Monday, February 22, 2010

डायरीतला 'मी'

सुरुवातीला माझं लिखाण माझ्या शंभर पानांच्या डायरीपुरतंच मर्यादित असायचं. त्या डायरीमध्ये माझ्या दिवसभरातल्या घडलेल्या नोंदीपेक्षा मनात उठलेल्या तरंगांचंच प्रतिबिंब जास्त असायचं. आपण स्वतंच रुप जसं आरशासमोर तासनतास उभं राहून न्याहाळतो तसंच मग मी ही कधी वेळ मिळाला तर डायरीची पानं पाठीमागे नेऊन माझ्यातल्या हळव्या अशा 'मी' ला शोधायचो. एखाद्या क्षणी एखादी भावना आपल्यावर मात करते आणि मग आपण आपल्या मेंदूच न ए॑कता त्या भावनेच्या आहारी जाऊन ती सांगेन तशी प्रत्येक गोष्ट करतो. कधी ती भावना प्रेमाची असेन तर कधी रागाची. कधी मित्रत्वाची तर कधी सुडाची. जिथून मनाचा वावर सुरु होतो ना तिथेच मेंदूचं राज्य संपलेलं असतं आणि त्या हद्दीच्या पलीकडे आपण फक्त त्याच्याच तालावर नाचत असतो. मी सुद्धा असाच मेंदू आणि मन दोन्ही असलेला एक सामान्य माणूस. मनाचं आणि मेंदूच द्वंद्व मी सुद्धा बराच वेळा अनुभवलंय. असे अनेक द्वंद्व, अशी अनेक वादळं या डायरीच्या पानामध्येच शांत झाली. माझ्यातल्या घोंघावणारया वादळाला शमविण्याची ताकद या काळ्या पांढरया पानांमध्येच आहे. ऑफीसमधल्या कटकटी, नोकरीमधले चढ-उतार, नात्यामधली गुंतागुंत आणि स्वताची तत्त्व अशा प्रत्येक विषयावर मी या डायरीशी बोललो. कधी कुठल्या ट्रेकमधला थरार तर कधी कुठल्या पिकनीकमधल्या गमतीजमती, शिकलेला नवीन विषय तर फसलेली युक्ती मी माझ्या डायरीशी शेअर केली. तिने माझा रागही सहन केला आणि प्रेमसुद्धा अनुभवलं. थकून भागून घरी परतल्यावर चार ओळी काहीतरी नवीन लिहून नवनिर्मीतीचं वेडही तिनेचं लावलं. आयुष्यात प्रत्येकजणच धडपडतो पण अगतिक झाल्यावर उठून उभं राहण्यासाठी मला पुन्हा उद्दुक्त ही तिनेच केलं. मी तसा थोडा अबोलच, पण माझ्या मुखातुन श्रवणीय बोल बोलण्यास भाग मला या डायरीनेच पाडलं. डायरीने मला सुरुवातीला विचार करायला आणि नंतर मांडलेला विचार स्वतामध्ये रुजवायला शिकवलं. मला घडवलं ते माझ्या आई वडीलांनी आणि त्यांच्या संस्काराने पण मला अंर्तबाह्य बदलवून टाकलं ते फक्त माझ्या डायरीनेच. माझ्यामधल्या अनुभवाला आणि आत्मविश्वासाला जर कशामुळे बळ प्राप्त झालं असेन तर ते फक्त त्या दररोज डायरीमध्ये लिहण्याच्या सवयीमुळेच. या डायरीच्या प्रत्येक पानामध्ये मी कालची ढळलेली संध्याकाळ आणि उद्याची येणारी पहाट पाहतो. दमलेल्या जीवाला औट घटकाभर विश्रांतीसाठी मी या डायरीचाच आधार घेतो. हरवलेल्या अस्तित्वाला जपण्याचं काम मी या डायरीतच करतो. मला या डायरीच्या प्रत्येक पानावर माझं स्वताचं विश्व तयार करत जायचंय, पानाचा कोपरा न कोपरा मला माझ्या अस्तित्वाने भिजवून टाकायचाय म्हणूनच समासंच बंधन मी डायरीत पाळत नाही. जळते ती वात, पण प्रकाश देणारा कोण असं म्हटलं तर नाव मात्र दिव्याचं घेतलं जातं. माझ्या डायरीचंही असंच आहे, उजेड माझा पडला तरी कण कण जळणारी ती माझी डायरीच आहे !

