Wednesday, January 27, 2010

संध्या

मला संध्याकाळची वेळ तशी फारशी आवडत नाही. सुर्य अस्ताला जात असतो, पक्ष्यांनी त्यांचे घरट्याचे रस्ते पकडलेले असतात आणि रातकिडेही आपल्या कामाला लागले असतात. सुर्याच्या कलण्याने आसमंतात एक विचीत्र पोकळी निर्माण झालेली असते. दुपारी माती उधळून लावणारा वारा ही आता गपगार होऊन कुठेतरी दूर निघून गेला. चंद्रही आता सुर्य जाण्याची चाहूल घेत आकाशात स्वताच रुप दाखवू लागलाय. अशा वेळेस मी जेव्हा दोन घटका म्हणून उशीवर डोकं टेकवतो तेव्हाच माझ मन शांत होण्याच्याए॑वजी सैरभैर होतं. एक वणवा पेटतो उभ्या मनात आणि जाळायला उठतो मला. ज्या वेळी मी माझ्या मनाला विझवायचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस तो जीव खाऊन मला पेटवायचा प्रयत्न करतो. त्याचा हट्ट मला जाळण्याचा आणि माझा स्वताला जळू न देण्याचा. तो ज्वाला बनून पसरतोय आणि मी पाणी बनून त्याला आवरतोय. त्याचा आणि माझा पाठशिवणीचा खेळ असा दररोज सुरु असतो. कधी तो जिंकतो तर कधी मी. दुसरयाची राख करणं याला तो जिंकणं समजतो आणि जिंकणं म्हणजे राखेतून पुन्हा उभं राहणं असं मी म्हणतो. दोघांच्या व्याख्या वेगळ्या, दोघांचे उद्देशही वेगळे. त्याने त्याचं काम कराव आणि माझं मला करु द्यावं.

खरंच सांगतो, आपलं आयुष्य किती तरी खास आहे. मी तर आपल्या आयुष्याला एक मोठा ५५ वर्षाचा सिनेमाच म्हणतो. कॅरॅक्टर नवनवीन येतच असतात एकापाठोपाठ एक. दररोज काही तरी घडतच असतं. काही आपण चटकन विसरुन जातो तर काही काही मात्र मनात घर करुन बसतं अगदी ढेकळात पावसाचा थेंब रुतुन बसल्यासारखं. हीच ती संध्या ज्या वेळी माझ्या डोळ्यापुढुन माझ्याच आयुष्यातले कित्येक प्रसंग असे अचानकच तरळतात. एक आख्खाच चलचित्र कधीतरी डोळ्यापुढुन झर्रदिशी जातो. त्या मध्ये सगळ्या जपून ठेवलेल्या आठवणीच असतील असं ही काही नाही. काही न जुळलेल्या न पटलेल्या किंवा विसरुन जाण्यासारख्या पण असतात. एकेक क्षण मी जपलेला समोर पाहताना मी पुन्हा भूतकाळात जातो. जे माझं आहे फक्त माझंच असं ते एक छोटंस भावविश्व मी अगदी दोन मिनीटात पुन्हा तयार करतो. जे आयुष्य मी अगोदरच उपभोगलंय त्याची पुन्हा एकदा चव चाखतो. जे हरवलंय ते पुन्हा डुबक्या मारत शोधतो. जे गवसलंय ते पुन्हा एकदा घासुन पाहतो. दुखरे-हळवे असे कोपरे मी दुरुनच बघतो. थोड्याच वेळात मी मग तल्लीन होऊन जातो. माझं या विश्वाहूनही वेगळं असं विश्व आहे हेच मी मुळी तेव्हा विसरतो. माझ्या जगण्याला जो खरा अर्थ मिळतो तो या अशा समांतर जगण्यामुळेच. चालु आयुष्यात, या विश्वात कितीही वणवे पेटले तरी मला त्याची फिकीर नाही कारण माझ्या हाताने सजविलेलं ते विश्व संपूर्ण माझंच आहे, तिथे वणव्याला स्थान नाही आणि विझण्याची मला तमा नाही.

