Wednesday, November 25, 2009

मराठीतच बोला...

आजकाल जिकडे जाऊ तिकडे मराठी मराठी चा गजर ए॑कु येत आहे. अशीच एक ऑडीओ क्लिप इथे ए॑कायला देत आहे. विचार करायला लावणारी ही क्लिप आहे. जरुर ए॑का.
-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. ब्राईड-हंट
२. मी 'पुरुष' बोलतोय !
३. यंदा कर्तव्य आहे ?
४. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
---------------------------------------------------------------------------------

Thursday, November 19, 2009

मी 'पुरुष' बोलतोय !

दचकलात ना ? विचार करत असाल की आज अचानक पुरुष कसा काय बोलायला लागला आणि नेमकी त्याला अशी बोलायची का गरज पडली. सांगतो...आज १९ नोव्हेंबर, जागतिक पुरुष दिन. कित्येक जणांना तर आज पुरुष दिन आहे हेच मुळी माहित नसेन. पुरुषप्रधान असं म्हणवल्या गेलेल्या समाजात जेव्हा फक्त स्त्री दिनच साजरा व्हायला लागला तेव्हाच मला जाणवलं की मला आता बोललचं पाहिजे. मी इथे माझ्या न्याय, हक्क, अधिकार अशा कुठल्याही गोष्टी संबंधीच भाष्य करायला आलेलो नाही. फक्त पुरुषांच्या चार मनातल्या गोष्टी तुम्हा सर्वांना समजाव्यात म्हणुनच मला वाटलं की आज मला माझी कैफियत मांडलीच पाहिजे.

तुमच्या आजुबाजुला तुम्ही मला अनेक रुपात पहात असता. कधी बाप, कधी मुलगा, कधी नवरा तर कधी भाऊ. माझा जन्मच मुळी असतो ते जबाबदारी पार पाडण्यासाठी. प्रत्येक रुपामध्ये मला माझ्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडावी लागते. अगदी लहानपणापासुनच माझ्या मनावर बिंबवल गेलं की तुला भरपुर अभ्यास करायचाय, अभ्यास करुन मोठं व्हायचंय. मोठं होणं म्हणजे दाढी-मिश्या येणं हेच त्याला ज्या वयात समजत असतं त्यावेळेस त्याच्यावर करिअर चा ताण येतो. करिअर, पैसा हेच आपल उद्दिष्ट आहे आणि ते जर असेन तर बाकी काही ही मिळवता येत हे माझ्या मनावर बिंबवल जात आणि एवढ्या लहान वयापासुनच मग सुरु होतो संघर्ष.. जगण्यासाठी आणि आपल्या वर अवलंबुन असणारया लोकांना जगविण्यासाठी.

जसा जसा मी मोठा होतो तसा माझ्यावरच्या जबाबदारीची मला जाणीव करुन दिली जाते. करिअर, पैसा या गोष्टी सर्वस्व आहेत आणि ते कमावताना मी स्वत:चे छंद, आवडी निवडी हे सुद्धा विसरुन जातो. पुरूषाने बाहेरची कामे करावीत आणि घरी पैसा आणावा. त्यातुन मग त्याच्या बायकोने घर संसार चालवावा असा या समाजाचा नियम. बाहेरच्या जगात वावरताना मला हजार गोष्टींना तोंड द्यावं लागतं. कित्येक प्रकारचे टेन्शन असे असतात की मी ते मनमो़कळेपणाने कुणाला सांगु ही शकत नाही. अशी सर्व प्रकारची दु:ख मग मी स्वत:च गिळायला शिकतो. यातुनच मग माझा स्वभाव शांत शांत तर कधी तापट बनतो. कदाचित म्हणुनच प्रत्येकाचे वडील एकतर खुप शांत, समंजस वा एकदम तापट असतात. हा समाजच पुरुषाला असं बनवतो.