(...डायरीच्या पानांतून)


-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

Monday, February 8, 2010

परीस की सोनं

आई सोडून सर्वात पहिल्यांदा जर मी कुठल्या स्त्रीकडे स्वताहून आकर्षित झालो असेन तर त्या म्हणजे माझ्या तिसरी इयत्तेतल्या बाई. तेव्हा माझं वय ते काय होतं फक्त ८ वर्षे. ते प्रेम नव्हतच मुळी ते होतं फक्त एक आकर्षण. प्रेम वगैरे समजायचं माझं तेव्हा वय ही नव्हतं. मला मात्र त्या बाई फार आवडायच्या. मला अजून ही आठवतंय त्यांच्या पिरीयडला मी अगदी मन लावून वर्गात बसत असे. त्यांचं एकेनएक वाक्य मी कानात साठवून ठेवत असे. त्यांच्या पुढे मागे करणं, पिरीयड संपल्यावर त्यांच्या मागे मागे जाऊन त्यांना उगाचच प्रश्न विचारण, त्यांनी दिलेला अभ्यास वेळेवर पुर्ण करण, त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मन लावून करणं असे सगळे प्रकार मी त्यावेळी केले होते. अजुनही, खुप वेळा अगदी डोक्याला ताण देऊनही मला त्यांचा चेहरा आठवत नाही. आठवतं ते त्यांचे मंजुळ बोलणं, त्यांची ती शिकविण्याची पद्धत आणि त्यांचं ते प्रेमानं समजवून सांगणं. म्हणजेच मला त्यांच्या चेहरयाने कधीच भुरळ घातली नव्हती, त्यांच्या वागण्या बोलण्यानेच मला खूप इम्प्रेस केलं होतं. त्यामुळेच 'लव्ह अ‍ॅट फस्ट साईट' वर माझा कधीच विश्वास नाही. एका नजरेत जे होतं ते खरंच प्रेम असू शकतं का ? प्रेम निर्माण होण्यासाठी सहवासाची आवश्यकता नसते का ? आकर्षण आणि प्रेम या दोन तरल भावनांना वेगळं करणारी अजून एक अशीच भावना असते आणि तिला 'ओढ लागणे' असं म्हणतात. काही लोक या ओढीलाच प्रेम समजतात. माझ्या मते आकर्षणाचं रुपांतर अगोदर ओढीत आणि मग सहवास लाभल्यावर प्रेमात होतं.