(...डायरीच्या पानांतून)

-अजय

Monday, January 18, 2010

काटकोन

"उठा आता. झोपायला काय वेळ काळ असतो की नाही. पाहूणे येतील आता, निदान त्यांच्यासाठी तरी थोडी आवराआवर कर.", मातोश्री.

डोक्यावरची उशी काढून, तोंड वासून मी आळस दिला आणि गेले ३ तास तोंडात अडकून पडलेल्या सहस्त्र कीटाणूंचा या जगातला प्रवेश निश्चीत केला. डोळे किलकिले करून दिशांचा अंदाज घेतला. झोपण्यापूर्वी माझ्या डाव्या बाजूला असलेली खिडकी आता उजव्या बाजुला कशी आली, अंगावरची चादर खाली का वर सरकली, बेडशीटने गादीची साथ सोडून कडेलोट कसा केला आणि माझी लाडकी बिप्स आजही स्वप्नात कशी नाही आली या नेहमी पडणारया प्रश्राचं ओझं घेऊन मी उशीवरून मान वर केली. समोर आई ब्लॅक अ‍ॅड व्हाईट मध्ये आई काहीतरी बोलताना दिसत होती.

"आवराआवर कशासाठी आई. त्यांच्याघरी काय पसारा नसतो का गं. आणि एवढं सारं आवरल्यानंतर परत हे पुर्वीच्या जागेवर ठेवण्यासाठी मला किती त्रास होईन. माझी रुम कशाला कोण पहायला येतंय आणि आले तर आले. आय डोन्ट केअर".

मी माझं सारं काही १५ मिनीटांत आवरून खाली जातो.

"अरे इस्त्री का नाही केला शर्ट ला मागून ? "
"अगं टेकल्यावर तसाही चुरगळतोच ना !"
"आणि पुढूनही का नाही केलास ? "
"इनशर्ट करणार आहे म्हणजे दडला जाणार ना तो भाग :-)"
"आणि हो बाह्या दुमडणार आहे म्हणून बाह्या सुद्धा नाही केल्या आणि पॅन्टची मागची बाजूही नाही केली कारण ती बसल्यावर चुरगळतेच. मला नाही आवडत असं कडक राहणं. मी आहेच असा विस्कटलेला, चुरगळलेला."

