Monday, December 21, 2009

मी आणि माझी फिल्लमबाजी

फार पाठीमागे नाही अगदी २० वर्षापुर्वी गोष्ट. तेव्हा आमच्या घरी एक क्राऊन चा जुना ब्लॅक अ‍ॅड व्हाईट टी व्ही होता. त्या काळी ब्लॅक अ‍ॅड व्हाईट टी व्ही ला थोडाफार कलर चा फिल यावा म्हणुन निळी काच लावलेली असे. आमच्यासाठी फिल्मी जग त्यावेळी फक्त त्या काळया, पांढरया आणि निळया या तीन रंगातच सामावलेलं होतं. रंगीत टी व्ही तेव्हा ­प्रत्येकाच्या घरी नसायचे. आमच्या घरी रविवारी भल्या पहाटेपासुन लवकर उरकण्याची घाई सुरु असायची. माझ्या आईला रविवारची 'रंगोली' फार आवडायची आणि तिच्यामुळेच मला सुद्धा. मग सकाळी सातच्या आत आमची आंघोळ वगैरे उरकुन आम्ही चारजण टी व्ही समोर अगदी अगदी ठाण मांडुन बसे. देवाच्या पुजेसाठी आम्ही एवढे भक्तिभावाने कधी बसलो नाही पण रंगोली साठी मात्र एक मिनीटभर सुद्धा जागचे हलत नव्हतो. त्या वेळी आठवड्यात एक दिवसच गाणी पहायला मिळत असे. त्यामुळे रंगोलीचं महत्त्व काही औरच होतं. मला त्यावेळेस राज कपुर आणि देवानंद फार आवडायचे. देवआनंदचं एका बाजुला तिरका तिरका होत पळणं पाहुन मला एकदा वाटलं होतं की आता हा नक्कीच खाली पडणार. तेव्हा मला आईने समजावलेलं की ही तर त्याची स्टाईल आहे. राज, रणधीर आणि राजीव, राज कपुर च्या एका गाण्यात लहान मुलं म्हणुन होती, रेखाला अमिताभशी लग्न करायच होतं, मीना कुमारी कॅन्सर मुळे मरण पावली आणि अशा बरयाच गोष्टी मला लहानपणीच समजल्या होत्या. मला त्यावेळी 'एक दोन तीन .." हे तेजाब मधलं गाणं पाठ होतं. मग कुणी नविन माणूस घरी आलं की आमचा न चुकता गाण्याचा कार्यक्रम होत असे. त्यासाठी कुणालाही मला 'अजय ते गाणं गाऊन दाखव बरं' असं म्हणण्याची मी वेळ येऊ दिली नाही. माझा आवाज चांगला नसतानाही फक्त या आवडीपोटीच मी शाळेच्या स्नेहसंमेलनात सुद्धा गायलो होतो. एवढंच काय आयुष्यात मी पहिलं कुठलं पुस्तक हातात घेतलं असं जर मला कुणी विचारलंच तर मी 'चांदोबा' सोडुन एखाद्या फिल्मी मासिकाचच नाव घेईन, याच्यावरुन तुम्हाला अंदाज आलाच असेन की मी किती फिल्मी आहे ते :-)

