Monday, February 22, 2010

डायरीतला 'मी'

सुरुवातीला माझं लिखाण माझ्या शंभर पानांच्या डायरीपुरतंच मर्यादित असायचं. त्या डायरीमध्ये माझ्या दिवसभरातल्या घडलेल्या नोंदीपेक्षा मनात उठलेल्या तरंगांचंच प्रतिबिंब जास्त असायचं. आपण स्वतंच रुप जसं आरशासमोर तासनतास उभं राहून न्याहाळतो तसंच मग मी ही कधी वेळ मिळाला तर डायरीची पानं पाठीमागे नेऊन माझ्यातल्या हळव्या अशा 'मी' ला शोधायचो. एखाद्या क्षणी एखादी भावना आपल्यावर मात करते आणि मग आपण आपल्या मेंदूच न ए॑कता त्या भावनेच्या आहारी जाऊन ती सांगेन तशी प्रत्येक गोष्ट करतो. कधी ती भावना प्रेमाची असेन तर कधी रागाची. कधी मित्रत्वाची तर कधी सुडाची. जिथून मनाचा वावर सुरु होतो ना तिथेच मेंदूचं राज्य संपलेलं असतं आणि त्या हद्दीच्या पलीकडे आपण फक्त त्याच्याच तालावर नाचत असतो. मी सुद्धा असाच मेंदू आणि मन दोन्ही असलेला एक सामान्य माणूस. मनाचं आणि मेंदूच द्वंद्व मी सुद्धा बराच वेळा अनुभवलंय. असे अनेक द्वंद्व, अशी अनेक वादळं या डायरीच्या पानामध्येच शांत झाली. माझ्यातल्या घोंघावणारया वादळाला शमविण्याची ताकद या काळ्या पांढरया पानांमध्येच आहे. ऑफीसमधल्या कटकटी, नोकरीमधले चढ-उतार, नात्यामधली गुंतागुंत आणि स्वताची तत्त्व अशा प्रत्येक विषयावर मी या डायरीशी बोललो. कधी कुठल्या ट्रेकमधला थरार तर कधी कुठल्या पिकनीकमधल्या गमतीजमती, शिकलेला नवीन विषय तर फसलेली युक्ती मी माझ्या डायरीशी शेअर केली. तिने माझा रागही सहन केला आणि प्रेमसुद्धा अनुभवलं. थकून भागून घरी परतल्यावर चार ओळी काहीतरी नवीन लिहून नवनिर्मीतीचं वेडही तिनेचं लावलं. आयुष्यात प्रत्येकजणच धडपडतो पण अगतिक झाल्यावर उठून उभं राहण्यासाठी मला पुन्हा उद्दुक्त ही तिनेच केलं. मी तसा थोडा अबोलच, पण माझ्या मुखातुन श्रवणीय बोल बोलण्यास भाग मला या डायरीनेच पाडलं. डायरीने मला सुरुवातीला विचार करायला आणि नंतर मांडलेला विचार स्वतामध्ये रुजवायला शिकवलं. मला घडवलं ते माझ्या आई वडीलांनी आणि त्यांच्या संस्काराने पण मला अंर्तबाह्य बदलवून टाकलं ते फक्त माझ्या डायरीनेच. माझ्यामधल्या अनुभवाला आणि आत्मविश्वासाला जर कशामुळे बळ प्राप्त झालं असेन तर ते फक्त त्या दररोज डायरीमध्ये लिहण्याच्या सवयीमुळेच. या डायरीच्या प्रत्येक पानामध्ये मी कालची ढळलेली संध्याकाळ आणि उद्याची येणारी पहाट पाहतो. दमलेल्या जीवाला औट घटकाभर विश्रांतीसाठी मी या डायरीचाच आधार घेतो. हरवलेल्या अस्तित्वाला जपण्याचं काम मी या डायरीतच करतो. मला या डायरीच्या प्रत्येक पानावर माझं स्वताचं विश्व तयार करत जायचंय, पानाचा कोपरा न कोपरा मला माझ्या अस्तित्वाने भिजवून टाकायचाय म्हणूनच समासंच बंधन मी डायरीत पाळत नाही. जळते ती वात, पण प्रकाश देणारा कोण असं म्हटलं तर नाव मात्र दिव्याचं घेतलं जातं. माझ्या डायरीचंही असंच आहे, उजेड माझा पडला तरी कण कण जळणारी ती माझी डायरीच आहे !

(...डायरीच्या पानांतून)


-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

16 comments:

Anonymous said...

