Wednesday, January 27, 2010

संध्या

मला संध्याकाळची वेळ तशी फारशी आवडत नाही. सुर्य अस्ताला जात असतो, पक्ष्यांनी त्यांचे घरट्याचे रस्ते पकडलेले असतात आणि रातकिडेही आपल्या कामाला लागले असतात. सुर्याच्या कलण्याने आसमंतात एक विचीत्र पोकळी निर्माण झालेली असते. दुपारी माती उधळून लावणारा वारा ही आता गपगार होऊन कुठेतरी दूर निघून गेला. चंद्रही आता सुर्य जाण्याची चाहूल घेत आकाशात स्वताच रुप दाखवू लागलाय. अशा वेळेस मी जेव्हा दोन घटका म्हणून उशीवर डोकं टेकवतो तेव्हाच माझ मन शांत होण्याच्याए॑वजी सैरभैर होतं. एक वणवा पेटतो उभ्या मनात आणि जाळायला उठतो मला. ज्या वेळी मी माझ्या मनाला विझवायचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस तो जीव खाऊन मला पेटवायचा प्रयत्न करतो. त्याचा हट्ट मला जाळण्याचा आणि माझा स्वताला जळू न देण्याचा. तो ज्वाला बनून पसरतोय आणि मी पाणी बनून त्याला आवरतोय. त्याचा आणि माझा पाठशिवणीचा खेळ असा दररोज सुरु असतो. कधी तो जिंकतो तर कधी मी. दुसरयाची राख करणं याला तो जिंकणं समजतो आणि जिंकणं म्हणजे राखेतून पुन्हा उभं राहणं असं मी म्हणतो. दोघांच्या व्याख्या वेगळ्या, दोघांचे उद्देशही वेगळे. त्याने त्याचं काम कराव आणि माझं मला करु द्यावं.

खरंच सांगतो, आपलं आयुष्य किती तरी खास आहे. मी तर आपल्या आयुष्याला एक मोठा ५५ वर्षाचा सिनेमाच म्हणतो. कॅरॅक्टर नवनवीन येतच असतात एकापाठोपाठ एक. दररोज काही तरी घडतच असतं. काही आपण चटकन विसरुन जातो तर काही काही मात्र मनात घर करुन बसतं अगदी ढेकळात पावसाचा थेंब रुतुन बसल्यासारखं. हीच ती संध्या ज्या वेळी माझ्या डोळ्यापुढुन माझ्याच आयुष्यातले कित्येक प्रसंग असे अचानकच तरळतात. एक आख्खाच चलचित्र कधीतरी डोळ्यापुढुन झर्रदिशी जातो. त्या मध्ये सगळ्या जपून ठेवलेल्या आठवणीच असतील असं ही काही नाही. काही न जुळलेल्या न पटलेल्या किंवा विसरुन जाण्यासारख्या पण असतात. एकेक क्षण मी जपलेला समोर पाहताना मी पुन्हा भूतकाळात जातो. जे माझं आहे फक्त माझंच असं ते एक छोटंस भावविश्व मी अगदी दोन मिनीटात पुन्हा तयार करतो. जे आयुष्य मी अगोदरच उपभोगलंय त्याची पुन्हा एकदा चव चाखतो. जे हरवलंय ते पुन्हा डुबक्या मारत शोधतो. जे गवसलंय ते पुन्हा एकदा घासुन पाहतो. दुखरे-हळवे असे कोपरे मी दुरुनच बघतो. थोड्याच वेळात मी मग तल्लीन होऊन जातो. माझं या विश्वाहूनही वेगळं असं विश्व आहे हेच मी मुळी तेव्हा विसरतो. माझ्या जगण्याला जो खरा अर्थ मिळतो तो या अशा समांतर जगण्यामुळेच. चालु आयुष्यात, या विश्वात कितीही वणवे पेटले तरी मला त्याची फिकीर नाही कारण माझ्या हाताने सजविलेलं ते विश्व संपूर्ण माझंच आहे, तिथे वणव्याला स्थान नाही आणि विझण्याची मला तमा नाही.

(...डायरीच्या पानांतून)

-अजय

15 comments:

हेरंब said...

अप्रतिम. मनाचं द्वंद्व छान मांडलंयस.. आणि शेवट तर सुरेखच..

भानस said...

हेरंबला अनुमोदन. स्वत:च्या मनातील आंदोलनाचे विश्लेषण नेमके केलेस. शेवट खासच.

Mugdha said...

Chhanach..aavadla..

snehal said...

zepayla thoda difficult gel, pan chan lihilay. tumhi karach yevda vichar karta.

Ajay Sonawane said...

हेरंब : खुप अचुक ओळखलंस, मनाचं द्वंद्व होतं ते.
भाग्यश्री आणि मुग्धा: खुप खुप धन्यवाद.

Ajay Sonawane said...

@स्नेहलः 'एवढा SSS' नाही म्हणायच 'एवढाच' विचार असं म्हणं. हळुहळु तुला ही झेपेल हे सारं एकदा सवय झाल्यावर, नाही का ? :-)))

-अजय

आनंद पत्रे said...

सहिच! स्वत:च्या मनातले द्वंद्व कसेकाय बाबा तुम्हाला शब्दबद्ध करणे जमते?

pravin said...

Ajay.. as usual.. EK NUMBER

~ Pravin

Ajay Sonawane said...

आनंद, प्रवीणः खुप खुप धन्यवाद. असेच येत रहा.
शब्दबद्ध केलंय खरं पण लोकांना याचा अर्थ किती कळला माहित नाही. समजायला अवघड आहे पण जगायला सोपं असं आयुष्य...

सिद्धार्थ said...

छान लिहलं आहे. नेहमीप्रमाणेच. हल्ली फार गहन विचार करता आपण.

Unknown said...

mast.. sandhyet chhanch rang bharalet..

अपर्णा said...

अजय सिद्धार्थ म्हणतो त्याप्रमाणे फ़ार सिरियस झालायंस का? पण हे द्वंद्व फ़ारच छान मांडलंयस बाबा...
मला संध्याकाळीपैकी रविवारची संध्याकाळ सगळ्यात जास्त त्रासदायक वाटते आणि त्यावेळी रेडिओवर "सांजधारा" म्हणून एक कार्यक्रम येतो (अजुनही बहुतेक) त्यातली मराठी गाणी तर फ़ारच कासावीस करत....

Ajay Sonawane said...

सिद्धार्थः "आदत से मजबूर हूं..."
योगः धन्यवाद !
अपर्णा: नाही ग, एवढा पण सिरीअस नाही. सांजधारा हा कार्यक्रम मी कधीही ए॑कलेला नाही पण कासावीस करण्यासारखा आहे असं तू म्हणतेस तर नक्की ए॑केन.

-अजय

naina said...

kup chan jamwa jamaw chalali ahe bhawnachi

Vedavati said...

mhanunch sandhyakalchya velela katarvel mhantat nahi ka??
sundar lekh