Saturday, April 3, 2010

सुख की समाधान

बरेच दिवसानंतर लिहायला बसलो आणि कागद पेन एवढंच काय डोक्यातले विचार सुद्धा अनोळखी असल्यासारखे माझ्याशी वागू लागले. कामाचा ताण, भावनांचा कल्लोळ, खांद्यावरच्या जबाबदारया आणि डोळ्यांमधील स्वप्नं या सगळ्यांचा मेळ घालता घालता मी कधी तरी स्वताला विसरुन जातो आणि देहभान विसरुन छाती फुटेपर्यंत नुसता पळत सुटतो. माणसाच्या गरजा त्या किती, पण तो त्यांचंच जास्त दडपण घेतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या साध्यासुध्या गरजाचं रुपांतर मग ३ बीएचके फ्लॅट, फिरायला एक मोठी कार, आठवड्यातून दोन-तीनदा हॉटेलींग आणि वर्षातून कमीत कमी दोन तीन वेळा कुठेतरी पिकनीक एवढ्या मोठ्या लिस्ट मध्ये होतं. माणूस जेवढया प्रमाणात कमावतो तेवढ्याच प्रमाणात तो त्याचे खर्च ही वाढवत असतो, त्याच्या गरजा ही तशाच वाढत असतात. स्वप्न उराशी बाळगणं, ते पुर्ण करण्यासाठी धडपडणं, जिद्दीने मेहनत करून ते पुर्ण ही करणं यात एक आनंद असतो हे मला माहित आहे. पण कुठेतरी हे सगळं करताना आपण आपल्या आजुबाजुचे लोक, मित्र, सगे सोयरे एवढंच काय आयुष्यातले छोट्छोटे आनंद ही विसरून जातो. कित्येक दिवस झालं मी माझ्या जवळच्या मित्रांना फोन करुन अगदी मनमोकळं बोललो नाही, क्रिकेटची बॅट किंवा बॅडमिंटनचं रॅकेट हातात घेऊन खेळायला गेलो नाही, एखादा सिनेमा, नाटक किंवा गाण्याच्या मैफिलाचा प्रोग्राम पाहिलेला नाही. एवढंच काय कित्येक दिवस मी साधा रस्त्यावरुन स्वताच्याच तंद्रीत अगदी शांतपणे एकेक पाऊल टाकत साधा चाललो पण नाही. मी मिस करतोय... मित्रांबरोबर कट्यावर बसून निवांत मारलेल्या गप्पा, टेरेसवर झोपून मोजलेल्या चांदण्या, विमानांचा आवाज ए॑कून लहानपणी केलेला जल्लोष, रात्र रात्र बसून वाचलेली कादंबरी, आठवड्यात एकदाच लागणारा रविवारचा सिनेमा पाहण्यासाठी केलेली धडपड, गल्लीतलं क्रिकेट आणि चोरलेल्या कैरया, गोट्यांचा डाव आणि शाळेतली भांडणं, डब्यातला आईच्या हातचा मलिदा आणि सायकलीवरचं हुंदडणं, पहिलं प्रेम आणि आयुष्यातली पहिलीच कविता आणि असंच बरंच काही...मी खरंच हरवून बसलोय.माणुस पैसा आनंद मिळविण्यासाठी कमावतो की आनंद गमावण्यासाठी हा प्रश्न मग मला सतावू लागतो. सुख मिळवायचं असेन तर ते भोगायला ही शिकलं पाहिजे आणि ते भोगण्यासाठी समाधानी वूत्ती हवी. सुख आणि समाधान या दोन भिन्न गोष्टी आहे असं माझं ठाम मत. पण तरीही सुखी माणसं समाधानी असतात की समाधानी माणसं सुखी हा मला अजूनही न पेललेला प्रश्न...

-अजय

(...डायरीच्या पानांतून)

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

18 comments:

  1. छान झाली आहे पोस्ट....मलाही हा प्रश्न पडतो कधी कधी..पण मला आवडणारया छोट्या-छोट्या गोष्टीतुन आनंद मिळवायला आता शिकलो आहे...

    ReplyDelete
  2. अजय खूप छान लिहलय रे. . . स्वप्न , करीयर, यांच्या मागे धावताना स्वतः साठी जगायच राहून गेलय!!!

    ReplyDelete
  3. असं होतं खरं..!!
    यावरुन वपूर्झा मधला परिच्छेद आठवला.

    एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परिस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या उडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत.

    ReplyDelete
  4. अजय, ही धावपळच अशी आहे की स्वप्न पुर्ण झाल्यानंतर लगेचच आपण त्या यशाचा/गोष्टीचा अस्वाद घेण्याऐवजी दुसर्‍या स्वप्नाच्या मागे लागतो, मग सुख कशाचे आणि समाधान कशाचे ?

    ReplyDelete
  5. अजय छान लिहिल आहेस रे..

    ReplyDelete
  6. अजय मित्रा मस्त. तुझं लिखाणं नेहमी आवडत कारण हे विचार केवळ तुझ्याच नाही तर माझ्या आणि अश्या कित्येक लोकांच्या मनात असतात फरक इतकाच की ते फक्त तुझ्या मनातून ब्लॉगवर उतरतात.

    आणि हो समाधानी माणूस सुखी एवढं नक्की...

    ReplyDelete
  7. Sadhya tari.... Mazya kade aahet yatalya baryachasha goshti....!!! :)
    Pan he ase konitari jaaniv karun dilya shivay kalatach nahi ki aapan Samadhani aani mhanun sukhi aahot... Chotya chotya goshtincha baau karanyachi savay zaliye kadachit aani mhanun je aahe aamachya kade te disatach nahiye....

    ReplyDelete
  8. jabardast post ahe re ajay.

    Samadhani asava sukh apoap milel
    -Ganesh

    ReplyDelete
  9. Great Post Ajay!!
    I also face this dilemma! You have really expressed the thorny thoughts very nicely.

    ReplyDelete
  10. Great Post Ajay!!
    I also face this dilemma! You have really expressed the thorny thoughts very nicely.

    ReplyDelete
  11. अजय,
    खूप छान लिहिलयं... कदाचित आपल्यापैकीच प्रत्येक व्यक्ती जी यश, सुख अथवा समाधान समजून ज्या ऐहिक गोष्टींमागे पळत असते
    त्या प्रत्येकाच्या एकांत मनाला तुम्ही हात घातलाय....
    कधी कधी सुख हे कमवण्यापेक्षा मानण्यात असते.

    ReplyDelete
  12. अजय खूप मस्त लिहितोस तू आवडला आपल्याला एकदम झकास !!

    ReplyDelete