असं सगळं कसं पद्धतशीरपणे करणं आपल्याला नाही बुवा जमत. सगळं कसं अगदी नीटनेटकं, कडक, करकरीत, नियमाला धरून. मी भानगडीत नाही पडत असल्या साचेबद्ध जगण्याच्या. आपल्याला तर प्रश्नच पडतो की लोक एवढं सारं साचेबद्ध आयुष्य कसं जगतात. यांचे नियम सुद्धा सुरु होतात अगदी भल्या पहाटेपासुनच, पहाटे ५.५ लाच उठणं, व्यायाम करणं, मग काहीतरी वाचन, मग १० मिनीटांत आंघोळ, मग एक सफरचंद, त्याच्याबरोबर कारल्याचा ज्युस, दोन ब्रेड, त्याला लावलेला बटर-जाम. सगळं कसं काटेकोर, नियमांत बसविल्यासारखं, एकदम शॉलीड अ‍ॅक्युरेट. झोप ६ तास, ऑफीस ८ तास, व्यायाम १ तास. रेष आखल्यासारखं लोक आयुष्य जगतात. नाही म्हणजे नाही, मुळीच जमणार नाही मला असलं काही. त्यामुळेच मला भूमिती हा विषयही कधीच नाही आवडला. लाईन या शब्दाला मी मुली वगळता बाकी कुठल्याही प्रांतात आणायचा प्रयत्न नाही केला. पोरींवरही लाईन मारली ती पण आडवी तिडवीच. प्लॅनींग वगैरे करण्याच्या बाबतीत त्या मुळेच मी कच्चा. लग्न केलं तर ते ४.३७ मि, पाहुणे बोलावले तर मोजून ५०० चं, आहेर दिला तर मोजून १०१, हनीमून केला तर तो पण ६ दिवस आणि ७ रात्रच, मुलं जन्माला घातली तर ती पण समान अंतरानेच, नावंही ठेवली तरी एकाच अक्षरावरून किंवा एकाच सुरातली. माझ्या ओळखीच्या एकाच्या मुलींची नावं आहे शर्मिष्ठा,उर्मिष्ठा आणि कनिष्ठा. बरं झालं चौथी नाही झाली नाही तर मंगलाष्ठाकाच होती. मंगलाष्ठाका मध्ये 'ष्टा' नाही तो 'ष्ठा' आहे. 'ष्ठा' चा उच्चार म्हणजे जीभ सरळ पुढे नेऊन, तोंड वासून, 'ष' साठी तोंडातून हवा सोडणं, सगळं कसं एकापाठोपाठ एक. मुलाची जन्मवेळ सुद्धा लोक मिलीसेकंदा मध्ये मोजतात. हा आता डोकं बाहेर आलं..आता एक हात..एक पाय. हा आताच्या ह्या मिलीसेकंदाची वेळ म्हणजे याची जन्मवेळ , सकाळचे ९.१२.३०.२५६. बोललं तर ते पण जीभ टाळ्याला न लागता मोजूनमापूनच बोलणं. त्यात एकदा दोनदाच हसणं, हसणं सुद्धा असं की दाताचं आणि गालावरच्या खळीच दर्शन दुर्मिळ व्हावं. चहा घेतला तर तो पण अर्धा कपच...तो पण कपानेच पिणं. बशी आपली कपाच्या बुडाला लावायला फक्त. जेवलंच तर ते पण कॅलरीज पाहून. जेवणातही अर्धी वाटी भात, १ वाटी डाळ, भाजी आणि २ चपाती, पापड, डाव्या बाजूला लोणचं आणि उजव्या बाजूला मीठ, बाजूला ठेवलेला तांब्या, त्याच्यावर ठेवलेला पेला. जेवताना पापड खाताना आवाज न येण्याची घेतलेली काळजी. अहो एवढंच काय संडासला बसल्यावर सुद्धा 'आवाज' येणार नाही म्हणून सोडलेला फ्लश. मनमोकळेपणाने लोक काहीच का बरं करत नाहीत ? एवढं कसं काय लोक मन मारुन, नियमातच जगतात अगदी काटकोनासारखं, ९० अंशाच्या कोनातच वळणारं !

त्याच्यामुळेच मला सरळ रस्त्यापेक्षा वळणावळणाचे, घाटातले नाहीतर नदीच्याच कडेकडेचे रस्ते आवडतात, त्यांना माहीत नसते रेघ. अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो तो वड, सगळीकडे उभा आडवा पसरलेला आणि पारंब्याने भरलेला. एका रेषेतच जाणारया सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो तो वारा, मन वाटेल ति़कडे पळणारा, भिरभरणारा. सरळ पडणारया पडणारया पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेन तिथे वळणारी, डोंगरावरुन खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते.
माझं आयुष्यही मला असंच जगायच. उधळलं तर उधळून द्यायचय, बेभान होऊन जसं ते नेईन तस मला त्याच्याबरोबर जायचंय, अगदी मोकाट, सुसाट, बेधुंद होऊनच !

-अजय

Monday, January 11, 2010

संवाद म्हणजे...

माणसाचा चेहरा बरयाच वेळेला खुप काही सांगून जातो. कोण म्हणतं की संवाद फक्त बोलूनचं साधता येतो. बोलके डोळे, बोलका चेहरा एवढंच काय स्पर्श ही सारी संवादाचीच तर माध्यमं आहेत. ज्या गोष्टी शब्दांद्वारे पुढच्याला सांगता येत नाहीत त्या चेहरयावाटे कुठेतरी बोलून जातात. चेहरयावरची एखादी सू़क्ष्म छ्टासुद्धा एखाद्याच्या मनातला काय चाललाय हे सांगते. संवाद साधणं ही एक कला आहे असं लोक म्हणतात, मी मात्र याच्याकडे एक अनुभव म्हणूनच पाहतो. आयुष्यभर घेतच रहावा असा अनुभव. प्रभावी संवाद साधणं याला मी कला म्हणेन. नुसतंच भारमभार बोलणं म्हणजे संवाद नाही. आपलं म्हणण दुसरयाच्या मनाला जाऊन थेट भिडणं आणि समोरच्याला अजुन काही ए॑कण्यासाठी आतुर करणं म्हणजे संवाद. संवाद म्हणजे फुलणं, संवाद म्हणजे मोहरणं आणि संवाद म्हणजेच विरघळणं !