बरयाच वेळा मी सकाळी लवकर कामाला निघतो, दिवसभर काम-काम, रात्री लवकर जाऊन बायको-मुलांबरोबर थोडा वेळ घालविण्याची इच्छा असते पण बरयाच वेळा कामामुळे ती ही पुर्ण होत नाही. मुलांना मी फक्त रविवारीच दिसत असेन ते पण आठवड्यातील तुंबलेली काम करताना. वडील म्हणजे एक कामाला जुंपलेला बैलच जणु. आपल्या मुलांबाळांच्या प्रत्येक गरजा पुर्ण करण्यासाठी मी रात्रंदिवस झटत असतो. कधी बायकोच्या मागण्या, कधी मुलांचे हट्ट, कधी आई वडीलासाठीची कर्त्यव्य पुर्ण करता करता माझं तारुण्य माझ्या हातातुन कधी निसटुन जातं हे मला ही समजत नाही. टक्कल फक्त पुरुषालाच का पडतो वा पुरुषाचेच केस लवकर पांढरे का होतात असा जर तुम्हाला कधी प्रश्न पडलाच तर हे त्याच उत्तर. माझ्या आजुबाजुच्या, जिवलगांसाठी मी अगदी जेवढं काही शक्य आहे ते करतो. मी जर हे सगळ करता करता गचकलोच तर माझ्या मागच्यांचं काय हा प्रश्न मला नेहमीच सतावत असतो. त्यासाठीच मी स्वत:चं मरण सुद्धा 'इन्शुअरड' करुन ठेवतो.

बरयाच वेळा असा आरोप होतो की 'पुरुष हे कठोर असतात'. खरच सांगतो तुम्हाला, मी वरुन कितीही कठोर वाटलो तरी आतुन तसा बराच हळवा आणि संवेदनशील आहे. पण हा हळवेपणा मला कधीच समोर आणता येत नाही, अगदी मनात असुनसुद्धा. मी जेवढा कठोर तेवढाच वेळप्रसंगी एका स्त्री पेक्षा जास्त हळवा होतो. मुलगी सासरी जाते तेव्हा त्या बापाचं दु:ख त्यालाच माहित. सगळेजण जेव्हा तिला निरोप देत असतात तेव्हा आयुष्यात कधीही न रडलेल्या बापाच्या डो़ळ्यांत सुद्धा पाणी तरारतंच. तो बाप म्हणजे मी, एक पुरुषच. मला एका पुरुषापेक्षा एक स्त्रीच जास्त समजावुन घेऊ शकते. म्हणुनच मुलाचं आणि आईचं तर मुलीचं आणि वडीलांचं जास्त पटत असावं.

मला स्वत:चं दु:ख जाहिरपणे मांडण्याची मुभा नसते. माझं सर्वात मोठं दु:ख म्हणजे मी दु:खातही डोळ्यांत अश्रु आणु शकत नाही. पुरुषाचा पुरुषार्थ हा दुसरयांचा आसवं पुसण्यात आहे, स्वतःचं दु:ख दाखविणे हा माझा दुबळेपणा समजला जातो. एखादी स्त्री जशी मनमो़कळेपणे रडु शकते तसा मी नाही करु शकत. रडणं हा प्रांत आतापर्यंत स्त्रीचाच मानला गेलेला आहे. पुरुष जर कधी रडताना दिसलाच तर "काय बाई बायकांसारखा रडत होता तो.." अशी वाक्य ए॑कायला मिळतात. पुरुषाने दुसरा एखादा रडत असताना त्याला धीर द्यावा, स्वतःचा खांदा त्याला रडण्यासाठी द्यावा. पण स्वत: अतीव दु:खात असताना आतल्या आत आसव गिळावित असा आतापर्यंतचा अलिखीत नियम. मला नेहमीच दुहेरी कसरत करावी लागते. स्वतःला सावरण्याची आणि स्वत:चं दु:ख गिळण्याचीही. एकदा खुप रडु आलं असतानाही डोळ्यांत पाणी येऊ न देण्याचा प्रयत्न करुन पहां, तेव्हाच समजेन तुम्हाला माझं दु:ख.

अजुन बरंच काही आहे लिहिण्यासारखं. पण कधी वेळ मिळालाच तर याच पुरूषाच्या डोक्यावरुन एकदा हात फिरवा वा त्याचा हात हातात घ्या. त्याच्या हाताला पडलेले घट्टे तुम्हाला जाणवतील. हेच हात तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी रात्रंदिवस झटत असतात. तुम्ही जेव्हा तुमच्या घरी सुखाने चार घास खात असता तेव्हा हेच हात त्या चार घासाची सोय करण्यासाठी राबत असतात हे ध्यानात ठेवा. तुम्ही कुणीही असा,स्त्री किंवा पुरुष, आपल्या जवळच्या मग ते तुमचे बाबा, मुलगा, नवरा किंवा भाऊ कुणीही असो, यांचा चेहरा एकदा डोळ्यांसमोर आणा. त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं हे आठवा आणि फक्त एकदाच त्या 'पुरुषाला' सलाम करा, सलाम करा त्याने आतापर्यंत तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी. सलाम करा...औपचारिकता म्हणुन नव्हे तर तुमच्यावरचं एक ऋण म्हणुन !

