Friday, July 23, 2010

शुन्य

बरयाच वेळा असं होतं की आभाळ भरुन येतं, सोसाट्याचा वारा सुटतो, विजा कडाडतात, पावसाचे सुरुवातीचे चार थेंब पडतात आणि मातीचा सुगंध दरवळायला लागतो. पण एवढं होऊनही पाऊस मात्र येत नाही. काळे ढग न बरसताच तसेच पुढे निघून जातात. आपण त्या ढगांकडे सुक्या सुक्या नजरेने पहात बसतो. कोरडेच ढग ते, त्यांना ओलावा काय समजणार ? माझंही गेले काही दिवस त्या काळ्या ढगांसारखंच होत होतं. विचार डोक्यात भरून यायचे पण लिहिण्याची उर्मीच येत नव्हती. बरसल्याशिवाय मो़कळेपण नाही आणि बरसायला वातावरण साथ देत नाही. मी दर वेळेस असाच ब्लॉग उघडून न बरसताच निघून जायचो. कधी अगदीच खाली तर कधी थोडे फार शिंपडून. मी पण त्या पावसासारखाच, आला आला म्हणून वाट पहायला लावणारा. दोघेही...कधी सुके सुके आणि कधी बरसून ओले. आज मात्र तो बेभान होऊन बाहेर बरसतोय, काळ्या डांबरी रस्त्यावर उतरून तो नाचतोय, खाच-खळग्यात भरून तो ओसंडून वाहतोय, पानां-फुला-झाडावरती थेंब बनून पसरतोय. समोरचा तो डोंगरमाथा काल उघडाबंब होता, आज मात्र तो स्वताचं हिरवं रुपडं सगळ्यांना दाखवत फिरतोय. त्या पावसाचं पाहून मग मी ही ठरवलं की आपण ही आज असंच मनसोक्त, मनमुरादपणे बरसायचं, मनाच्या तंबोरयाच्या तारांना आज हलकंच छेडायचं, कानाच्या पडद्यांना थोडावेळं बंद करून जे काही सुर निघतील त्यांना अलगदच कागदावर उतरावयचंय, शब्दावाटे पसरायचं आणि एक विचार म्हणून रुजायचं. काल तो कुठेच नव्हता, आज मात्र सगळीकडे तोच तो आहे. माझंही असंच आहे, काल माझं काहीच अस्तित्व नव्हतं, आज सुद्धा अगदी ते नावालाच आहे पण असं जरी असलं तरी उद्याच्या दिवसावर फक्त माझंच नाव कोरायचंय. तळपणारया सुर्याला झेलताना धरणी फाटली तरी पावसाची वाट पाहताना ती कधी थकत नाही, ढग इथे येतात तेव्हा ते कधी हजारो मैलांचा विचार करत नाही, वाहणारी नदी कधी समोरच्या अडथळ्यांना घाबरत नाही, मग मी कशाला कुणाला घाबरू ? आव्हानांशिवाय आयुष्याला मजा नाही हे अगदी खरं. देवापुढे मी जेव्हा डोळे मिटून, हात जोडून उभा राहतो तेव्हा मी कधीच मला गाडी, बंगला, ए॑शोआराम असलं काहीच मागत नाही. माझं नेहमीचं एकच मागणं असतं आणि ते म्हणजे देवा मला दररोज नवनवीन आव्हानं दे. प्रगती जर साधायची असेन तर आव्हानांचा मुकाबला करण्याशिवाय पर्याय नाही. मला बाकी काही नको, तू मला फक्त दररोज एक शुन्य दे, त्यातून पुन्हा सगळं काही उभारायचं काम माझं. देवा, ए॑कतोयस ना तू ?

-अजय

(...डायरीच्या पानांतून)

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------