या जगात देवाने सर्वात सुंदर अशी कुठली गोष्ट बनवली असेन तर ती म्हणजे 'स्त्री', 'नारी'. या माझ्या विधानावर समस्त पुरुषमंडळी एकसाथ हात वर करुन मला अनुमोदन देतील यात शंकाच नाही. स्त्री म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्य म्हणजेच स्त्री असं आतापर्यंतच समाजात रुळलेलं समीकरण. पण एखादी स्त्री जेव्हा तुम्हाला आकर्षित करते तेव्हा तिचं शरीर, तिचा चेहरा यापेक्षा अजून काही गोष्टी तुमच्या मनात नक्कीच घर करून बसतात. माणुस हा समोरच्याचा शरीराबरोबर जगतो की विचारांबरोबर ? समोरच्याचं शरीर त्याला आकूष्ट करतं की त्याची विचारसरणी, त्याचा स्वभाव ? चेहरयाबरोबर जगणारे मला माहीत नाही, मी विचारांबरोबर जगतो. ज्याचे विचार सडलेले आहेत त्याचं शरीर कितीही टवटवीत असला तरी काय फायदा ? कडुलिंब कितीही कडु असला तरी तो गुणकारी असतो, कोकीळ कितीही काळी असली तरी तिचा गोड गळाच लोकांना वेड लावतो, चकाकणारं सोनं प्रत्येकानेच पाहिलय पण परीस कसा दिसतो हे अजून कुणालाच माहित नाही. तरी पण त्याच्या अंगी असलेल्या गुणधर्मामुळेच तो सगळ्या जगात ओळखला जातोच ना. माणसाच्या अंगी असलेल्या कलागुणांमुळेच तो ओळखला जातो, ना की त्याच्या बाहयरुपावरुन. समोरच्याला नीट ओ़ळखायचं असेन तर त्याच्या बाह्यररुपावर जाऊच नये, त्याच्या चेहरयामागचा रंग पहावा. उगाचच संत म्हणून गेले का "का रे भुललासी वरलीया रंगा...". अंगभर घालून मिरवायचं असेन तर सोनं घ्यावं आणि आपलं आयुष्यच बदलून टाकायचं असेल तर परीस जवळ बाळगावा. शेवटी चॉईस तुमची, तुम्हाला काय हवंय परीस की सोनं ?

-अजय

Tuesday, February 2, 2010

२ फेब्रुवारी

कालपासून पोटात फक्त मोसंबी ज्युस, एक कप कॉफी, नाना तह्रेचे प्रश्न व एक हुरहुर यांचंच वास्तव्य होतं. अजूनही त्या उपवासाचा शेवट झालेला नाही. आजचा दिवस हा बराच संमीश्र भावनांनी भरलेला होता. सकाळी पाच पासून मी अगदी आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कुणा ना कुणाशी बोलत होतो. लोकांना उत्तर द्यायची जबाबदारी नेहमी माझ्यावरच का येते ? मी खुप सारं खरं बोलतो हा माझा गुण की वैगुण्य ? पुरुषाला मन, भावना नसतात असं लोकांना का वाटतं ? मनाच्या कुठल्यातरी कोपरयात दडून बसलेले असले प्रश्न मग माझ्या मनाच्या पूष्ठभागावर येऊन हातात हात घालून नाचायला लागतात. मी ही त्यांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाही. काही गोष्टी अनुतरीत्तरच राहिलेल्या चांगल्या, उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यावरच किंवा सापडल्यावरच जास्त त्रास होतो असा माझा अनुभव. या जगात सर्वात मोठं जर कुठलं दु:ख असेन तर ते अपेक्षाभंगाच हे मी कुठतरी वाचलं होतं. पण त्यापेक्षाही जास्त मोठं दु:ख हे सदभावनेने केलेल्या कामावर, घेतलेल्या निर्णयावर शंका घेतली जावी (वपुंनी म्हटल्याप्रमाणे) हेच आहे असं आज वाटून गेलं. समोरच लोक असे चटकन बदलताना, त्यांचे स्वभाव इतक्या लवकर बदलताना पाहिल्यावर मी विश्वास ठेवलेला तो हाच का असं कुठंतरी वाटू लागतं. मी मात्र समोरच्यावरचा माझा विश्वास मात्र कधीच डळमळीत होऊ दिला नाही. ज्याला जीव लावला त्याला शेवटपर्यंत जीवच लावेन, ज्याच्यावर विश्वास ठेवला तेवढाच विश्वास कायम ठेवेन. म्हणूनच मला पराभूत होण्यापेक्षा हतबल होण्याचीच जास्त भीती वाटते. पराभव जिव्हारी लागतो आणि हतबलता माणसाला निराश करते. पराभव जिव्हारी लागलेला चांगला,माणूस जिंकण्यासाठी पुन्हा तयारीला तरी लागतो. पण हतबलता नैराश्य आणते. आणि आज मी असाच हतबल आहे.

(...डायरीच्या पानांतून)

-अजय