मी जेव्हा कधी एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलतो तेव्हा माझा पहिला प्रयत्न हाच असतो की ते बोलणं म्हणजे एक सहजसुंदर साधलेला संवादच ठरेन. बोलून बोलायचंच आहे तर गोडच बोलावं ना मग. आपलं आयुष्य ते किती इन मिन ५० वर्षे. त्यातली निम्मी तर गेली. मग इथून पुढचा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक शेवटचा दिवस आहे असं मानून मी प्रत्येकाशी अगदी मनमो़कळेपणाने बोलण्याचा, थोडक्यात संवाद साधण्याचाच प्रयत्न करतो. एखाद्याच्या मनातलं ओळखणं कुणाला कधीच शक्य नसतं. पण निरीक्षण करुन अंदाज बांधणं सहज शक्य आहे. माझ्याशी बोलायला एखादा जण समोर बसला की मी माझी सारी हत्यारं काढून माझं काम सुरु करतो. समोरच्याचे सगळे हावभाव टिपण्यापासून ते बोलताना त्याच्या शरीराची होणारी हालचाल या सारया गोष्टी मी माझ्या मेंदूत अगदी साठवून ठेवतो. समोरच्याच्या विश्वात मग माझी त्याच्या नकळतच एन्ट्री होते. तो माझ्याशी जेव्हा बोलत असतो तेव्हा मी त्याच्या चेहरयामागच्या चेहरयाशी खेळत असतो. तो चेहराच मला जाणून घ्यायचा असतो. एकाचवेळेस असे कित्येक 'मी' तयार होतात आणि समोरच्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात डोकावत राहतात. संवाद साधताना या सारया गोष्टी कराव्याच असं नाही पण समोरच्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला कुतुहल असेन तर तुम्ही हे सारं नकळत करता आणि माझं कुतुहल प्रत्येक चेहरयासाठी जागं होऊन मला हे करायला लावतं.

काल अशाच काही नवीनच भेटत असलेल्या लोकांशी बोलत असताना माझ्या मनात उमटलेल्या तरंगांना कागदावर उमटण्याचा केलेला हा एक प्रयत्न. समोरच्याला व्यक्ती आपल्यात हरवून जाण्यासाठी अगोदर तुम्हाला त्याच्या विश्वात हरवून जावं लागतं. अशा कित्येक व्यकतींमध्ये जेव्हा तुम्ही हरवून जाता, छोट्याशा का होईना पण त्या दोन मिनीटांच्या संभाषणामध्ये जेव्हा तुम्ही त्यांचं आयुष्य जगता तेव्हाच संवाद हा एक अनुभव आहे असं मी का म्हटलो ते समजेन.

(...डायरीच्या पानांतून)

-(निशब्द!) अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
. च्या आयला
. फुंकर
. मी आणि माझी फिल्लमबाजी
. मी 'पुरुष' बोलतोय !

---------------------------------------------------------------------------------

Thursday, January 7, 2010

....

शिकण्याची वूत्ती जर तुमच्यात असेन तर या जगातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही ना काही तरी शिकवते. लहान मुलाकडून निरागसता तर आईकडुन माया शिकावी. समुद्राची विशालता तर किनारयाची झेलण्याची ताकद पहावी. मग मला प्रश्न पडतो की एखाद्या मुलीकडून काय शिकावं ? आपल्या मनाचा ठाव समोरच्याला लागू न देणं ही एक कला मुलींकडून शिकली पाहीजे. मनात हो असतानाही तोंडात 'ना','नाही','नको ना' पासुन सुरु झालेली गाडी 'आता नको','कुणी बघेन ना' चा स्टॉप घेत 'इश्य','हम्मम','मी नाही जा' पर्यंत कधी व कशी येते ते पुढच्यालाही समजत नाही. पुढचा मात्र आपला 'मी मैदान मारलं' अशा उत्साहात असतो.