- ( हळवा ) अजय

( हा लेख म्हणजे स्त्री आणि पुरुष यात पुरुषच श्रेष्ठ वगैरे गोष्टी सांगण्यासाठी किंवा पुरुष दिनानिमित्त पुरुषांना त्यांचे न्याय हक्क वा अधिकार समजुन देण्यासाठी लिहीलेला नसुन फक्त पुरुषांच्या मनातल्या चार गोष्टी तुम्हा लोकांना कळाव्यात म्हणुन लिहीलेला आहे. स्त्री आणि पुरुष हे समान आहेत या विचारांचा मी सुद्धा आहे. तरी कूपया कुठल्याही स्त्रीने या लेखाविरुद्ध आक्षेप घेऊ नये वा स्त्री मुक्ती केंद्राची द्वारे ठोठावु नयेत :-). पुरूष हा स्त्री विना अपुरा आहे आणि स्त्री पुरुषाविना हे सत्य आहे. )


--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. ब्राईड-हंट
३. ए॑का आणि पोट धरुन हसा
४. भाषणबाजी
--------------------------------------------------------------------------------

Friday, November 13, 2009

व्यावहारीक

कधीही ट्रॅफीक चे नियम न तोडणारा मी, एकदा माझ्या हातुन चक्क सिग्नल तोडला गेला. सिग्नल तोडल्या तोडल्या मला जाणवलं की लाल दिवा असुनही मी गाडी दामटतोय आणि पोटाची टाकी झेपत नसुनही मामा माझी गाडी थांबविण्यासाठी धापा टाकत माझ्या दिशेने पळत येतोय. सगळेच मामा हे टरटरुन फुगल्यासारखे असतात आणि त्यांच्या पोटाच्या आकारावरुन त्यांची पोलिस 'खात्यात' किती वर्ष सर्व्हिस झाली असावी याचा अंदाज बांधणं अवघड नाही. मामा धावत धावत आले आणि मोठं सावज सापडल्यासारखं त्यांनी माझी गाडी थांबवली. रस्त्याच्या मधोमध मी, माझी गाडी आणि मामा असे तिघेचजण. मी चांगलाच हडबडलो.

"ल्ये हुशार बनतोयस काय .." , मामा.

"चुक झाली साहेब.पुन्हा नाही करणार.".. मी,

मामाने माझ्याकडे अगदी तुच्छपणे पाहत गाडीची चावी काढली आणि मोठ्या तोरयात पुन्हा एका झाडाखाली जिकडे तो थांबला होता तिकडे निघुन गेला. गाडीची चावीच घेऊन गेला म्हणजे मला त्याच्यापाठोपाठ जाणं भागच होतं. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे गाडीची अजुन एक चावी आहे. मी चावीच्या बाबतीत थोड विसरभोळा असल्यामुळे नेहमीच एक चावी जवळ बाळगतो. मी लगेच ती चावी काढली, गाडीला लावली, किक मारली आणि छु मंतर. जाता जाता मामाकडे पहायला विसरलो नाही. तो बिचारा हातात पावती पुस्तक काढुन माझ्या येण्याची वाट पहात होता. डुप्लीकेट चावी बनवायला १५ रु खर्च येतो, मामाने मला कमीत कमी १०० रु ला तरी कापलं असतं.

बिचारा मामा ...!!!

त्या दिवशी मालकंस वर मामाची पोस्ट वाचुन मला हा किस्सा आठवला.

- (व्यावहारीक) अजय

--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. ब्राईड-हंट
३. ए॑का आणि पोट धरुन हसा
--------------------------------------------------------------------------------

Tuesday, November 10, 2009

शिवसैनिक खवळले आणि लगेच निवळले...