त्या वेळी टी व्ही म्हणजे म्हणजे डी डी नॅशनल वा ते एकच असं चॅनेल आम्हाला माहित होतं. शुक्रवार व शनिवारी हिंदी आणि रविवारी मराठी सिनेमा टी व्ही वर लागत असे. आठवड्यातुन इन मिन तीन सिनेमे म्हणजे आमच्यासाठी मोठा अर्पुप प्रकार होता. शुक्रवारच्या सिनेमाची तयारी सकाळपासुनच सुरु होई. आमच्या शेजारी राहणारा निलेश सिनेमा पाहण्यासाठी माझ्या सोबतीला असे. शुक्रवारचा सिनेमा कुठला या पासुन त्यात कोण कोण आहेत याची चर्चा आम्ही शाळेच्या कट्यापासुन ते मुतारी पर्यंत, सर्व जागी करत असे.
"आजच्या पिक्चर मध्ये कोण कोण आहेत ? हिरो किती आहेत त्यात ?"..मी, जेवढे जास्त हिरो तेवढी जास्त मजा असं साधं समीकरण असे आमचं.
"धर्मेद,जितेंद्र आणि बरीच गॅग आहे त्यात. आयच्या ...भारी पिक्चर दिसतोय".. निलेश. 'आयच्या' हा त्याचा भारी आवडता शब्द. हा शब्द तो प्रत्येक भाव व्यकत करणासाठी वापरी. म्हणजे आनंद झाला तरी आयच्या, दु:ख झालं तरी आयच्या, विस्मयचकीत झाला तरी आयच्या आणि राग आला तरी आयच्याच.
"फा़ईटींग आहे का राव...", मी, फाईटींग हा आमच्यासाठी सिनेमाचा आत्मा असे. पिक्चर मधील फाइटींग बघुन आम्ही खरया खुरया मारामारीत सुद्धा ढिशुम ढिशुम असा तोंडानेच आवाज करत असे. :-)
"हो मस्त फाईटींग दिसतेय, तुला माहितेय का त्यात हेलीकॉप्टर मध्ये सुद्धा फाईटींग आहे. त्यात हिरो कडे कुत्रा आणि माकड सुद्धा आहे...", निलेश. कुत्रा आणि माकड सिनेमात असणं म्हणजे जास्तच एंटरटेनमेंट.
"सॉलीड सिनेमा असणार राव मग...तु लवकर उरकुन घरी ये. आज मी शेवटपर्यंत सिनेमा पाहणार.", मी. निलेशला माझ्यासारखीच सिनेमाची आवड होती फरक एवढाच की मी सिनेमा पाहताना मध्येच झोपत असे आणि तो मला
सारखा हलवुन जागा करी. मी कधीच कुठलाही सिनेमा शेवटपर्यंत पाहिला नाही आणि टी व्ही सुद्धा कधी बंद केला नाही. पण सकाळी उठल्यावर टी व्ही कुणी बंद केला यापे़क्षा मी कुठल्या सीन नंतर झोपलो याचीच जास्त उत्कंठा असायची. निलेशला बिचार्‍याला दरवेळेस मला राहीलेल्या सिनेमाची स्टोरी सांगावी लागत असे.

एकदा मी नाना पाटेकरचा सिनेमा पाहुन शनिवारी सकाळी शाळेत गेलो. त्या दिवशी नाना पाटेकर माझ्या अगदी अंगात भिनलेला होता. त्यात इतिहासाच्या तासाला आमचे पाटील सर हे क्रांतीवीर नाना पाटीलांचा धडा शिकवत होते. शिकवता शिकवता त्यांनी अचानक माझ्या शेजारी बसलेल्याला उभं करुन नाना पाटीलांविषयी एक प्रश्न विचारला. त्याला उत्तर येत नव्हतं म्हणुन त्याने मला खुण केली. मी ही दिलं फेकुन ...नाना पाटीलांच्या ए॑वजी नाना पाटेकर. त्याने ही दिलं तेच उत्तर नाना पाटेकर म्हणुन. सगळ्या वर्गात हशा. मग काय पाटील सरांच्या अंगात माझा नाना पाटेकर घुसला आणि त्यांनी बिचारयाला चांगलचं झोडपलं. त्या मित्राचा अगदी कालपर्यंत असा गैरसमज होता की मी त्याला नाना पाटील म्हणालो पण त्यानेच नाना पाटेकर ए॑कलं. नुकताच त्याचा हा गैरसमज जेव्हा मी दुर केला तेव्हा त्याला माझ्या इनोसंन्ट चेहर्‍यामागचा खरा शैतानी चेहरा दिसला.