"मी बा़कीच्यांसाठी खुप काही करते पण माझ्यासाठी कुणीच काही करत नाही" हे वाक्य जगातली प्रत्येक स्त्री कधी ना कधी तरी म्हणतेच. 'दुसरयासाठी खुप काही करणं' ही भावनाच मुळी निस्वार्थी असावी, त्यातही जर तुम्ही अपेक्षा ठेवत असाल तर स्वार्थीपणाची सुरुवात तुम्हीच करता. मग दुसरयाने जर तो स्वार्थ थोडाफार जोपासला तर वाईट का वाटायला हवं ?

स्त्री व पुरुषांमधला एक मुख्य फरक म्हणजे म्हणजे स्त्री ही 'मनाने' विचार करते आणि पुरुष हा 'तनाने' विचार करतो. दचकू नका पण हे खरं आहे. या जगातला प्रत्येक नर हा थोडाफार का होईना असाच आहे. कोंबडीला कधी कोंबड्याच्या पाठी पळताना कुणी पाहीलं आहे का? नेहमी आपला कोंबडाच एक पाय ताणून कोंबडीभोवती फेरे मारत असतो. दोघेही भिन्न आहेत म्हणूनच दोघांच्यातलं आकर्षण टिकून आहे.

या जगात समजण्यास अवघड असा कुठला विषय असेन तर तो म्हणजे ' माणूस'. समोरची व्यक्ती एखाद्या क्षणी कशी वागेन याचा उलगडा करणं किंवा अंदाज बांधण हे एक अवघडच काम आहे. त्यात जर ती व्यक्ती स्त्री असेन तर अंदाज बांधण्याची काठीण्य पात़ळी अधीकच वाढते. त्यामुळेच बायकांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणं प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असावं.

-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
. यंदा कर्तव्य आहे ?
. फुंकर
३. मी आणि माझी फिल्लमबाजी
४. मी 'पुरुष' बोलतोय !

---------------------------------------------------------------------------------

Tuesday, January 5, 2010

खेळ मांडला

पिंजरा नंतर बरेच दिवसानंतर एक चांगला तमाशाप्रधान सिनेमा पाहिल्याचा आनंद मला झाला जेव्हा मी 'नटरंग' मध्ये न्हाऊन निघालो. कदाचीत हा आतापर्यंत पाहिलेला मी असा एकमेव मराठी सिनेमा आहे जो शेवटच्या सेकंदापर्यंत लोक पहात होते. सिनेमा संपला, सारे जण जायला निघाले आणि तितक्यात समोर 'नटरंग'च गाणं सुरु झालं. गाणं पुढं सरकत गेलं, स्क्रीन वर गणपत पाटील ( ते गणपत पाटीलच असावेत असा माझा अंदाज) आणि त्यांचा जीवनपट उलगडणारे प्रसंग फोटोजच्या रुपात स्क्रीन वर आले. लोक क्षणभर जिथे आहेत तिथेच उभे राहीले. चित्रपटाचा प्रभाव लोकांच्यावर एवढा होता की चित्रपट संपूनही लोक पहात उभे होते. शेवटचं नाव पडलं आणि लोकांनी उत्स्फुर्त टाळ्या वाजवल्या. नटरंग च्या टीमला चित्रपट आवडल्याची याच्याहून मोठी पावती दुसरी कुठली असू शकेल ?

नटरंगाची सुरुवातच जेव्हा 'मला जाऊ द्या ना घरी..आता वाजले की बारा.." या लावणी ने झाली तेव्हाच समजलं की हा कुठल्या वळणावरचा सिनेमा आहे.

" ए.. कशापाई छळता..मागं मागं फिरता..असं काय करता..दाजी ही ला भेटा की येत्या बाजारी..
ए.. सहा ची बी गाडी गेली नवाचीबी गेली आता बाराची गाडी निघाली...
ही ला जाऊ द्या ना घरी ...आता वाजले की बारा.."