आज अबु आझमीने अजुन पुढे जात बाळासाहेबांवर सुद्दा टीका केली. त्याच्या टीकेने बाळासाहेब हे काही लहान बुद्धीचे होणार नाहीत किंवा त्यांच्या ऊंचीवरही काही फरक पडणार नाही. अबु आझमी हा एक साप आहे आणि त्याचं तोंड ठेचल्याशिवाय तो गप्प बसणार नाही. पण प्रश्न असा पडतो की एवढी टीका करुनही शिवसेनेसारखा एके काळी आक्रमक असलेला पक्ष गप्प कसा बसला ? त्यांच्या आमदारांनी अबुला घेराव घातला आणि त्याला समज दिली. अबु हा साबणासारखा आहे; त्याला जे काही करायच आहे ते करतो आणि निसटुन जातो. पण शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या एका दैवताविषयी अगदी घूणास्पद टीका करुन सुद्धा शिवसेनेसारखा पक्ष, त्यांचे नेते हे अबु आझमीला घेराव घालुन सोडुन देतात. शिवसैनिक खवळले आणि लगेच निवळलेही...

--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. ब्राईड-हंट
३. ए॑का आणि पोट धरुन हसा
--------------------------------------------------------------------------------

-अजय

Monday, November 9, 2009

आझमींचे थोबाड रंगवले!

काय चुक काय बरोबर मला त्याच्या खोलात जायचं नाही कारण मी पत्रकार नाही किंवा समीक्षक ही नाही. अबु आझमीच्या भर विधानसभेत कानाखाली मारुन मनसेच्या लोकांनी त्याची खाशी जिरवली आहे. मराठी असो किंवा हिंदी, ती देवनागरीच आहे. मराठीत शप्पथ घेतली असतं तर काही बिघडलं नसतं. प्रश्न मराठीत शपथ घेण्याचा जसा आहे त्यापेक्षा तो मराठी द्वेषाचा आहे. आझमीची गुर्मी पहिल्याच दिवशी उतरवली गेली याचा मला खुप आनंद आहे. भले तुम्ही याला चुक म्हणा किंवा बरोबर म्हणा.

याच्यावर एक मोठा लेख नक्कीच होऊ शकतो, नक्की लिहीन लवकरच.

-अजय

Wednesday, November 4, 2009

यंदा कर्तव्य आहे ?

लग्न हे तसं प्रत्येकाच्याच पाचवीला पुजलेलं असतं. लग्न हे अपघातानं कधी होत नाहीत, अपघातानं मुलं होतात. लग्न जर ठरवुन करत असाल तर चॉईस असते आणि जेव्हा चॉईस असते तेव्हा थोडासा संभ्रम निंर्माण होतो. त्यात ज्याला लग्न करायच असतं त्याच्या आजुबाजुचे लोक त्याला उपदेशाचे डोस पाजत असतात,ते पण अगदी फु़कट. आतापर्यंत मी कसा दिसतो/दिसते याचा कधीही विचार न केलेले लोकही मग आरशासमोर तास न तास उभे राहुन स्वत:ला न्याहाळु लागतात. त्यांची रंगाची आवड, चॉईस सुधारते. त्यांच्या आयुष्यात मग रंगीबेरंगी फुलपाखरं उडायला लागतात. 'आभास हा...छळतो तुला, छळतो मला..." सारखी गाणी ओठांवर रेंगाळु लागतात. आपला जोडीदार कसा असावा याचं एक हलकंस चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर असतं पण ते पुर्ण दिसत नसतं. आणि शेवटी मग तो दिवस उजाडतो, त्याला सारेजण 'पाहण्याचा दिवस' म्हणतात. मनात नाना शंका, नाना प्रश्न उभे असतात. अशाच काही प्रश्नांचा, शंकाच केलेला हा ऊहापोह, तो पण अगदी रोखठोकपणे.

या जगात परफेक्ट असं कुणीही नाही. प्रत्येकाच्यात काही ना काही उणीवा आहेत. लग्न म्हणजे थोडीफार तडजोड आलीच. आपल्याला हवा तसाच व्यक्ती कधीच कुणाला मिळत नाही. त्याला तसा बनवावा लागतो.

आपल्या मनासारखीच समोरची व्यक्ती हवी असा अट्टहास कशाला? थोडे इकडे थोडे तिकडे होतच असतं. त्यात विशेष काही नाही. आपल्याला समोरच्यात नेमकं काय हवंय हे नीट ठरविल्याशिवाय पुढे जाउ नये. आपल्याला झेपेल असाच आपला जोडीदार असावा ( वजनाने झेपेल असा अर्थ अपेक्षीत नाही :-)) नाकापेक्षा मोती जड असं काही करु नका.