डायरी लिहिणं ही‌ एक चांगली सवय आहे. मी लिहिण्याचा कंटाळा आला की‌ त्यात चित्र काढतो .. :)

Maithili said...

Post bharri aahe. Mi pan inspire zaley dayari lihanyasathi...

मीनल said...

खरयं, जोवर लेखणी चालत नाही तोवर कित्येक मनातल्या गोष्टी आपल्यालच कळत नाहीत. अर्थात,मला याबाबतीत नियमितता अजिबात पाळता येत नाही ही खंत आहे.
Anyway, keep writing, keep growing.

मनमौजी said...

कॉलेज मध्ये असताना मी पण डायरी लिहायचो. . . आता नाही लिहीत. . बघू विचार आहे खरा लिहीण्याचा. . .बाकी मस्त झाली आहे पोस्ट.

Pravin said...

Mastch zala aahe re lekh -nehamisarakha..!! :-)

~ Pravin

सिद्धार्थ said...

तुझ्या पोस्टमधून तुझं अंतर्मुख होणं कळतं. मस्त लिहितोस.

davbindu said...

मस्त झाल आहे पोस्ट...
खर तर डायरी त्यावेळी नाही पण नंतर वाचतांना खुप मज्जा येते..

आनंद पत्रे said...

दैनंदिनी लिहिणे अतिशय चांगली सवय आहे, मी लिहायचो देखिल...पण तुझ्यासारखं मनाची आवर्तने कधीच मांडता आली नाहीत, त्या केवळ घटनांच्या नोंदी असायच्या... अताशा तर लिहिणे नाहीच....

हेरंब said...

सही झालंय पोस्ट. नियमित डायरी लिहिणं फार अवघड आहे. मला तर इतका कंटाळा होता त्या गोष्टीचा की मी डायरी लिहिणं सुरु करायचंही धाडस केलं नाही कधी.

Snehal said...

amazing,

diary ekdatari hatat padli pahije mazya, mazza yeyil mag ;)

भानस said...

अजय,मस्त झालीये पोस्ट.अगदी मनातले लिहीलेस. एकेकाळी मीही रोज डायरी लिहीत असे.पण मग सगळे डोळा ठेवून असत, कधी हातात पडतेय आणि वाचतोय....हेहे. बंदच करून टाकली.:)

Ajay Sonawane said...

mi, मैथिली, मनमौजी: आभार, डायरी लिहणं हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असतं. काही जणांना भूतकाळात कधीतरी डोकवायला आवडत ते लोक मग डायरी लिहतात. भूतकाळ आठवायला लागला की काही जण ती फाडतात पण :-)

-अजय

Ajay Sonawane said...

प्रवीण, सिद्धार्थ, दवबिंदू: डायरी तुम्ही ही लिहीत जा, ब्लॉग आल्यापासून माझंही तिच्याकडे दुर्लक्ष होतंय खरं. म्हणून मी आता ऑनलाईन डायरी लिहतो.

मीनलः अगदी खरं बोललीस, लिहल्याशिवाय बरयाच गोष्टी समजत नाहीत.

आनंदः पुन्हा एकदा प्रयत्न कर, नक्की सवय लागेन. नोंदी ठेवायला लागलास तर लवकरच बोर होशील. मनातल्या भावनांना, तरंगाना टिप.

Ajay Sonawane said...

हेरंबः मान्य आहे मला की ते कंटाळवाणं काम आहे, बरेच दिवस झाले मी सुदधा थोडी टाळाटाळच करतो. पण कधीतरी मग ब्लॉग लिहण्याच्या निमित्ताने होतं थोडंफार लिहणं.

स्नेहलः दुसरयाची डायरी वाचण चांगल नाही बरं का ! :-)

भाग्यश्री: कुणी दुसरयाने वाचल्यावर जाम एम्बरॅसींग फील होतं ना ? खरंय आहे तुझं.

-अजय

अपर्णा said...

खरंय तुझं डायरी लिहिली पाहिजे...म्हणून आजकाल लक्षात ठेवण्यासारख्या काही आठवणी निदान ब्लॉगवर तरी लिहिल्या जातात हे नशीब...नाहीतर तसा मला डायरी लिहायचा कंटाळाच आहे....
तुझी ही पोस्ट छान आहे...शेवटचं बोल्ड वाक्यतर लय भारी...:)

Ganesh T said...

Good going ajay.
Khup chan post ahe..diary lihna itka sopa nahi re..

Me praytna kela lihnyacha pan khup kantala yeto..han pan tujhe blog vachyala bilkul nahi.. :)

keep posting :)
-ganesh