरया दिवशी कामाला तेवढ्याच विश्वासाने बाहेर पडतो हे आमचं स्पिरीट नाही तर ती आमची गरज आहे आणि तसेही आम्ही निर्ढावलेले गेलोच आहोत. पोलिसांना लोकांच्या रक्षणापेक्षा नेत्यांचंच रक्षण करावं लागतंय. ज्यांच्याकडे दुसरया महायुद्धाच्या काळातल्या जुनाट बंदुका आहेत ते आपलं संरक्षण काय करणार. पोलिस खातं सक्षम कधी होणार, सागरी सुरक्षा बळकट कशी होणार, इथल्याच फितुर लोकांना कधी पकडलं जाणार, कसाब सारख्या अतिरेक्याला शि़क्षा कधी होणार आणि उद्याचा दिवस मला पहायला मिळेल की नाही या भितीपोटी जगणारयाला विश्वास कोण देणार असल्या प्रश्नांची उत्तर माहीत जरी नसली तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

६. वय वर्षे दहा पासून ते अगदी इंजीनिअरींग, मेडीकल पर्यंतचे कित्येक विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत. उद्याचं भविष्य असलेली ही मुलं अशी आत्महत्या का करत आहेत? एवढा का त्यांच्यावरचा ताण असह्य होत चाललाय? त्यांच्या पाठीवरचं आणि डोक्यावरचं ओझं आपण कधी कमी करणार आहोत. एकाही मंत्र्याला निदान शिक्षणमंत्र्याला तरी याची दखल घेऊन काही करावंस का वाटत नाही? शाळा कॉलेजच्या फी, डोनेशन, शिक्षणातली स्पर्धा, नवीन वाटा याबद्दल खरंच काहीतरी करण्याची गरज आहे. जिथे या लहान मुलांची पण कुणाला दया येणार नसेन आणि त्यांचा जगण्या मरण्याने कुणाला फरक पडणार नसला तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

७. आमची शहरं ही दिवसेंदिवस बकाल होत चालली आहेत. कुणीही कुठेही जाऊन रहावं तो अधिकार सर्वांचाच आहे तरीही या येणारया लोंढ्यांना आवर कुठेनाकुठे घातला गेलाच पाहिजे. स्थानिक व परप्रांतीय यांमधली दरी ही वाढत चालली आहे याचं मुळ कारण आहे ती स्थानिक लोकांच्या मनामधली असुरक्षितता. त्यासाठी स्थानिकांना प्रत्येक गोष्टींमध्ये प्राधान्य मिळालंच पाहिजे यात गैर ते काय. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कुती, मराठी वा:डमय, मराठी कला यांची जपणूक ही जशी लोकांनी तशीच सरकारनेपण जाणीवपुर्वक केलीच पाहिजे. मराठी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे, ओळख आहे आणि ती शेवटपर्यंत टिकलीच पाहिजे अशा गोष्टींमध्ये मतभेद, मतमतांतर असली तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------