लग्न म्हणजे खेळ नाही तो दोन जीवांचा मेळ आहे. लग्न म्हणजे एक नवीन नात्याची सुरुवात, आपल्या आयुष्यात एक नवीन माणसाची ती असते एंन्ट्री. अशी सुरुवात खोटं बोलुन कधीही करु नये असं मला वाटत. जे काही असेन ते अगदी खरंखरं. "खोटं बोलुन लग्न जमेन ही पण टिकणार नाही "

मुलाच्या डिग्रीपेक्षा त्याचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा, डिग्री आयुष्यात कमावता येईन हो पण प्रामाणिकपणा आडातच नसेन तर पोहरयात कुठुन आणणार. मुलगा प्रामाणिक, हुशार आणि प्रेमळ असेन तर तुम्ही लग्नाची अर्धी लढाई जिंकली म्हणूनच समजा. मुलीनी मुलाचं कर्तुत्व पहावं, प्रापर्टी गौण असते. कर्तुत्व असेन तर अशा कित्येक प्रापर्टीज कमावतात येतात. मुलाने मुलीच्या सौंदर्याबरोबरच ती तुम्हाला, तुमच्या घराला किती सुट होते ते पहाव. समंजसपणा हा दोघांनी एकमेकांत पहाणे गरजेचं. तो एक गुण असा आहे जो नेहमीच तुम्हाला एकत्र ठेवायला मदत करतो.

मुलाच्या किंवा मुलीच्या फोटोवरुन ती व्यक्ती दिसायला तशीच असेन असा ग्रह करुन घेऊ नये. आयुष्यभर पॅराशुटचं तेल लावणारी मुलगी सुद्धा लग्नासाठीच्या फोटोमध्ये केस मोकळे सोडतेच. त्यामुळे मोकळे केस दिसले की हुरळुन स्वप्नांचे मनोरे बांधू नये. फोटोवरुन अंदाज बांधावा किंवा कल ओळखावा. खरा चेहरा हा पहाण्याच्या कार्यक्रमातच दिसतो.

मुलींना नाहक अवघड प्रश्न विचारु नका. ती जर सॉफ्टवेअर इंजीनिअर असेन तर ती C++ की JAVA यापेक्षा ती तुम्हाला दोन वेळ जेवण करुन घालु शकेल काय हा प्रश्न जास्त समर्पक आणि महत्त्वाचा. स्त्री ही आतापर्यंत घरातच रहात असे त्यामुळे स्त्रीला बाहेरच्या जगातलं ज्ञान हे तसं पुरुषाच्या तुलनेत मर्यादित असतं. ( समस्त स्त्री वर्गाची माफी अगोदरच मागत आहे ) त्यामुळे तुम्हाला अगदी हवेत तशीच उत्तरांची अपेक्षा मुलींकडुन करु नका. मुलींनी मात्र ही अपेक्षा करावी. मुलगा हा बोलण्या चालण्यात स्मार्ट असलाच पाहिजे.

हिच्यापेक्षा ही जास्त चांगली वाटते किंवा ह्याच्यापेक्षा हा चांगला , असा प्रकार शक्यतो करु नये. एकदा का तुम्हाला वाटला की मला समोरची व्यक्ती जोडीदार म्हणुन पसंद आहे तेव्हा तिथेच थांबाव. एकदाच निर्णय घ्या पण विचार करु घ्या. आवडीनिवडी झाल्यानंतर ही तुम्ही तुलना करायला गेलात की हाती दु:ख आलंच म्हणुन समजा.

असं म्हणतात की मुलीच्या आई वरुन मुलगी कशी असेन हे ओळखावं. त्यामुळे आईच्या बोलण्याकडे लक्ष राहुद्यात. ( म्हणजे तिच्याकडेच पहातच रहा असं मी सांगत नाही ! )

पाहण्याच्या कार्यक्रमात आपल्या बरोबर जे लोक असतात त्यांची जबाबदारी असते ती वातावरणनिर्मिती करण्याची. एक हलकफुलक वातावरण करुन देणे आणि निर्णय घेण्यासाठी मदत करणे एवढंच. निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो. मित्राला उगाचच विचारु नका की मुलगी तुला कशी वाटली. लग्न तुला करायचं असतं. त्याच्याशी आवडलेले आणि खटकलेले मुद्द्यांबाबत जरुर चर्चा करा, निर्णय सर्वस्वी तुमचा असतो.