आमच्या घराच्या बाजुला त्यावेळी व्हिडीओ वर सिनेमा दाखविण्याचा उद्योग एकाने सुरु केला होता, तो माझा मित्रच होता. मग काय सिनेमा कुठलाही असो माझी उपस्थिती तिथे सन्मानणीय असायची. एकदा त्याने 'शोले' सिनेमा दाखविला. शाळेतली झाडुन सारी मुलं सिनेमा बघायला आली यात माझा थोडाफार हात होता. शाळेत जेव्हा याचा शोध लागला तेव्हा मग काय आम्हा सर्वांना समोर घेऊन चांगल्या छड्या मारण्यात आल्या. त्यानंतर माझे मित्र कित्येक दिवस मला सारखे 'कितने आदमी थे रे शोले देखेने...?" असं विचारायचे. :-)

रविवारच्या संध्याकाळच्या सिनेमासाठी मी आणि आमच्या घरचे सारेच, अगदी चारच्या आत सगळ काही आवरुन तयार होत असे. मग चार वाजता चहा घेता घेता आम्ही सारे अशोक सराफ, लक्ष्मीकांतचे सिनेमे पाहत असु. पण आमचे एक सर मात्र मुलांनी सिनेमा पाहण्याच्या अगदी विरुद्ध होते आणि त्यासाठीच ते सगळ्यांच्या घरी या वेळेत जायचे आणि जो सिनेमा पाहताना दिसेन त्याला झोडपायचे. मला याची कुणकुण अगोदरच लागली होती. म्हणुन मी घरी बाहेर जातो म्हणुन सांगितलं आणि स्वत: दरवाजावरुन पोटमाळ्यावर चढुन कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी सिनेमा पाहत बसलो. सर खाली चहा पित आहेत आणि मी पठ्या त्यांच्या वर बसुन सिनेमा पाहतोय असं त्यावेळी चित्र होतं. सिनेमा पाहण्यासाठी मी असे बरेच प्रकार केले आहेत.

सिनेमाच्या वेडापायी बराच वेळा मी सिनेमात जे दिसेन ते करायचा प्रयत्न करायचो. शाहरुख सारखे केस पुढे आणणं, गोविंदा सारखी शिटी वाजविणे, ते सिनेमातले डायलॉग्ज म्हणणं वगैरे. माझा भाऊ सुद्धा माझ्या एवढा नाही पण बरयापैकी फिल्मी होताच. इंजीनिअरींगला असताना तो उगाचच मायनस नंबरचा चष्मा घालायचा आणि आपण खुप अभ्यास करण्यातल्या कॅटॅगरीतले आहोत अस दाखवायचा. नंतर नंतर त्याने त्याच्या पॅन्ट सुद्धा बेल बॉटम घालणं सुरु केलं होतं पण तो पर्यंत ती स्टाईल गेली होती. माझी बहिण सुद्धा फिल्मी प्रकाराला अपवाद नव्हती. तिला करीश्मा न जाणो का पण आवडायची. मग तिच्यासारखे केशरचना करणे सारखे प्रकार आलेच. थोडे पुढचे केस मुलांसारख्रे उजव्या हाताला वळविणे व ते मधुन अधुन मानेला झटका मारुन मागे सारणे असा प्रकार तिने एकदा केला होता. पण नंतर मातोश्रींनी त्याला भलतीच उपमा दिल्याने तो लगेचच बंद झाला. माझ्या स्वभावगुणानुसार मला एकच हिरो वा हिरोइन जास्त दिवस आवडले नाही. सूरुवात राज कपुर पासुन करुन मी अगदी शाहरुख पर्यंत सगळ्यांना फॉलो केलं. कोणी एके काळी मला मिथुनदा ही आवडायचा हे मी आज सर्वांसमोर मान्यही करतो. शाळेत असताना मी भलताच फिल्मी प्रेमी होतो, पण कॉलेज मध्ये माझं हे वेड बरंच कमी झालं. नोकरीला लागलो आणि या वेडाला पुन्हा पालवी फुटली. एकदा असाच एका मैत्रीणीबरोबर सिनेमा पहायला थिएटरला गेलो आणि मध्यांतराला कळलं की माझ्या पुढे दोन तीन सीटवर माझेच एक मित्र आणि वहिनी बसलेल्या आहेत. मग काय, सिनेमा संपायच्या आतच मी मैत्रीणीला घेऊन थिएटरच्या बाहेर. तसं माझं आणि तिचं काही नव्हत पण दोघेच सिनेमाला आलोय असं जर त्याला दिसलं असतं तर त्याने मला आयुष्यभर त्याच विषयावर चिडवलं असतं.