ही लावणी एवढी सुंदर रचलेली आहे की ती ए॑कताना मला उगाचच फेटा नसतानासुद्धा फेटा वर उडवायची इच्छा झाली होती. गुणा कागलकर (अतुल कुलकर्णी) जो शरीराने पैलवान पण खरा कलावंत असतो. परिस्थीतीमुळे तो आणि त्याचे सोबती तमाशा काढायचं ठरवतात. तमाशामध्ये बाई हवी म्हणुन नैना नैना कोल्हापुरकरीण ( सोनाली कु. ) ची एंन्ट्री होते. तिच्या एंन्ट्रीच्या डान्सवर 'आयच्यान' मी फिदाच झालो. पण तिची एक अट असते ती म्हणजे तमाशामध्ये नाच्या हवाच. जेव्हा ­कुणीच नाच्या म्हणून काम करायला तयार होत नाही तेव्हा गुणावर ही जबाबदारी टाकली जाते आणि मग सुरु होतो त्या कलावंताचा संघर्ष. इथुन पुढे या सिनेमाची कथा हळुहळु उलगडत गेली आणि लोक त्यात गुंतत गेले. सिनेमाची दमदार कथा, दिग्दर्शकाची त्याच्यावरची जबरदस्त पकड, गुरु ठाकूर चे संवाद व गाणी, दमदार अभिनय आणि अजय अतुलचं अफलातुन संगीत. अतुल कुलकर्णी ने जी मेहनत घेतली आहे त्याला सांगण्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. अतुल बरोबरच किशोर शिंदे ही खुप भाव खाऊन जातो. नुसत्या संगीताने हा चित्रपट वेगवान झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 'अप्सरा आली' आणि 'नटरंग' ही दोन्ही गाणी जबरदस्त आहेत. 'खेळ मांडला' जेव्हा चालू होतं तेव्हा प्रत्येकाच्याच डोळ्यातुन पाणी येतं.

" करपलं रान देवा जळलं शिवार तरी नाही धीर सांडला...खेळ मांडला
खेळ मांडला....देवा....खेळ मांडला...."

नटरंगाची गाणी गेले काही दिवस मी दररोज ए॑कत आहे पण माझं अजून कान तूप्त झाले नाहीत. पुन्हा पुन्हा ही सारी गाणी ए॑कावीशी वाटतात.

असा हा नटरंगाचा खेळ पुन्हा पुन्हा जाऊन पहावा असाच आहे, काही प्रसंग अगदी डोळ्यांत आयुष्यभरासाठी साठवून ठेवावेत असेच आहेत, कदाचीत म्हणूनच मी तरी या बारी ला पुन्हा एकदा जाणार आहे.


-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. फुंकर
३. मी आणि माझी फिल्लमबाजी
४. मी 'पुरुष' बोलतोय !

---------------------------------------------------------------------------------

Monday, January 4, 2010

धन्यवाद

चार गोष्टी चा एवढा प्रभाव आणि तो पण एवढ्या लवकर होईन असं मला वाटलंच नव्हतं पण आज जेव्हा मी माझं इनबॉक्स उघडलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. बेधुंद ब्लॉग आवडल्याची कमीत कमी २५-३० इमेल माझ्या इनबॉक्स मध्ये होती. ब्लॉगवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा इमेल लिहीणंच बरयाच जणांनी पसंद केलं. काही लोकांना यंदा कर्तव्य आहे तर काहींना मी आणि माझी फिल्लमबाजी हे लेख आवडले. काहींना फुंकर ने हळवं केलं तर काहींना च्या आयला ने खुप हसवलं. मला असे इमेल अधूनमधून येतच असतात पण गेले दिवसांतले आलेले इमेल पाहता असं दिसून येतंय की मागच्या काही दिवसांत ट्रॅफीक जास्तच वाढलय. इमेल पाठविणारया मध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे ही एक आनंदाची गोष्ट. अशा या मुलींच प्रेम (?) उत्तरोत्तर वाढत जावो हीच अपेक्षा :-). भारताबाहेर राहणारे लोकांचे मराठी ब्लॉगवर जरा जास्त प्रेम आहे एक छोटंसं निरीक्षण. अचानक एवढे मेल पाहून मला खरं तर आनंदच वाटला पण त्यापेक्षा जास्त मी एका जबाबदारीने झुकला गेलो. इथुन पुढे ही असेच लेख/विचार/भावना मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन.

आपल्या प्रतिक्रियांबद्दल खुप खुप धन्यवाद !!!

-अजय