लग्नाला उभ्या राहिलेल्या सगळ्यांच्या मनातला एक खदखदता प्रश्न - मी १ तासाच्या भेटीत आयुष्यभराचा जोडीदार कसा निवडु ? तो त्या एका तासात चांगलाच वागणार ! प्रश्न बरोबर आहे. त्यामुळे लग्न ठरवायच्या अगोदर किमान एकदा तरी बाहेर भेटुन गप्पा माराव्यात. आपल्या अपेक्षा आणि समोरच्या व्यक्ती च्या अपेक्षा मॅच होणे महत्वाचं. याला मी स्वत: फ्रिक्वेन्सी मॅच होणं अस म्हणतो. माणुस स्वत:चा स्वभाव बदलु शकत नाही त्यामुळे अशा भेटीतुनच समोरच्याचा स्वभाव जाणुन घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्हीसुद्धा अशा भेटीत तुम्ही जसे आहात तसेच स्वत:ला प्रेझेंट करा, उगाचच ढोंगीपणा काय कामाचा ?

मुली पहायला जाताना अगदी आपल्याला सुट होईन असाच फॉर्मल ड्रेस घालावा. लेंस नसलेले शुज,पायाची तिरकी घडी जरी घातली तरी उघडे पाय दिसणार नाहीत एवढे मोजे, आपल्याला सुट होईन अशा रंगाचा शर्ट आणि परफेक्ट फिटींग ची पँन्ट घालावी. पाहण्याच्या अगदी थोडावेळ अगोदर शेव्हींग करु नये. मनावर दडपण असल्यामुळे कापण्याचा संभव जास्त.
मुलींनीसुद्धा आपल्याला चांगली दिसेन अशाच रंगाची साडी, शक्यतो त्या दिवशी दुसरया कुणातरी अनुभवी बाई कडुन नेसवुन घ्यावी. बा़की मुलींच्या बाबतीत मी जास्त खोलात जात नाही. त्या सुज्ञ आहेतच.

जोपर्यंत 'दिल की तार' वाजत नाही तोपर्यंत कुणालाही हो म्हणु नका. एकदा का तुमच्या मनाने तुम्हाला सांगितल की हीच माझी किंवा हाच माझा भावी जोडीदार तेव्हा मग पुढे जा. तार वाजणं महत्वाच, त्याचबरोबर तार तुटेपर्यंत ही नाही म्हणु नका. मला याच मुलाशी किंवा याच मुलीशी लग्न करायचं असं जेव्हा मनापासुन वाटतं तेव्हा समजावं की आपली तार वाजली म्हणुन.

स्वत: बॅचलर असतानाही लग्नासंबंधीचे उपदेश करणं मला जड जात होतं त्यामुळेच खुप दिवसांपुर्वी लिहिलेली पोस्ट मी नको नको म्हणत शेवटी आज पोस्ट केलीच. पण लग्न करण्यासाठी थोडंच लग्नाचा अनुभव असण गरजेच असतं, नाही का ?

-अजय

--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. ब्राईड-हंट
२. ए॑का आणि पोट धरुन हसा
3. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे

Sunday, November 1, 2009

एल्गार - सुरेश भट

सुरेश भटांची ही कविता जेव्हा जेव्हा मी वाचतो तेव्हा एका एका ओळीत मी हरवुन जातो. सुरेश भटांच्या शब्दात किती ता़कद असते ते ही कविता वाचल्यावरच उमगतं.

अद्यापही सुरयाला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही

येथे पिसुन माझे काळीज बैसलों मी
आत्ता भल्याभल्यांचा हातात डाव नाही

हे दुख राजवर्खी...हे दुख मोरपंखी...
जे जन्मजात दुखी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू - कोठे पहाट झाली?
त्यांच्यापल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तनाव नाही

झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही

गर्दित गारद्यान्च्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मडयाला आता उपाव नाही

जावे कुण्या ठिकाणी उद्वस्त पापियांनी?
संतांतही घराच्या राखेस भाव नाही

उचारणार नाही कोणीच शापवाणी...
तैसा रुशिमुनिंचा लेखी ठराव नाही

साद्याच माणसांचा एल्गार येत आहे...
हा थोर गान्डूळाचा भोंदू जमाव नाही !

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

एल्गार - सुरेश भट