असं हे माझ चित्रपटांचं वेड, हवंहवंस पण नामानिराळं !

मी
वीस वर्षे
अंदाजे १५ भाषा
१० वा अधीक देशांचे
४००० पे़क्षा जास्त सिनेमे
ज्यात १०००० हुनी अधिक कलाकार
प्रत्येक सिनेमात हाताळलेला नविन विषय
दररोज एक तरी सिनेमा पहायचा असं समीकरण
आणि हे वेड आयुष्याच्या शेवटपर्यंत जोपासण्याचा ध्यास...

- अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. फुंकर
२. मी 'पुरुष' बोलतोय !
३. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

22 comments:

  1. सॉलिड आत्मपरीक्षण केलय राव. स्वतःबद्दल इतकी माहिती कमी लोकांना असते आणि त्यापेक्षाही कमी जण ती अशी उघडपणे मान्य करतात.
    मलाही सिनेमाचं बर्‍यापैकी वेड होतं/ आहे! पण तुझं वेड = नादखुळाच!

    ReplyDelete
  2. भुंग्याशी एकदम सहमत..खरंच चित्रपट वेड भिनलंय म्हणून तर पोस्ट पण एकदम मस्तच झालीय..प्रतिक्रियांचा पाऊस पडेल बघ उद्यापर्यंत...

    ReplyDelete
  3. @भुंगा : हो ना रे, वेड लहानपणापासुनच आहे. आजकाल ते शिगेला पोहोचलय. कुठली भाषा मी सोडत नाही. हे सिनेमे मला दररोज काहीतरी नविन गोष्टी शिकवत असतात. खुप आनंद मिळतो पाहुन.

    -अजय

    ReplyDelete
  4. @अपर्णा: खाऊसाठी दिलेल्या पैशातुन मी व्हीडीओ कॅसेटस आणायचो पण काहीही झालं तरी सिनेमा सोडला नाही. आवडीच्या क्षेत्रात करीअर नाही करता आलं पण करीअर करता करता आवड मात्र जोपासली.

    अशीच भेट आणि प्रतिक्रिया मिळुदेत तुझ्याकडून. :-)

    ReplyDelete
  5. छानच सांगितलीस तुझी फ़िल्लमबाजी..
    का कोण जाणे, सिनेमातल सगळ खोटचं असतं अस सगळ्यांनी हरघडी सांगितल्यामुळे मला अनुकरणातली मजा अनुभवता आली नाही.
    आणि मैत्रीणीला घेऊन थिएटरच्या बाहेर पडलास, तो पिक्चर परत पाहिलास की नाही? :)

    ReplyDelete
  6. @मीनलः खुप दिवसांनंतर येणं केलंस ब्लॉगवर. अनुकरण प्रत्येक गोष्टीच थोडंच करायच असत. ती खरं तर एक मजा असते. लहान मुलं शक्तिमान सारखं बोट आकाशाकडे करुन गोल गोल फिरतात. थोडक्यात ते अनुकरणापेक्षा त्यातली मजाच जास्त अनुभवतात ना !

    मैत्रीणाचा किस्सा मी तसा इथे थोडक्यातच सांगितलाय. असे किस्से माझ्याच बाबतीत का घडतात बरं ! मी तिला घेउन बाहेर पडलो तो पण सिनेमा पाहुनच म्हणजे सिनेमा संपायच्या आधी १० मिनीटे. ती विचारत होती एवढ्या लवकर का, तिला म्हणालो बाई नंतर गाडी काढायला अडचण होते. आता तिला काय सांगु माझी खरी अडचण :-)

    ReplyDelete
  7. एकदम भन्नाट रे!! मस्त आहे फिल्लमबाजी!!
    नाना पाटील अन् नाना पाटेकर. . :)

    ReplyDelete
  8. मनमौजी: धन्यवाद मित्रा, नाना पाटील अन नाना पाटेकर :-) , मी त्या मित्राला अजुनही कधी भेटला तर नाना पाटेकर असं म्हणुनच चिडवतो.

    -अजय

    ReplyDelete
  9. ह्या बाबतीत same pinch. मलासुद्धा फिल्म्स आणि TV च इतकच वेड आहे. इतक जास्त कि DD1 ला शुक्रवारी आणि शनिवारी लागणारे पिक्चर पाहायला मी आईशी जम भांडलीये. कित्येकदा रात्री १२ १ वाजता मी झोपायला उठत नाही म्हणून आई TV बंद करायची आणि त्याची वायर हातात काढून घेऊन बसून रहायची. पण माझ वेड पण तितकच जबरदस्त होत, मी तशीच बंद TV समोर तासनतास बसायचे. मग कधीतरी तिलाच माझी दया यायची, नाहीतर कधीतरी ती इतकी चिडायची कि पुढचा आख्खा दिवस मौन आणि निर्जळी व्रताचा ( व्रत तिचं बर का. ती कितीही चिडली तरी सगळा राग स्वतःवर काढते, आमच्यावर कधीच नाही.)

    आजसुद्धा मी कोणत्याही hero चा आणि कसाही पडेल पिक्चर एका दमात अख्खा बघू शकते. अगदी नसरुद्दिन शहाचा एक रद्दड Black and white movie आहे, "हम पांच" नावाचा. तो हि movie मी एकदा सोडून दोन वेळा पहिला आहे.

    खूप मस्त झालीये post .

    - अमृता

    ReplyDelete
  10. सिनेमा पहाण्यासाठी कुछ भी करेगा अशी परिस्थिती होती. कूठलाही सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचो.
    पण या पोस्टने जुने दिवस आठवले. मस्त झालंय पोस्ट!!

    ReplyDelete
  11. @अम्रुता: अग तु सुद्धा माझ्यासारखीच चित्रपट वेडी दिसतेस. मग लवकरच याच्यावर एखाद याच्यावर पोस्ट येऊ देत. खुप आवडेल तुझ्या शब्दात वाचायला. तुझं ते रात्रीच टी व्ही प्रकरण आवडलं बरं का,

    अशीच भेट देत रहा...

    -अजय

    ReplyDelete
  12. @महेंद्द - आज मला जास्तीचा आनंद झालाय कारण आज तुमची प्रतिक्रिया मिळाली. बाय द वे, फस्ट् डे फस्ट् शो चा आनंद काही औरच नाही का ?

    अशीच भेट देत रहा.

    -अजय

    ReplyDelete
  13. अरे तू तर फुल्ल टू माझीच कॅटेगरी आहेस तर.....मी टाकलेली पोस्ट वाचलीस का?

    मस्त झालीये पोस्ट...........

    ReplyDelete
  14. अजय तुझी फिल्लमबाजी आणि त्याची पोस्ट दोन्हीही झकास. :)गणपती व नवरात्रात सार्वजनिक मंडळे सिनेमे दाखवत...मैदानात. किती ओरडा खाल्ला असेल बाबांचा.सिनेमा पाहिलेला असला तरीही पुन्हा पुन्हा पाहायचो. टिव्ही घरी नव्हता आणि त्यावेळी फक्त रविवारी सहा वाजता हिंदी सिनेमा दाखवत. बाबा म्हणायचे, सोने पडले ना टिव्हीतून तरी तेही गोळा करायला जाऊ नका. म्हणजे पाहा त्यांना किती राग होता. पण आम्ही कुठले ऐकायला...जायचोच नजर चुकवून. बाकी तुझा नाना पाटेकर सहीच....हा हा..

    ReplyDelete
  15. @तन्वी: चला आपण एकाच कॅटॅगरीतले आहोत हे वाचुन आनंद वाटला, तुझं पोस्ट आताच वाचली. माहित नाही कसा विसरलो, तु आठवण करुन देत जा ग इथुन पुढे :-)

    -अजय

    ReplyDelete
  16. @भाग्यश्री : खरंच तुम्ही आमच्या पे़क्षा जास्त्च ओरडा खाल्लेला दिसतोय. बाकी तुम्हाला ही फिल्मीची जास्त आवड दिसतेय. आम्ही सुद्धा गणपतीत सिनेमा पहायला जायचो. आमच्या परी़क्षाच्या वेळेस नेमके टी व्ही ला चांगले सिनेमे लागायचे. मग आमच कुठलं ल़क्ष अभ्यासात, मधुन मधुन चान्स मारायचोच.

    ReplyDelete
  17. @तन्वी व भाग्यश्री: अग अजुन एक किस्सा सांगायचाच राहीला माझ्या फिल्मीपणाचा...
    आता हिंदी सिनेमा असला म्हणजे सिनेमात एखादा तरी रेप किंवा थोडासा अश्लिल किंवा मग एकदम एखादा रोमँटीक सीन असायचाच. पण असे सीन्स, घरच्यांच्यासमोर कसे पाहणार ना. त्यांना ही ते थोडं ते ऑकवड वाटायच. मग मीच मन मोठं करुन (?) उठुन बाहेर जायचो पण सीन चुकवायचा कसा , म्हणुण मग हळुच दरवाजाच्या फटीतुन टी व्ही पाहायचोच. आई म्हणायची माझा 'छोट्या' (म्हणजे मी बरं का !) 'तसले' सीन्स लागले की बाहेर जातो, त्याला तसले सीन्स अजिबात आवडत नाहीत. मी किती भोळा होतो नाही... :-)

    -अजय

    ReplyDelete
  18. अजय, व्वा!! माझा भाऊ तु :)
    सुदैवाने, माझ्या घरी सिनेमा बघण्याची काही बंदी नव्हती. टिवी तर विचारुच नये इतका पाहीला आहे, अजुनही पाहतोच.
    अगदी पेपरच्या दिवशीसुद्धा १-२ तास पाहायचो. बाकि तुझ्या प्रत्त्येक वाक्यागणिक लहानपण आठवलं..
    शुक्रवारी अगदी सकाळी सायकल घेवुन रेल्वे स्टेशन वर जाउन ’स्क्रीन’ आणायचो, म.टा. वाचायचो केवळ मुकेश माचकरांचे परिक्षणासाठी...
    एक न एक अनेक प्रसंग...
    लेख खुपचं मस्त जमला आहे....

    ReplyDelete
  19. @ आनंद : मेरे बिछडे हुए भाई कहा था तु इतने दिन... (तद्दन फिल्मी बर का ! )
    बाय द वे, प्रत्येकाचच बालपण बरयापैकी असंच असत. परीक्षेच्या दिवशी खुप चांगले सिनेमे लागायचे आणि मग मी १० मिनीट करता करता पुर्ण सिनेमाच पहायचो. अजुनही सारे प्रसंग अगदी एक एक करुन समोर येताहेत. तुझा कॅनव्हास ब्लॉग मी याच्या अगोदर सुद्धा भेट दिला आहे. अमेली सारख्या सिनेमांच मी सुद्धा फॅन आहे बरं का. त्यातल्या त्यात रोमँटीक सिनेमे आवडतात जसं सिटी ऑफ एंजल्स, यु गॉट मेल वगैरे. तुझ्या कॅनव्हास वर अजुनही काही सिनेमांचे रिव्हुज वाचायला मिळोत हीच एक छोटी अपे़क्षा.

    -अजय

    ReplyDelete
  20. सॉलिड राव, काय वेड लावून घेतल आहे सिनेमाच. रोज एक तरी.
    आणि हो माझ्या कडे अजून ही बुश कंपनीचा तो ब्लेक अंड व्हाईट टी. व्ही. जोपासून ठेवलेला आहे. माझ्या मुलीचा जन्म झाला आणि एका आठवड्यात तो घेतला. वीस वर्ष झाली.

    ReplyDelete
  21. @रविंद्रजी: माझ्या काकांच्या घरी बुश कंपनींचा ब्लेक अंड व्हाईट टी. व्ही. होता आणि त्याचं ते लाकडी मोठंसं घर. आम्ही लहान मुले त्या टी.व्ही पे़क्षा त्या घरातच जास्त गुंतुन बसायचो. बाकी आर्वजुन भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.
    असंच भेट देत रहा.

    -अजय

    ReplyDelete
  22. बघ माझी भविष्यवाणी खरी झालीय...आता जरा माझ्या ब्लॉगवर जा..
    तुला माझ्या ब्लॉगवर टॅगलय..बघ जाऊन

    ReplyDelete